आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial About Anna Hazare And Mamata Banerje

अण्णा-ममतांचा बिगुल! ( अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणत: 2010 च्या सुमारास राजकारणात शुद्धीकरणाची मोहीम घेऊन अण्णा हजारे प्रत्यक्ष रणांगणावर उतरले होते. त्या वेळी त्यांचा शत्रू स्पष्ट होता - संसदेत बसलेले देशाचे लोकप्रतिनिधी. ते कोणत्याही पक्षाचे असोत, पण अण्णांच्या दृष्टीने संसदेसारख्या पवित्र मंदिरात बसलेले सर्व लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष जनतेशी प्रतारणा करत होते. देशातील भ्रष्टाचार, वशिलेबाजी, बेरोजगारी, महागाई, दारिद्र्यासारख्या गंभीर प्रश्नांचा सामना करायचा असेल तर लोकपालाशिवाय तरणोपाय नाही, राजकारणातील शुद्धीकरण आणि त्यानिमित्ताने येणारे व्यवस्था परिवर्तन याची सध्या देशाला नितांत गरज असल्याचेही ते वारंवार सांगत. सत्तेवर असलेल्या भ्रष्टाचारी काँग्रेसला उखडून फेका, असाही त्यांनी नारा दिला होता. अण्णांची अशी देशपरिवर्तनातबाबतची साधी-सोपी विचारसरणी, त्यांची सामाजिकप्रश्नी असलेली कळकळ, त्यांचे राळेगणसिद्धी येथील एका देवळात राहणे, त्यांचे भाबडेपण याचे अप्रूप ला नव्हे, तर ते अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, शांती भूषण, नवमध्यमवर्ग आणि देशातील प्रसारमाध्यमांना वाटू लागले आणि अण्णांचा देशव्यापी कॅम्पेन सुरू झाला. अण्णा हे दुसरे गांधी आहेत, असाही प्रचार सुरू झाला. पण भ्रष्टाचाराविरोधातील चळवळीचा जोर जसा वेगाने खाली येत गेला आणि केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’चे वारे वाहू लागले तसे टीव्ही चॅनलवाल्यांचे कॅमेरे अण्णांऐवजी केजरीवालांकडे वळू लागले आणि अण्णांचा देशव्यापी करिष्मा झपाट्याने ओसरू लागला. ज्या केजरीवालांसोबत अण्णांनी राजकीय लढाई सुरू केली होती, त्यांच्याशीच बिनसल्याने अण्णा एकाकी पडू लागले. दुसरीकडे केजरीवालांनी दिल्लीत ‘आम आदमी पार्टी’चे सरकार स्थापन करून राजीनामा देऊन देशाचे लक्ष वेधून घेतले होतेच. केजरीवालांची ही घोडदौड सर्वच पक्षांसाठी इशारा असल्याने अण्णांनीही तो इशारा मनावर घेतलेला दिसतो! त्यामुळे बुधवारी त्यांनी थेट तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देऊन अप्रत्यक्षपणे केजरीवालांच्या विरोधात दंड थोपटले. अण्णांना आता केजरीवाल यांच्यापेक्षा ममतांमध्ये गरिबांविषयी तळमळ दिसून आली. ममतादीदींचे एका खोलीत राहणे, साधी मारुती कार वापरणे, त्यांचा आजपर्यंतचा राजकीय संघर्ष, त्यांची लढाऊ वृत्ती, सत्तेविषयी लालसा नसणे हे गुण अण्णांना महत्त्वाचे वाटले. अण्णांनी देश कसा चालावा, देशाचे अर्थकारण कसे असावे याबद्दलचा 17 मुद्द्यांचा एक मसुदा तयार केला आहे. हा मसुदा त्यांनी विविध पक्षांना पाठवला होता. हे मुद्दे मान्य असतील तर आपला त्या पक्षाला पाठिंबा आहे, अशी अण्णांची भूमिका होती. पण त्यांच्या या मसुद्याला ममतादीदी सोडून मोदींपासून केजरीवालांपर्यंत सर्वच शुचिर्भूत नेत्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने अण्णांना कमालीचा राग आला आणि देश व समाजपरिवर्तनाची तळमळ कोणालाच नसल्याने त्यांनी केवळ ममतादीदींनाच आपला आशीर्वाद दिला. ममतादीदींना सध्या असल्या पवित्र आशीर्वादाची गरज होतीच आणि त्यांची वेळही जुळून आली. काही दिवसांपासून त्या एनडीए आघाडीत परत जाणार, अशी दिल्लीत चर्चा सुरू झाली होती. पण मोदींचा अश्वमेध देशातल्या प्रत्येक राज्यात अडवण्यासाठी अनेक जण सज्ज झाल्याने आपणही आपली कुमक घेऊन आपले सैन्य सज्ज करावे, असे ममतांना वाटू लागले. दिल्लीच्या सत्तेची ऊब याअगोदर घेतली असल्याने त्यांना दिल्लीचे तख्त फारसे लांब वाटत नाही. एनडीएतल्या महत्त्वाच्या नेत्या जयललिता यांनी डाव्यांशी घरोबा साधल्याने, उत्तर प्रदेशात मायावतींनी काँग्रेसला चार हात दूर राहण्याचा सल्ला दिल्याने, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानपदाची आपली इच्छा जाहीर केल्याने आपणच का मागे राहायचे? असा विचार करून त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षांना मोकळी वाट करून दिलेली दिसते. अण्णांचा भाबडा, विश्वासार्ह चेहरा लोकांपुढे ठेवून प्रचार केला तर आपल्याला केवळ पश्चिम बंगालमध्ये नव्हे, तर ईशान्येकडील आसाम, अरुणाचल, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांमध्ये धडक मारता येईल असे त्यांना वाटते. बिहार, ओरिसा आणि प. बंगाल असाही एक फेडरल फ्रंट तयार करण्याची दीदींची इच्छा आहे. या फ्रंटमध्ये तृणमूलसह बिजू जनता दल, बिहारमधील काही पक्ष सामील करून तिसर्‍या आघाडीला, भाजप-काँग्रेसला शह देता येऊ शकतो असाही त्यांना आत्मविश्वास आहे. शिवाय त्यांनी अण्णांवर महाराष्टÑ व दक्षिण भारतात उमेदवार निवडण्याची जबाबदारी सोपवली आहे. अण्णांनी ही जबाबदारी खुशीने स्वीकारली. कारण त्यांच्या डोळ्यापुढे 2019 ची लोकसभा निवडणूक आहे. अण्णांना प्रत्यक्ष राजकारणाची अ‍ॅलर्जी आहे आणि ते आपण राजकारणात पडणार नाही असे वारंवार सांगत असतात. पूर्वी राजाच्या दरबारात राजगुरू असे. हे राजगुरू प्रत्यक्ष लढाईला रणांगणावर जात नसत, पण ते राजाला कठीण प्रसंगी सल्ला देण्याचे काम करत असत. कधीतरी राजा चुकला तर त्याचे कान धरण्याइतपत नैतिक धारिष्ट्य त्यांच्याकडे असे. एका अर्थी अण्णांना जो लोकपाल आपल्या संसदीय लोकशाहीत अपेक्षित होता, तो नैतिक लोकपाल आपण असावे, अशी सुप्त इच्छा आहे. त्यामुळे दीदींसोबतच्या पत्रकार परिषदेत त्यांनी 2019 च्या निवडणुकीचा बिगुलही वाजवला. या निवडणुकीत ते आपल्या फौजेतून लढाऊ, सच्छील, प्रामाणिक, निष्कलंक असे 100 शिलेदार देशाला अर्पण करणार आहेत. हे शिलेदार निवडण्याची एक छोटी चाचणी म्हणून ते तृणमूल काँग्रेस पक्षाला मदत करणार आहेत. पण अण्णांच्या करिष्म्यावर त तृणमूलने एक जरी खाते उघडले तरी हा शिवसेना-भाजप युती, राष्‍ट्रवादी-काँग्रेस आघाडी व ‘आप’ला धक्का असेल. शिवाय दक्षिणेकडील राज्यांत तृणमूल काँग्रेसने किमान चार ते पाच जागाही जिंकल्यास त्यांना देशव्यापी स्थान मिळेल, असे वाटते. एकंदरीत ममतांचा लढाऊपणा आणि अण्णांचे नैतिकतेचे राजकारण अशी नवी युती राजकारणात जन्मास आली आहे. त्यांचे पुढील भविष्य दोन महिन्यांतच स्पष्ट होईल.