आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुरुंगाची हवा! (संपादकीय)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. आंबेडकर आदी महान व्यक्तींची नावे सातत्याने घेऊन समता प्रस्थापित करू पाहणाऱ्या छगन भुजबळ यांची प्रत्यक्षातील कृती मात्र वेगळीच होती. देशामध्ये जी सामाजिक व आर्थिक विषमता आहे ती संपवून समता आणण्याची भाषा करणाऱ्या भुजबळ यांची संपत्ती आणि सामान्य माणसाची संपत्ती यांच्यात प्रचंड विषमता निर्माण झाली होती. आपल्या व राजकीय नेत्यांच्या सांपत्तिक स्थितीत समता कधी निर्माण होणार, असा प्रश्नही गरीब जनतेला नेहमी पडत असतो. पण हा आवाज भुजबळ यांच्या कानापर्यंत कधी पोहोचला नसावा किंवा त्यांनी आपले कान बंद करून घेतले असावेत! यामुळेच महाराष्ट्र सदन तसेच इतर अकरा प्रकरणांच्या घोटाळ्यात सुमारे ८७० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप होऊनसुद्धा छगन भुजबळ हे एखाद्या सिंहाच्या आवेशात वावरत होते! छगन भुजबळ हे तसे स्वयंभूच नेते. शिवसेनेत होते तेव्हा ते लढवय्याच्या आवेशात वावरत. शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेसमार्गे शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले तरी त्यांचा लढाऊ बाणा अजूनही संपलेला नाही. सक्तवसुली संचालनालयाने भुजबळ यांना अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी निदर्शने करून बंदची हाक देऊन आपल्या नेत्याला ‘नैतिक’ पाठबळ जरूर दिले आहे. परंतु सक्तवसुली अधिकाऱ्यांनी ११ तास चौकशी केल्यानंतरही बेहिशेबी संपत्तीप्रकरणी छगन भुजबळ समाधानकारक उत्तरे देऊ शकले नव्हते. त्यामुळे भुजबळांच्या समर्थनार्थ होणाऱ्या हल्ल्यागुल्ल्यालाही स्वत:च्या अनेक मर्यादा आहेत हे त्यांच्या समर्थकांच्याही लक्षात आले असेलच. राष्ट्रवादी काँग्रेसमधील मराठा सरदार-दरकदारांच्या पंक्तीत ओबीसी छगन भुजबळ यांना मिळालेली मानाची खुर्ची त्यांच्याच पक्षात अनेकांच्या भुवया उंचावण्यासाठी कारणीभूत ठरत असे. आपण समाजातील सर्वच घटकांचे तारणहार अशी प्रतिमा जपणाऱ्या राष्ट्रवादी "जाणत्या राजा'ने भुजबळ डोईजड होणार नाहीत हे मात्र नेहमी पाहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सारे मान्यवर नेते पाठिंबा देण्यासाठी गोळा झाले असले तरी आपण पक्षात संपूर्णपणे एकटे पडलेलो आहोत याची भुजबळांना संपूर्ण कल्पना आहे. महाराष्ट्र सदन वा इतर प्रकरणांसारखे इतर अनेक घोटाळे याआधी राज्यात घडले आहेत. त्यात अनेकांवर आरोप झाले आहेत. पण तरीही भुजबळ यांनाच अटक व्हावी हा खचितच योगायोग नव्हता. छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस असो, मित्रपक्ष काँग्रेस असो किंवा ज्या ज्या खात्यात मंत्री म्हणून काम केले तिथे अनेकांना दुखावून ठेवले आहे. आपल्या शैक्षणिक संस्थांचा कारभार एकेकाळी पाहणाऱ्या निकटवर्तीयांचाही पाणउतारा भुजबळांनी केला होता. आता हे सारे अपमानित लोक एकत्र होऊन भुजबळ यांच्या कारभारातील एकेक उणिवा शोधून त्यांच्यामागे चौकशीची शुक्लकाष्ठे कशी लागतील याची घालमेल करीत असतात. तेलगी घोटाळ्यामध्ये भुजबळांवर कारवाई होऊ शकली नव्हती. महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळ यांनी जो "कारभार' केला त्याची परिणती त्यांचा पुतण्या समीर भुजबळ याला अटक होण्यात झाली. आता भुजबळ यांना अटक झाली ती कारवाई योग्यच होती असे समर्थन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले असले तरी भाजपच्या अतिउत्साही समर्थकांनी या कारवाईचे श्रेय राज्य सरकारला देण्याच्या भानगडीत पडू नये.
महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी छगन भुजबळांवर राज्य सरकार का कारवाई करत नाही, असा जाब मुंबई उच्च न्यायालयाने विचारल्यानंतरच सक्तवसुली संचालनालय असो वा एसीबी या यंत्रणा हलल्या आहेत. आता अजित पवार व सुनील तटकरे यांनाही काही प्रकरणांमध्ये अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तविली जात असली तरी ती कारवाई त्वरित होण्याची शक्यता नाही. भाजपचे बोलके खासदार किरीट सोमय्या यांना या तिघांना एकाच तुरुंगात पाहायची खूप घाई झाली आहे. कोण किती वर्षे तुरुंगात "सडणार' अशा भाषेत सोमय्या जाहीर हिशेब मांडत आहेत. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, शरद पवार यांचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी खूपच घनिष्ठ संबंध असून ते महाराष्ट्रातील राजकारणाच्या सोंगट्या कशाही हलवू शकतात. त्यामुळे सोमय्या यांच्याकडे फार लक्ष न दिलेलेच उत्तम! घोटाळेबाजांवर कारवाई होणारच असे भुजबळ अटकेबाबत विधानसभेत बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील शंभराहून अधिक सिंचन घोटाळ्यांचीही संपूर्ण चौकशी केली पाहिजे. या सिंचन घोटाळ्यांत गुंतलेल्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना फडणवीसांनी तुरुंगात धाडले तरच ते खरे कणखर मुख्यमंत्री! आधी समीर व मग छगन भुजबळ यांना झालेली अटक हा अनेक नेत्यांना इशारा आहे. तो ज्याचा त्याने ओळखायचा आहे!