आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑलिम्पिकमधील खेळखंडोबा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या वाट्याला दोन पदके आल्यानंतर देशाने सुटकेचा नि:श्वास टाकला. पाठोपाठ देशाला हर्षवायू झाला. भारताला महासत्ता मानणारे बहुसंख्य आहेत, पण ही सत्ता पदकांत डोकावत नव्हती. शोभा डे यांचे वक्तव्य खरे ठरणार, अशी धास्ती वाटू लागली. त्यातच मोदींची छत्तीस इंची छाती व पदकांचा कोरा तक्ता यांची तुलना सुरू झाली. मनमोहनसिंगांच्या मवाळ राजवटीत जास्त पदके मिळत होती, असे आवर्जून सांगितले जाऊ लागले. खेळातील पोकळ वासा दिसू लागल्यामुळे मोदीप्रेमी अस्वस्थ झाले. शेवटी दोन पदके हाती येताच नेहमीप्रमाणे राष्ट्रभक्तीचा पूर आला, बक्षिसांचा वर्षाव झाला, शोभा डे यांना हिणवणे सुरू झाले आणि भारत मागे का पडतो याचा पंचनामाही सुरू झाला. असा पंचनामा दर चार वर्षांनी होतो आणि सर्वजण त्यामध्ये हिरिरीने उतरतात. दीपिकाकुमारीने अचंबित व्हावे अशी शाब्दिक तिरंदाजी हे करतात. या गदारोळात क्रीडा क्षेत्राच्या मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष होते.

भारतात क्रीडा संस्कृती नाही हे वास्तव आहे. ती का विकसित झाली नाही याची कारणेही माहीत आहेत. राजकीय स्वार्थ व अनास्था ही प्रमुख कारणे सांगितली जातात व ते खरे असले तरी त्यापलीकडीलही कारणे आहेत. या कारणांवर दर पाच वर्षांनी काथ्याकूट होतो, पण नंतर पुढील पाच वर्षे क्रिकेट वगळता कोणत्याच खेळावर हिरिरीने चर्चा होत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे भारताचा विशिष्ट स्वभाव. कुस्ती, कबड्डी वगळता मैदानी खेळांकडे भारतीय समाजाचा पहिल्यापासूनच कल कमी. मुळात विरंगुळ्याचे साधन म्हणूनही खेळण्याकडे भारताची प्रवृत्ती नाही. स्वभाव असा व त्यात भर पैशाच्या अभावाची. कोणत्याही खेळात प्रावीण्य मिळविण्यासाठीही बऱ्यापैकी पैसा खर्च करावा लागतो. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी तर लक्षावधी रुपये लागतात. भारतीय मध्यमवर्ग आपल्या मुलाला खेळाडू बनविण्यास नाखुश असतो यावरून टीका केली जाते. ती अनाठायी आहे. कारण भारतातील स्थितीच अशी आहे की मध्यमवर्गाला सर्वप्रथम आर्थिक स्थैर्याकडे लक्ष द्यावे लागते. आपल्या मुलाला स्थैर्य मिळवून देण्याच्या खटपटीत सर्वजण असल्यामुळे अभियांत्रिकी, आयटी, वैद्यक अशा शाखांकडेे जास्त कल असतो. क्रीडा क्षेत्रात खूप अनिश्चितता असते. बीसीसीआयने निवृत्तिवेतनासारखे काही चांगले निर्णय घेतल्यावर क्रिकेटमध्ये दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील खेळाडूंना आर्थिक स्थैर्य आले. क्रिकेटचा दर्जा उंचावण्यामागचे हे महत्त्वाचे कारण आहे. अन्य खेळांत अशी स्थिती नाही. पदके मिळविणे हा फार खर्चिक व अनिश्चित मामला असतो व भारतातील बहुसंख्य मध्यमवर्गीयांंना ते परवडण्याजोगे नाही. देशातील हे आर्थिक, सामाजिक व मानसिक वास्तव मान्य करून या समस्येकडे पाहिले पाहिजे. सध्या चमकणारे अनेक खेळाडू मध्यमवर्गातून आले आहेत ते मुख्यत: जिद्दी पालकांच्या जोरावर. अशी जिद्द दाखविणारे कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढतात. पण त्यांची संख्या अत्यल्प असते. पदकांची संख्या वाढविण्यासाठी केवळ िजद्द उपयोगी पडत नाही. त्यासोबत स्वतंत्र यंत्रणा लागते व तेथेच आपण कमी पडतो.

चीनमध्येही आपल्यासारखी बैठी संस्कृती होती. पण राज्यकर्त्यांनी जिद्दीने क्रीडा संस्कृती आणली. सामान्य माणसांची व्यक्तिगत जिद्द भारताइतकी पाच-सहा पदके मिळविते, पण चीनसारखी राजकीय व सामाजिक िजद्द ३७९ पदकांची पैदास निर्माण करते. ऑलिम्पिकमध्ये पदके मिळविण्यासाठी आधी प्रत्येक खेळात प्रावीण्य मिळविणारे लक्षावधी खेळाडू तयार झाले पाहिजेत. अशा लक्षावधीतूनच विशेष प्रावीण्य दाखविणारे निवडता येतात व ते ऑलिम्पिकपर्यंत उडी मारतात. तथापि हे मूळ प्रावीण्यच आपल्याकडे फार कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खेळण्याची संधी देणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाही. सहज जाऊन हौसेखातर खेळता येईल अशी व्यवस्था आपल्या महानगरातूनही नाही. लहान शहरातील गोष्टच सोडा. मैदाने नाहीत, छोटी स्टेडियम्स नाहीत, उपकरणे नाहीत. प्रशिक्षक तर जवळपास दुर्मिळ. समाजालाच खेळाची आवड नसल्यामुळे खेळासाठी पैसा सोडण्यास कुणी श्रीमंत तयार नाहीत. हौसेने खेळ खेळण्याची संधीच ज्या देशात मिळत नाही तेथे पदकांची पैदास कशी होणार? चीनच्या दर शंभर नागरिकांपैकी ३५ नागरिक कोणत्या ना कोणत्या खेळात प्रावीण्य मिळविलेले असतात. आपल्याकडे ही संख्या जेमतेम सात इतकी आहे. चीनमध्ये सुमारे दीड लाख प्रशिक्षक आहेत. त्यापैकी ३५ हजार नामवंत आहेत. तेथील राज्यकर्त्यांनी तीस वर्षे जोमाने प्रयत्न करून हे मुद्दाम घडवून आणले आहे. खेळण्यास पुरेशा जागा नसतील, स्वस्त उपकरणे हाताशी नसतील आणि प्रशिक्षकांची उणीव असेल तर क्रीडा संस्कृती रुजणे शक्य नाही. जमीन ही हडपण्यासाठी असते व क्रीडा संघटना हा सरकारी पैसा ओढण्याचा एक मार्ग आहे ही भारतातील राजकीय मानसिकता आहे. ती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत खेळखंडोबा सुरू राहणार.
बातम्या आणखी आहेत...