आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कूटनीतीची भाषा (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी काश्मीरमधील उरी येथे केलेल्या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारतामध्ये पाकिस्तानच्या विरोधात जो संताप उफाळला आहे तो लवकर शांत व्हायची अजिबात चिन्हे नाहीत. भारताची फाळणी होऊन पाकिस्तान निर्माण झाले. त्या क्षणापासून पाकिस्तानने भारताशी नेहमीच शत्रुराष्ट्रासारखा व्यवहार केला आहे. काश्मीरच्या प्रश्नाचे भांडवल करीत पाकिस्तानमधील राज्यकर्ते कायमच भारताबद्दल विद्वेषी वक्तव्ये करीत असतात. किंबहुना भारतद्वेष हा पाकिस्तानमधील राजकारणाचा अविभाज्य घटक झाला असून तो भाव प्रकट न केल्यास तेथील बऱ्याच नेत्यांचे राजकीय अस्तित्व रसातळाला जाऊ शकते, अशी स्थिती आहे. त्यामुळेच उरी हल्ल्यानंतरही पाकिस्तानचा भारतद्वेष जागतिक स्तरावर अधिक उफाळून आला आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील सभेत शनिवारी बोलताना केलेल्या वक्तव्यांचा विचार करावा लागेल. विकसित असो वा विकसनशील देश, त्या सर्वांनाच आपली अर्थव्यवस्था कशी मजबूत राहील याची आस लागलेली आहे. मात्र आशियातील पाकिस्तान असा एकमेव देश आहे की ज्याला विकासापेक्षा जागतिक स्तरावर दहशतवाद पसरवण्यात अधिक रस आहे. अफगाणिस्तानचे राजकारण असो वा आता इसिसच्या सुरू असलेल्या कारवाया, या प्रत्येक गोष्टीमध्ये पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे पुरावे वेळोवेळी समोर आलेले आहेत. जागतिक दहशतवादाविरुद्ध छेडलेल्या लढ्यातील सच्चा साथीदार असा पाकिस्तानचा मतलबी गौरव करणाऱ्या अमेरिकेनेदेखील या पुराव्यांच्या सत्यतेबद्दल आजवर शंका घेतलेली नाही. अमेरिकेच्या आशियातील राजकारणाची अपरिहार्यता म्हणून तिने पाकिस्तानला आजवर सांभाळले आहे. वेळोवेळी आर्थिक व लष्करी सामग्रीची भरघोस मदत देऊ केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जे निखालस खोटारडे आरोप करणारे भाषण केले, त्याची त्यांनाही स्पष्ट जाणीव होती. त्या भाषणाला भारतानेही संयुक्त राष्ट्रात तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे. नवाझ शरीफ यांच्यावर पाकिस्तानच्या लष्कराचा मोठा दबाव आहे. त्यामुळे नवाझ शरीफ यांनी शनिवारीदेखील लंडनमध्ये असे विधान केले की, उरीमधील दहशतवादी हल्ला ही काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांकडून होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधातील प्रतिक्रिया असू शकते. नवाझ शरीफ यांच्या या असत्य विधानांचा भारताने तत्काळ समाचार घेणे आवश्यकच आहे. नेमके तेच काम मोदींच्या भाषणाने केले आहे.
केरळमध्ये नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात भावनिकता होती. तसेच केंद्र सरकार पाकिस्तानच्या विरोधात अत्यंत कणखर भूमिका घेऊ शकते हा संदेश जनतेपर्यंत जाणे आवश्यक होते. उरीच्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, दहशतवादाच्या रूपाने पाकिस्तानने जे युद्ध पुकारले आहे त्यात त्या देशाला भारत नक्की धूळ चारेल ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली वक्तव्ये भारतीय जनतेच्या मनाला दिलासा देणारी आहेत. मात्र ही विधाने करणाऱ्या मोदींना वास्तवाचेही भान असणारच. भारतीय लष्करावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी याआधीही जीवघेणे हल्ले केले आहेत. उरीचा हल्लाही अशाच प्रकारे करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांत प्रचंड तणाव वाढलेला असला तरी या हल्ल्याचे निमित्त करून पाकिस्तानविरुद्ध युद्ध छेडण्याची भाषा युद्धज्वर झालेल्या काही लोकांकडून केली जात आहे ती अजिबात व्यवहार्य नाही. भारत व पाकिस्तानमध्ये कोणत्याही कारणावरून कितीही तणाव निर्माण झाले तरीही सध्याच्या काळात दोन्ही देशांत त्यामुळे युद्ध होईल, अशी शक्यता अजिबात संभवत नाही.
भारत व पाकिस्तान हे दोघेही अण्वस्त्रसज्ज देश अाहेत. त्यामुळे दोघांत युद्ध झाल्यास त्याचे किती टोकाचे विपरीत परिणाम भोगायला लागू शकतात याची दोन्ही देशांतील नेते व लष्करी अधिकाऱ्यांना जाणीव आहे. त्यामुळे युद्धाचा मार्ग न अवलंबता कूटनीतीचा वापर करून जागतिक स्तरावर पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावरून सातत्याने एकटे कसे पाडता येईल या पवित्र्यात भारताने सातत्याने राहिले पाहिजे. त्याच दृष्टिकोनातून मोदी सरकारने उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात पक्की मोर्चेबांधणी केल्याचे दिसून आले. अर्थात असा पवित्रा मनमोहनसिंग सरकारनेही पाकिस्तानच्या विरोधात घेतल्याचे दाखले इतिहासात डोकावले तर मिळू शकतात. भारत सॉफ्टवेअरची निर्यात करतो तर पाकिस्तान मात्र दहशतवाद निर्यात करतो हे नरेंद्र मोदी यांनी भाषणात काढलेले उद््गारही सूचक आहेत. पाकिस्तानशी बोलणी थांबवून किंवा त्या देशाविरोधात युद्ध करण्याची भाषा करून काहीही साध्य होणार नाही याचे भान मोदी सरकारला आहे, हेही नसे थोडके.
बातम्या आणखी आहेत...