आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र विचारांचे सोने (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दसरा म्हणजे रामायणानुसार श्रीरामाने रावणाचा वध केला तो दिवस. एका अर्थाने असत्यावर सत्याच्या विजयाचा दिवस. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमांचे, मर्यादांचे उल्लंघन. विशिष्ट चौकटीच्या सीमा ओलांडून बाहेर जाणे. म्हणजेच बंधनातून बाहेर पडणे, मुक्त होणे. हाच धागा आणखी पुढे नेला तर सीमोल्लंघन म्हणजे मुक्तता किंवा स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे केवळ भौतिक किंवा शारीरिक नसते तर विचारांचेही स्वातंत्र्य त्यात अभिप्रेत असते. विचारांवर कोणत्याही वादाच्या (इझम), राजकीय हिताच्या, स्वार्थाच्या, भीतीच्या मर्यादा येत असतील तर विचार स्वतंत्र राहूच शकत नाहीत. विचार स्वतंत्र नसतील तर असलेल्या शारीरिक स्वातंत्र्यालाही अर्थ राहत नाही, अशी ‘दिव्य मराठी’ची भूमिका आहे, हे आज दसऱ्याच्या निमित्ताने मुद्दाम अधोरेखित करायला हवे.
स्वतंत्र विचार मांडण्याचे अधिकार लाेकशाहीने देशातील प्रत्येक नागरिकाला दिले अाहेत. मात्र, सरकारला या बाबी बाधा वाटतात, असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्याच वेळी देशात स्वतंत्र विचारांचा सन्मान होईल असा आशावादही ते बाळगतात. कारण देशात बदल होत आहेत, असे त्यांचे मत आहे. ‘दिव्य मराठी’शी संवाद साधताना त्यांनी विचारांच्या शुद्धतेवरही भर दिला आहे. त्यांच्या याच भूमिकेच्या अनुषंगाने जगात सर्वात शुद्ध काही असेल तर ते संपूर्ण सत्य हेच आहे, असे आम्हाला वाटते. म्हणूनच संपूर्ण सत्य समाजासमोर आणणे आणि सातत्याने ते मांडत राहणे हीच एक जबाबदार माध्यम म्हणून आमची भूमिका राहिली आहे. यापुढेही ती कायम राहील. अण्णांच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर संपूर्ण सत्य म्हणजेच शुद्ध, स्वतंत्र विचार हेच खरे सोने आहे आणि हेच सोने सदैव लुटत राहणे हाच ‘दिव्य मराठी’चा स्थायीभाव आहे.
संपूर्ण सत्य सांगणे याचा अर्थ समाजस्वाथ्याचे भानही न ठेवता अनावश्यक बाबींची माहिती प्रसृत करीत राहणे नव्हे. जी माहिती जाणून घेणे हा लोकांचा हक्क आहे ती माहिती कोणत्याही मर्यादांच्या सीमांमध्ये न अडकता लोकांना सांगणे हे माध्यमांचे काम आहे, नव्हे कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडत असताना तारतम्य ही मुख्य अट असायला हवी. कारण जेव्हा तारतम्य राहत नाही तेव्हा माध्यमांकडून समाजाचे हित होण्याऐवजी अहितच अधिक होते. याचे ताजे उदाहरण नाशिकमध्ये समोर आले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारांची बातमी देताना आवश्यक असलेले किमान तारतम्यही पाळले नाही. पीडिता आणि अत्याचार करणारा यांच्या जातीचा उल्लेख करीत या वृत्तपत्राने बातमी दिली आहे. अशी माहिती प्रसृत करण्यामागे संबंधित माध्यमाचा हेतू काय होता, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अधिकाधिक माहिती देण्याच्या अट्टहासापायी माध्यमांकडून भल्याबुऱ्याचे भान सुटत असेल तर त्यातून समाज द्वेष आणि सूडभावनेच्या गर्तेत अडकत गेल्याशिवाय राहणार नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक लक्षात आला नाही की असे घडते आणि त्यातून सर्वसामान्यांचेच अधिक नुकसान होते.
सामाजिक माध्यमांमुळे सध्या माहितीचा विस्फोट झाला आहे. ठिकठिकाणच्या माहितीचा विनिमय अत्यंत झपाट्याने होऊ लागला आहे. आपल्याकडे आलेली माहिती कोणतीही शहानिशा आणि विचार न करता प्रसारित करण्यासाठी जो तो उत्सुक आहे. या परिस्थितीत प्रसारमाध्यमांची जबाबदारी आज कितीतरी अधिक पटींनी वाढली आहे. ते भान ठेवत सत्य आणि शुद्ध माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडणे तसे सोपे नाही. पण केवळ आणि केवळ सत्य माहितीच वाचकांपर्यंत गेली पाहिजे हा स्थायीभाव होतो त्या वेळी शुद्ध म्हणजेच संपूर्ण सत्य माहितीच समोर येते हा आमचा अनुभव आहे. राजकीय क्षेत्र असो, सामाजिक आंदोलने असोत, धार्मिक मेळावे आणि संस्थाने असोत अथवा आर्थिक संस्था असोत, संपूर्ण सत्य शोधताना कोणत्याही सीमांच्या मर्यादा नसतील, स्वार्थाच्या भिंती आडव्या येत नसतील, राजकीय पक्षाच्या विचारांचा प्रचार करण्याचा अथवा त्याचे हित जपण्याचा हेतू नसेल तर सत्य आपोआपच समोर येते. ‘दिव्य मराठी’ने पहिल्या दिवसापासून अशा प्रकारच्या सर्व सीमांचे उल्लंघन केले असल्यामुळे सत्यच वाचकांसमोर ठेवले आहे आणि सर्वच ठिकाणी वाचकांनीही तेच स्वीकारले आहे. म्हणूनच एकमेव स्वतंत्र वृत्तपत्राचा बहुमान वाचकांनीच आम्हाला मनापासून बहाल केला आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. वादांचे, स्वार्थाचे, भीतीचे हे सीमोल्लंघन असेच सुरू राहील आणि स्वतंत्र विचारांचे सोने असेच लुटवले जात राहील, अशी ग्वाही दसऱ्यानिमित्त वाचकांना आम्ही देत आहोत.
बातम्या आणखी आहेत...