आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक नवी सुरुवात (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार आज एका शानदार शपथविधी समारंभाने स्थानापन्न होत आहे. जगाच्या व्यासपीठावर एक वेगळी ओळख असलेला हा खंडप्राय देश सहासष्ट वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला तेव्हा नियतीने त्याच्या नावावर काय लिहून ठेवले आहे, याविषयी खूप काही बोलले आणि लिहिले गेले. खरे म्हणजे या देशात जे प्रचंड वैविध्य आहे, त्याच्यासह हा देश पुढे कसा प्रवास करणार, अशा शंका जगाने उपस्थित केल्या. पण गेल्या सहा दशकांतील अडथळ्यांच्या शर्यतीतही दमदार वाटचालीने भारताने त्या शंकांना उत्तरे देऊन टाकली आहेत. आज जगातील अनेक देश स्थैर्य आणि लोकशाहीसाठी धडपड करत असताना भारत मात्र ‘जगातली सर्वात मोठी लोकशाही’ हा मुकुट घालून मिरवतो आहे. या सार्‍या प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आज साजरा होतो आहे. तो ऐतिहासिक यासाठी आहे की जगातली दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या म्हणजे जगातील प्रत्येक सहा नागरिकांत एक भारतीय नागरिक, हे प्रमाण असलेल्या देशाचे भवितव्य त्याच्याशी निगडित आहे. विकसित जगाशीच तुलना करायची तर त्या निकषांतही आम्ही मागे नाही, हे सिद्ध करण्यासाठी भारतीय समाज धडपड करतो आहे आणि त्या प्रवासात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या राजकीय बदलांत तो हिरिरीने भाग घेतो आहे. केवळ राजकीय बदलाने आपले आयुष्य बदलत नाही, हा अनुभव पाठीशी असताना त्या बदलाची अपरिहार्यता लक्षात आल्याने त्याने आशावाद अजिबात सोडलेला नाही. पन्नास कोटी नागरिक शांततेत मतदान करतात आणि आपले पुढील राज्यकर्ते ठरवतात, ही तर मानवी इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरावी. मानवाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या तुरळक खुणा दिसल्या खर्‍या, मात्र त्याचा असा सर्वमान्य महामार्ग झालेला जग प्रथमच पाहते आहे. म्हणूनच लोकशाही देश आणि हुकूमशाही देश अशा वाटणीत लोकशाही देशांच्या पारड्यात आधुनिक जग निर्विवाद अधिक माप टाकते आहे. माणूस भविष्यात ज्या प्रकारच्या मानवी समूहाची कल्पना करतो आहे, ती समृद्धता-संवेदनशीलता आणि या पृथ्वीतलावर अतिशय वेगळी भूमिका बजावणार्‍या माणसाची मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित होण्यासाठी ज्या मार्गाने जाण्याशिवाय पर्यायच नाही, ती ही लोकशाही आहे. जगाच्या दृष्टीने भारत नावाचा देश आज कदाचित गरीब, विकसनशील असेल; पण त्याची दिशा त्या उद्याच्या देदीप्यमान भविष्याशी केवळ नाते सांगणारीच नव्हे, तर जगाला त्या दिशेने घेऊन जाणारी आहे, याचा सार्थ अभिमान बाळगावा, असे काही क्षण आपण आज भारतीय म्हणून साजरे करणार आहोत. भविष्यात जगात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असलेला भारत आज एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे झाली असली तरी त्या स्वातंत्र्याची फळे आता आता कोठे काही समूह चाखताना दिसत आहेत. दररोजच्या अन्नपाण्याच्या चिंतेतून काही समूह अगदी अलीकडे बाहेर पडले आहेत आणि स्वाभिमानी, जबाबदार मानवी समूहात सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही मोजक्या समूहांनी कितीही उड्या मारल्या तरी ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय आपण समाधानी, समृद्ध आणि शांत जीवन जगू शकत नाही, हे आता आता कोठे अनेकांना उमगू लागले आहे. देशाभिमान हा केवळ प्रतीकांपुरता मर्यादित नाही, त्याचा उच्चार करताना सोबतच्या दुर्बल माणसाचा आवाज ऐकला गेला पाहिजे, त्याला लाचार आणि मुजोरीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले पाहिजे आणि त्यासाठी भेदभावमुक्त शासनव्यवस्था प्रस्थापित करण्याशिवाय पर्याय नाही, हे कळणारा वर्ग आता सक्रिय झाला आहे. ज्या समूहांपासून आजही स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा हा दूरचा प्रवास आहे, अशा समूहांना हात देऊन एक जबाबदारी म्हणून त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे आपापल्या परीने धडपडत आहेत, अशा बहुआयामी समूहांत जगणार्‍या भारतीय नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर फार मोठी जबाबदारी आणि विश्वास टाकला आहे. लोकशाही हा समाज पुढे घेऊन जाण्यासाठीचा एक संवाद आहे. तो संवाद नेतृत्व करणार्‍याला सुरू करावा लागतो आणि नागरिक त्याला साद देतात किंवा नाकारतात. राजकीय प्रक्रियेतील ही सुरुवातीची अपरिहार्यता दोन्ही बाजूंनी पूर्ण झाली आहे. त्यामुळेच आजच्या शपथविधीनंतर एका नव्या टप्प्यावरील प्रवासाला खर्‍या अर्थाने सुरुवात होईल. सक्षम आणि भेदभावमुक्त प्रशासन, सूडबुद्धीला निरोप, भारताला आत्यंतिक गरज असलेल्या देशी आणि विदेशी भांडवलाचे स्वागत, कोट्यवधी माणसांचे आयुष्य त्यांचा काही दोष नसताना नासवणार्‍या काळ्या पैशाचे रूपांतर शुद्ध भांडवलात करण्याचा संकल्प, देशातील विरोधक आणि शेजारी देशांना सोबत घेण्याची तयारी, न परवडणारा बडेजाव आणि बोजड झालेल्या परंपरांना नकार, प्रश्नांच्या गुंत्यात शिरून ज्या प्रश्नांना लगेच उत्तरे शोधली पाहिजेत, अशा उत्तरांची मांडणी आणि वाट कठीण असली तरी ती आशावादी कृतींनीच पार करण्याचा दुर्दम्य आशावाद...दीर्घकाळ व्यवस्थेने नाडलेल्या आणि आपल्यातील ऊर्जा आणि प्रेरणेला विसरलेल्या बहुतांश भारतीय नागरिकांचा सहजासहजी विश्वास बसणार नाही, असे एक स्वप्न जगण्याचा आणि हे जगणे सुंदर आहे, असे प्रत्येक माणसाला म्हणता यावे अशा वाटचालीचा आजचे हे क्षण शुभारंभ ठरावेत! नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दिलेल्या मुलाखती व विजयी झाल्यानंतरची त्यांची विविध व्यासपीठांवरील वक्तव्ये यामुळे भारतीय नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. त्या अपेक्षा किती आणि कशा पूर्ण होतील त्याची कसोटीही आजपासून सुरू होत आहे.