आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युक्रेन संघर्षाची नाटोला चिंता...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युक्रेनसंदर्भातील रशियाचा अाक्रमकतावाद भविष्यात युरोपच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला तर स्थिती खूपच गंभीर होऊ शकते, अशी भीती नाटोने इंग्लंडमधील परिषदेत व्यक्त केली आहे.
सोव्हिएत संघराज्यामध्ये जेवढे प्रदेश होते तेवढ्या सगळ्यांवर पुन्हा कब्जा करून पूर्वीचा तो समर्थ रशिया साकारण्याचे स्वप्न त्या देशातील काही लोक बघत असतात. या लोकांचे नेतृत्व रशियाचे आक्रमक वृत्तीचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वीकारले आहे. गेल्या मार्च महिन्यात युक्रेनमधील पूर्व भागातला क्रिमिया हा स्वायत्त प्रदेश रशियाच्या लष्कराने नियोजनबद्ध अाक्रमण करून अापल्या घशात घातला.
क्रिमियामध्ये रशियाच्या दबावाखाली तेथील सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या सार्वमतात तेथील ९७ टक्के लोकांनी अाम्हाला रशियात सामील व्हायचे अाहे असा कौल दिला होता. त्याचा अाधार घेऊन रशियाने अापली कारवाई किती योग्य होती याचा डांगोराही पिटला. युक्रेन सरकार विरुद्ध रशियन लष्करासह त्यांनी पुरस्कृत केलेले बंडखोर असा जो तुंबळ संघर्ष गेले सहा महिने सुरू अाहे, त्याबद्दल इंग्लंडमध्ये ४ व ५ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या नाटो राष्ट्रांच्या परिषदेमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात अाली. अफगाणिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली कारवाई अाता संपवून तेथे तैनात मित्र राष्ट्रांच्या फौजांना माघारी बोलावण्यासंदर्भात या नाटो परिषदेमध्ये चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र या परिषदेत युक्रेनवर रशियाने केलेल्या अाक्रमणाचा मुद्दाच प्रभावी ठरला अाहे. युक्रेनप्रश्नी त्या देशाचे अध्यक्ष पेत्रो पोरोशेन्को यांच्याशी चर्चा करून शांती करार करण्याची तयारी पुतीन यांनी नाटो परिषदेच्या काही दिवस अाधीच दाखवली असली तरी ती धूर्त खेळी अाहे. एकूण परिस्थिती पाहता हा करार होणे अशक्य असून रशियावर अाणखी निर्बंध लादण्याची भाषा नाटोने चालवली अाहे.
युक्रेनसंदर्भातील रशियाचा अाक्रमकतावाद भविष्यात युरोपच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला तर स्थिती खूपच गंभीर होऊ शकते याचा विचारही नाटोने इंग्लंडमधील परिषदेत केला. १९९१ मध्ये सोव्हिएत संघराज्याचा डोलारा कोसळल्यानंतर रशियाचे महत्त्व खूपच कमी झाले. ते वैभवाचे दिवस परत मिळवण्याचा पुतीन यांचा प्रयत्न अाहे. मात्र, त्यापायी ते करीत असलेल्या अागळिकीला नाटो देश पायबंद घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, हाच या संघटनेच्या इंग्लंडमधील परिषदेतून मिळालेला धडा अाहे.