आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नायक नहीं... (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायद्यापुढे सर्व समान असतात हे रोमन कायदेप्रणालीचे तत्त्व रोमन साम्राज्याचा भाग असलेल्या युरोपीय देशांनी सुरुवातीला अंगीकारले. पुढे त्यांच्या वासाहतिक धोरणांचा भाग म्हणून ते आफ्रिकेपासून भारतासारख्या सरंजामी देशातही त्यांनी लागू करून कायद्याचे राज्य प्रस्थापित केले. मात्र कायद्यापुढे सर्व समान असले तरी कायदा ही काही सजीव गोष्ट नव्हे. कायद्याचा अर्थ लावणारे वकील व त्यांनी लावलेल्या अर्थाद्वारे न्यायदान करणारे न्यायमूर्ती हे मात्र सजीव मानव असतात. जगातील कुठलाही मानव हा नि:पक्षपाती असूच शकत नाही. त्याच्यावर त्याच्या आजूबाजूच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होतच असतो. संजय दत्तला 1992-93 च्या मुंबईतील दंगली व त्यानंतर झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान एके-56 सारखे संहारक शस्त्र बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 5 वर्षांची सजा ठोठावल्यामुळे देशातील उच्चभ्रू वर्गाचे मन गलबलून आले आहे. संजय दत्तला 1993 मध्ये या गुन्ह्यात अटक झाली. पुढे 18 महिने तुरुंगात काढण्यापासून ते आता 20 वर्षांनी त्याच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करेपर्यंत पश्चात्तापदग्ध मन:स्थितीत त्याने जणू या गुन्ह्याची दररोज सजा भोगली आहे, असे या मन द्रवलेल्या उच्चभ्रूंचे म्हणणे आहे. मात्र संजय दत्त याच्या निष्पापपणाच्या कहाण्या सांगणार्‍या न्यायमूर्ती काटजूंपासून ते महेश भट यांच्यापर्यंत सर्व मान्यवरांना या संपूर्ण प्रकरणात शेकडो असहाय, गरीब मुस्लिम पोलिसी जाचाला आणि न्यायव्यवस्थेच्या जटिल प्रक्रियेला सामोरे गेले व त्यात त्यांना कोणत्या यातना सहन कराव्या लागल्या याचे काहीही सोयरसुतक वाटू नये हे खेदजनकच म्हणावे लागेल. डिसेंबर 1992 मध्ये अतिरेकी हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद उद्ध्वस्त केली. त्यानंतर देशभरात दंगे उसळले. मुंबईतही या घटनेनंतर छोटे-मोठे हिंसक प्रकार घडले. मात्र त्याची व्याप्ती फारशी नव्हती. जानेवारी महिन्यात मात्र मुंबईतील जोगेश्वरी येथील राधाबाई चाळीला आग लावण्यात आली व त्यात काही निष्पापांचा बळी गेल्यावर शिवसेनेने मुंबई शहर खुलेआम वेठीस धरले. त्यात हजारो निष्पापांचे बळी गेले. या दंग्यांमध्ये मुंबईतील पोलिसांचाही मुस्लिमविरोधी चेहरा समोर आला. अगदी न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालातही ते नमूद करण्यात आले. मात्र दंगलीत होरपळलेले लोक तेव्हापासून जे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत ते आजवर. या पार्श्वभूमीवरच मुस्लिमांमधील अस्वस्थतेचा फायदा उठवत पाकिस्तानी आयएसआयने दाऊद इब्राहिमच्या मदतीने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. संजय दत्त याचे वडील सुनील दत्त हे तेव्हा खासदार होते. त्यांच्या विभागातील बेहरामपाडा, भारतनगर या मुस्लिम वस्त्यांना दंगेखोरांकडून टार्गेट केले जात होते. सुनील दत्त सेक्युलर विचारधारेला बाध्य असल्याने या वस्त्यांमध्ये फिरून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत होते. त्याने चिडून जाऊन त्यांना खुलेआम जिवे मारण्याच्या धमक्या दंगेखोरांकडून दिल्या जात होत्या. संजय दत्त हा तेव्हा हिंदी सिनेमातील त्याच्या करिअरच्या अत्युच्च शिखरावर होता. हिंदी सिनेसृष्टी व अंडरवर्ल्ड यांचे नाते सर्वश्रुत आहे. त्यातूनच संजय दत्त याचा वापर करत दाऊद इब्राहिम याने मुंबईत संहारक शस्त्रास्त्रे उतरवली. त्यातीलच एक बंदूक संजय दत्तने स्वत:कडे ठेवली. ही बंदूक साधीसुधी नसून ती महासंहारक आहे. ती दाऊद इब्राहिमसारख्या देशविघातक स्मगलरकडून आलेली आहे, हे न समजण्याइतका तो लहान नव्हता. मात्र आजूबाजूच्या वातावरणात तो वाहवत गेला. संजय दत्त याला अटक झाल्यानंतर त्याच्यावर टाडा लावण्यात आला. संजय दत्तचे करिअर संपुष्टात येण्याच्या मार्गावर होते, मात्र सुनील दत्त यांची प्रतिमा, त्यांचे वजन, मोठे वकील उभे करण्यासाठी लागणारी आर्थिक शक्ती यामुळे संजय दत्तवरील टाडा सीबीआयने काढून टाकला. 18 महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला. गेल्या 20 वर्षांपासून तो जामिनावरच आहे व त्यादरम्यान त्याने ‘मुन्नाभाई’सारखे अनेक सुपरहिट सिनेमेही केले. याच बॉम्बस्फोटात संजय दत्त राहत असलेल्या वांद्रे विभागातील झेबुन्निसा नावाच्या एका सामान्य मुस्लिम बाईकडेही कटात सामील असलेल्या एकाने दुसर्‍या दिवशी घेऊन जातो म्हणून एक बॅग ठेवायला दिली होती. दुसर्‍या दिवशी थेट मुंबई पोलिस घरी आले. त्या बॅगेतही एके-56 निघाली. झेबुन्निसाला टाडाखाली अटक करण्यात आली. तिला जामीन मिळाला नाही. तिच्यावरील टाडाही निघाला नाही. तिला पूर्ण शिक्षा भोगावी लागली. दंगलीत भरडल्या गेलेल्यांपैकी काही तरुण मुस्लिमांना आपल्याला सूड घ्यायचाय, असे सांगितले गेले. यातील कित्येकांना हा सूड कसा घेतला जाणार आहे याचीही कल्पना दिली गेली नाही. सांगितलेली बॅग ठरावीक ठिकाणी नेऊन ठेवण्याचे काम कटाचा सूत्रधार टायगर मेमन याने केले. काही जणांना गाडी नेऊन उभे करण्याचे काम दिले. काही जणांना शेखाडी येथे पडावातून आलेली आरडीएक्सची पोती उतरवण्याचे काम चांदीची पावडर आहे, असे सांगून दिले गेले. या सगळ्यांना आपण इतक्या भयानक कटात सामील होतो आहोत याची कल्पनाही नव्हती. मात्र या सगळ्यांना व कटाशी काडीचाही संबंध नसलेल्या शेकडोंनाही तेव्हा मुंबई पोलिसांनी पकडले. ‘थर्ड डिग्री’ नावाच्या अमानवी छळाला या सर्वांना सामोरे जावे लागले. यातील कित्येक जण वर्षानुवर्षे तुरुंगात काढून नंतर निर्दोषही सुटले. मात्र यातील कुणासाठीही सहानुभूती दाखवावी असे न्या. काटजूंपासून ते महेश भट यांच्यापर्यंत कुणालाही वाटले नाही. संजय दत्त याने त्याच्याकडील एके-56 तोडून त्याचे लोखंड वितळवण्यासाठी ज्या केरसी अदजानिया याच्याकडे काही मित्रांमार्फत दिले त्याला तर हे नक्की कसले भंगार आहे याचीही कल्पना नव्हती. त्यालाही दोन वर्षे तुरुंगात सडावे लागले. मात्र या कुणासाठीही काटजू किंवा भट यांच्या उच्चभ्रू मानसिकतेचा समाज काहीही बोललेला नाही किंवा बोलतही नाही. याचे कारण कदाचित सोपे असावे. इतर आरोपी सामान्य मुस्लिम घरांतील आहेत, ते गुंडासारखे दिसणारे आहेत, त्यांच्या तुरुंगात खितपत पडण्याने आपल्या देशात सध्या अव्याहत सुरू असलेल्या आर्थिक विकासाच्या यात्रेमध्ये कोणताही अडथळा संभवत नाही, म्हणून हे होत असावे. 17 व्या शतकाच्या सुरुवातीस अस्तित्वात आलेल्या कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेचा अर्थ जगातील सर्वात मोठी लोकशाही समजल्या जाणार्‍या भारतात कसा वर्गनिहाय लावला जातो याचे विदारक चित्रच सध्या संजय दत्तच्या निमित्ताने देशातील उच्चभ्रू धुरीणांसमोर आणत आहेत. कायद्यापुढे सर्व समान असले तरी काही जण अधिक समान आहेत, असेच जणू जनतेच्या मनावर ठसवले जात आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनावर हे ठसत गेले तर ती भविष्यातील अराजकाची नांदी असेल हे निश्चित!