आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ये रे ये रे पावसा.. (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कृषिप्रधान म्हणवल्या जाणार्‍या आपल्या देशात शेतकर्‍यांसह विविध समाजघटकांचे डोळे जूनच्या सुरुवातीपासून आकाशाकडे लागलेले असतात. पावसाची आस, समृद्धीची आशा आणि मान्सूनचे अनिश्चित स्वरूप ही त्यामागची खरी कारणे. त्यातही मान्सूनचा लहरीपणा ही अधिक चिंतेची बाब. त्यानुसार यंदाही मान्सूनच्या बेभरवशाची चिन्हे दिसत आहेत. कोकण, मुंबई व ठाण्यातील परिस्थिती बिकट आहे. पश्चिम महाराष्ट्रात जलसाठा केवळ 19 टक्क्यांवर आला आहे, तर मराठवाडा, नाशकात, विदर्भात पाणीसाठा तुलनेने बरा आहे. तरीही यंदा दुष्काळाच्या शंकेची पाल मनात चुकचुकू लागली आहे. राज्यभरातल्या प्रमुख जलस्रोतांमध्ये पाण्याच्या साठ्याची आकडेवारी चिंताजनक असली, तरी त्यामुळे अगदी हादरून जाण्याचे कारण नाही. पावसाळ्याची सुरुवात जूनमध्ये होत असली, तरी जुलै हाच दमदार पावसाचा खरा महिना असतो, त्यामुळे आशेला वाव आहे. हवामान खात्याने जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसास सुरुवात होईल व यंदाचा मान्सून सरासरीच्या जवळपास असेल असे भाकीत केले आहे. वास्तविक पाहता, मान्सूनविषयीचे अज्ञान आणि त्याबाबतचा अशास्त्रीय दृष्टिकोन याच्या परिणामी आपण अद्याप समस्येच्या मुळाशी जाऊ शकलेलो नाही. जगात बहुतांश ठिकाणी हिवाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू असले, तरी आपल्याकडे मात्र हवामानाच्या विशिष्ट चक्रामुळे त्यामध्ये पावसाळ्याची भर पडली आहे. पृथ्वीलगत असलेल्या वातावरणाच्या पट्ट्यातली शृंखला त्यासाठी कारणीभूत आहे. आपल्याकडे नैर्ऋत्य मोसमी वारे पावसाची वर्दी घेऊन येत असले, तरी त्यावर बरेच घटक परिणाम करत असतात. दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागरातील एल निनो नामक उष्ण तसेच शीत प्रवाहांचा वातावरणावर पडणारा प्रभाव, त्यातून निर्माण होणारे हवेच्या कमी-अधिक दाबाचे पट्टे, वातपोकळ्या, चक्रीवादळे, समुद्रानजीकच्या परिसराचे तापमान आदी अनेक कारणांचा एकत्रित प्रभाव या साखळीवर पडत असतो. साहजिकच मान्सूनचे अगदी तंतोतंत वा अचूक भाकीत केले जाऊ शकत नाही. जगभरातल्या अभ्यासकांच्या प्रयत्नांती आकारास आलेल्या ‘मान्सून मॉडेल’लासुद्धा अनेक मर्यादा आहेत. कारण वर उल्लेखलेल्या कुठल्याही एका किंवा अनेक कारणांमुळे प्रभावित होणार्‍या वातावरणीय घटकांनुसार मान्सून आपला रोख बदलतो. यंदा नियोजित वेळापत्रकाच्या तुलनेत आठवडाभर उशिराने महाराष्ट्राच्या सीमेवर दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांनी गेल्या आठवड्यात राज्यातील मोठा भाग व्यापला होता. त्यामुळे आता चांगला पाऊस बरसेल, अशी अपेक्षा होती; परंतु अरबी समुद्रात निर्माण झालेल्या नानौक नामक चक्रीवादळामुळे ती तूर्त फोल ठरली. तसे पाहता गेल्या दशकभरात दोन-तीन वर्षांचा अपवाद वगळता पावसाने सुरुवातीच्या टप्प्यात हुलकावणी दिल्याचेच पाहायला मिळते. परिणामी पीक पेरणीचे नियोजित वेळापत्रक कोलमडून पडते. अनेक ठिकाणी पेरण्या वाया जातात. शेतकर्‍यांना दुबार पेरणी करावी लागते. पाण्याची उपलब्धता पाहून त्यानुसार ठिकठिकाणी पाणी कपातीचा मार्ग अवलंबला जातो. त्या त्या ठिकाणच्या उद्योग-व्यवसायांना त्याचा फटका बसतो. म्हणजे एका अर्थाने संपूर्ण अर्थव्यवस्थाच घेरली जाते. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची ओरडही सुरू होते. मुंबई, पुणे, नाशिक यांसारखी मोठी शहरे वगळता इतरत्र पाणीपुरवठ्याचे स्रोत अगदीच मर्यादित आहेत. त्यातही पश्चिम महाराष्ट्राचा अपवाद सोडला, तर खान्देश, मराठवाडा, वर्‍हाड असा राज्यातला मोठा भाग वर्षातले सहा ते आठ महिने टंचाईग्रस्तच असतो. विशेषत: ग्रामीण भागातील जनतेला हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठीही पायपीट करावी लागते; पण वर्षानुवर्षे असलेल्या या स्थितीला केवळ मान्सूनचा लहरीपणाच कारणीभूत आहे असे नाही, तर त्यापेक्षाही अधिक जबाबदार आहे ती नियोजनशून्यता. कारण मान्सून अत्यंत बेभरवशाचा आहे हे माहीत असूनही दरवर्षी पहिला पाऊस पडला की त्यासोबत कागदावर असलेले नियोजनसुद्धा वाहून जाते, असा आजवरचा अनुभव आहे. तसे पाहता, आपल्याकडच्या पावसाची सरासरी जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत खूप चांगली म्हणावी लागेल; पण त्यातल्या बहुतेक देशांनी काटेकोर नियोजन करत पावसाच्या पडणार्‍या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर कसा होईल, त्याची काळजी घेतली आहे. आपल्याकडे मात्र पाण्याच्या साठवणुकीपेक्षा वाहून जाण्याचेच प्रमाण अधिक आहे. कागदावर जे काही नियोजन होते तेसुद्धा विशिष्ट घटकांच्या सोयीने कशा प्रकारे होते, त्याचा प्रत्यय नुकत्याच उघडकीस आलेल्या सिंचन घोटाळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला आहे. हे पाहता पाण्याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे आणि राजकीय हस्तक्षेपाविना होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच भविष्यात ही समस्या काही अंशी का होईना आटोक्यात येईल, अन्यथा नेमेचि येतो मग पावसाळा... या चालीवर अन् पाठोपाठ टंचाईच्याही झळा... या पंक्ती आळवत बसण्याशिवाय पर्याय नाही.