आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसला संघर्ष अटळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाम, महाराष्ट्रातील काँग्रेसचे सरकार पक्षातील असंतोषाने ग्रासून गेल्याने स्वत:चे घर दुरुस्त करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. संघर्ष तर करावा लागणारच आहे. त्याशिवाय पर्याय नाही.

60 च्या दशकात देशात महागाई, अन्नधान्याची टंचाई, साठेबाजी, सावकारी, दारिद्र्य व युद्ध यामुळे काँग्रेसविरोधात मोठ्या प्रमाणात संताप व असंतोष निर्माण झाला होता. हा असंतोष समजून घेण्यासाठी सत्तेपासून काही काळ दूर राहून पक्षाच्या बांधणीसाठी वाहून घेणे व लोकांशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने ‘कामराज योजना’ राबवली होती. त्या वेळी या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रातील पाच बडे मंत्री व सहा मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यायला लावून त्यांना पक्षबांधणीसाठी जुंपले होते. त्या वेळी काँग्रेस हा देशात एक प्रमुख पक्ष होता व इतर राजकीय पक्षांची ताकद क्षीण असल्याने काँग्रेसमध्ये एक प्रकारचे मांद्य आले होते. तशीच परिस्थिती गेल्या 10 वर्षांत पक्षात आल्याने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव पक्षाला इतका जिव्हारी लागला आहे की, पक्षातील ज्येष्ठ धुरीण, आजी-माजी नेते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडे ‘कामराज योजने’सारखा प्रयोग पक्षात राबवण्याची मागणी करत आहेत. उपाध्यक्ष राहुल गांधींनी राबवलेले कल्पक प्रयोग निष्फळ ठरल्याने जुनेच प्रयोग या नेत्यांना अपेक्षित आहेत. त्यातच देशाच्या हिंदी पट्ट्यातून काँग्रेसचा पूर्ण सफाया झाल्याने अनेक नेत्यांचे राजकारणातील स्थानही संपल्यासारखे झाले आहे. पूर्वेकडील प. बंगाल व दक्षिणेतील तामिळनाडू या बड्या राज्यांत काँग्रेस नावापुरती शिल्लक आहे. तृणमूल काँग्रेस, अण्णा द्रमुक, द्रमुक, बीजेडी, बसप या ‘एकला चलो रे’ घटक पक्षांशी युती-आघाडी केल्यास पक्षाला संजीवनी तरी मिळेल यासाठी हे प्रयत्न आहेत. हे प्रयत्न यासाठी की इतर राजकीय पक्षांसारखा काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा पक्ष नाही व पक्षाने स्वत:चे कार्यकर्ते उभे करण्यासाठी कधी गंभीर प्रयत्नही केले नाहीत. सोशल मीडिया, तरुणांमध्ये काँग्रेसविषयी नाराजी आहेच. शिवाय पक्षाला ‘व्हिजन’ नसल्याने लोकांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी पक्षाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. आसाम, महाराष्ट्रातील काँग्रेसचे सरकार पक्षातील असंतोषाने ग्रासून गेल्याने स्वत:चे घर दुरुस्त करण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. संघर्ष तर करावा लागणारच आहे. त्याशिवाय पर्याय नाही.