आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नैतिकतेचा नवा डोस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोग्यमंत्री काय चुकीचे म्हणाले? कंडोम ‘डम्प’ करू पाहणार्‍या लॉबीला त्यांनी चपराक दिली तेही योग्य झाले, पण नैतिकतेचे दाखले देताना एकपत्नीव्रत ही आपली संस्कृती आहे असे ते जे काही म्हणाले, त्याने ते उघडे पडले.

नैतिक-अनैतिक म्हणजे नेमके काय? नैतिक-अनैतिक ठरवण्याचा अधिकार नेमका कुणाचा? धर्मसंस्थेचा, राजसत्तेचा की न्यायव्यवस्थेचा? मुळात, जगात नैतिक-अनैतिक असे काही असते का, एकासाठी जे नैतिक तेच, दुसर्‍यासाठी अनैतिक असू शकत नाही का? आदी प्रश्नांची सर्वमान्य उत्तरे अद्याप मिळू शकलेली नसताना, आपल्याकडच्या राजकीय नेतृत्वाने मात्र नैतिक-अनैतिकतेच्या सोप्या व्याख्या करण्याचा छंद विनासायास जोपासलेला आहे. जगात भारतीय धर्मसंस्कृती तेवढी थोर आहे. या धर्मसंस्कृतीने घालून दिलेली नैतिकता तुम्ही पाळा, तुमच्या सगळ्या समस्या मिटतील, सगळे प्रश्न मार्गी लागतील, असा समस्त राजकीय धुरिणांचा सांगावा आहे. संधी मिळेल तेव्हा, संस्कृतीचे दाखले देत नैतिकतेचा डोस देण्याकडेच त्यांचा कल राहिला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनाही बहुदा तो मोह आवरलेला नाही. देशाचे नवे एड्सविषयक धोरण आखताना जनजागृती मोहिमांमध्ये शरीरसंबंधांत ‘कंडोम वापरापेक्षा एकपत्नीव्रत जपा आणि एड्स टाळा.. हीच आपली संस्कृती आहे आणि हेच वैज्ञानिक सत्यही आहे’. अशा आशयाच्या नैतिकमूल्याधारित संदेशांची भर घालण्याचे आदेश डॉ. हर्षवर्धन यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या पदाधिकार्‍यांना दिले. या प्रकाराने अस्वस्थ झालेल्या काही स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी देशाचे आरोग्यमंत्री धर्माच्या प्रभावाखाली येऊन जनतेची दिशाभूल करताहेत, म्हणत टीकेची झोड उठवली. त्यावर माझा कंडोम वापराला विरोध नाही, परंतु कंडोम सदोष असू शकतात, त्याने एड्सचा धोका वाढू शकतो. अशा वेळी पत्नीशी एकनिष्ठ राहणे केव्हाही श्रेयस्कर आहे, एवढेच मला म्हणायचे होते, असे म्हणत हर्षवर्धन यांनी स्वत:ची बाजू सावरून घेतली . कुणी म्हणेल, आरोग्यमंत्री काय चुकीचे म्हणाले? ते योग्यच म्हणाले. कंडोम ‘डम्प’ करू पाहणार्‍या लॉबीला त्यांनी चपराक दिली तेही योग्य झाले, पण नैतिकतेचे दाखले देताना एकपत्नीव्रत ही आपली संस्कृती आहे असे ते जे काही म्हणाले, त्याने ते उघडे पडले. कारण, भारत हा खरोखरच नैतिकता पाळणार्‍यांचा देश असता, तर शरीरसंबंधातून एचआयव्ही-एड्स झालेला एकही जण आजवर भारतात आढळला नसता.