आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार आणि जनतेतील पूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरकारमधील नागरिकांचा संवाद आणि सहभाग वाढविणे, ही फार मोठी गरज असून ती भागविण्याचे काम mygov.nic.in हे नवे पोर्टल करू शकणार आहे.

देशासमोरील अतिशय गुंतागुंतीचे बनलेले हजारो प्रश्न कसे सुटू शकतील, हे शोधून काढण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून त्यासाठी सर्व जनतेच्या सहभागाची गरज असते. लोकशाहीत तर नागरिकच आपले सरकार ठरवत असतात, मात्र एकदा प्रतिनिधी निवडून दिले की सरकार आणि जनतेत मोठी दरी निर्माण होते. अशी दरी निर्माण झाल्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले. या सरकारला गेल्या शनिवारी दोन महिने पूर्ण झाले. या काळात अधिकारी आणि कर्मचार्‍यांशी संपर्क वाढविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सरकारने केले, मात्र 125 कोटी जनतेला सरकार आपले वाटण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याची गरज होती. े८ॅङ्म५.ल्ल्रू.्रल्ल या नव्या पोर्टलमुळे ती पूर्ण होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. सर्व शहाणी आणि हुशार माणसे सरकारमध्ये बसलेली असतात, असे कधी होऊ शकत नाही. उलट शांतपणे काम करणारी आणि नव्या कल्पना मांडणारी माणसे सरकारपासून अनेकदा लांबच असतात. त्यांना नवनव्या कल्पना सुचत असतात आणि त्या कोणाला दाखवाव्यात, सरकारपर्यंत कसे पोहोचावे, याची हतबलता ते अनुभवत असतात. समाजात चर्चिल्या जाणार्‍या सर्वच कल्पना काही व्यवहार्य असत नाहीत. मात्र जनतेच्या मनात नेमके काय चालले आहे आणि जनतेला कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, हे जाणून घेण्यासाठी हे पोर्टल अतिशय उपयोगी ठरणार आहे. सरकारने काय करायला हवे, ही सांगणारी मंडळी आपल्याकडे कमी नाहीत. मात्र आपले ते म्हणणे थेट सरकार दरबारी मांडणार्‍या यंत्रणेची गरज होती. आधुनिक तंत्रज्ञानाने ते शक्य करून दाखविले आहे. माहिती तंत्रज्ञान हे राज्य, प्रदेश, भाषा, जात, धर्म हे भेद ओळखत नाही. भारतासारख्या देशाला पारदर्शी व्यवस्थेची नितांत गरज आहे. अर्थात तंत्रज्ञानाने निरपेक्ष राहिले तरी संबंधित व्यक्तींना ती निरपेक्षता झेपतेच, असे नाही. या पोर्टलकडे येणार्‍या प्रचंड माहितीचे विश्लेषण कसे केले जाते, संबंधितांना किती जलद आणि कसा प्रतिसाद दिला जातो यावरच या पोर्टलचे यश अवलंबून आहे.