आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

​कालसुसंगत शहाणपण ( अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपवरील प्रतिगामीपणाचा शिक्का अधिकाधिक गडद होत असताना महिला पोलिसाला लिंगबदलानंतरही सेवेत कायम ठेवण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय त्यांचे तसेच महाराष्ट्राचेही पुरोगामित्व अधोरेखित करणारा आहे. लैंगिकतेशी संबंधित विषय आपल्याकडे बहुतेकदा चर्चेच्याही परिघाबाहेर ठेवले जातात. परंतु अलीकडे समाजाची मानसिकता बदलत असून लिंगबदलासारख्या विषयांवर आता केवळ चर्चाच नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीदेखील केली जात आहे. माजलगावसारख्या छोट्याशा गावात कार्यरत असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलच्या निमित्ताने हा विषय चर्चेत आला आहे. संबंधित महिला पोलिसाला आपल्या शरीरातील संप्रेरकांत (हार्मोन्स) बदल होत असल्याचे जाणवू लागले आणि त्यानुसार तिने लिंगबदलाचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्या. तोपर्यंत हा निर्णय तिच्या एकटीपुरता मर्यादित होता, परंतु लिंगबदलानंतरही आपल्याला सेवेत कायम ठेवण्याबाबत तिने पोलिस महासंचालकांकडे अर्ज केल्यावर त्यावर सार्वजनिक स्वरूपात मतमतांतरे व्यक्त होऊ लागली. पोलिस महासंचालक कार्यालयाने याबाबत निर्णय घेताना प्रशासकीय यंत्रणेला साजेशी पावले टाकत सामाजिक अंगापेक्षा तांत्रिक अंगाने विचार केला आणि लिंगबदल केल्यास तिला सेवेत राहता येणार नाही, असा निर्णय दिला. त्यासाठी कारण पुढे करण्यात आले ते निवड प्रक्रियेचे. पोलिस सेवेत निवड होताना महिला श्रेणीतून तिचा समावेश झाला असल्यामुळे आता तिला पुरुष या नात्याने पोलिसी कर्तव्य कसे बजावता येणार, असा प्रश्न उपस्थित करत संबंधित महिलेचा विनंती अर्ज फेटाळून लावण्यात आला. तथापि, त्यामुळे हतबल न होता तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पारंपरिक माध्यमांसह समाजमाध्यमांद्वारेही हा विषय चर्चेत आल्याचे पाहून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि संबंधित महिलेला लिंगबदलाची अनुमती देतानाच तिची नोकरीही कायम ठेवण्याचे निर्देश त्यांनी पोलिस महासंचालकांना दिले. मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय कालसुसंगत तर आहेच, शिवाय त्यातून बदलत्या सामाजिक जाणिवांचे भानही आपल्याला असल्याचे फडणवीस यांनी दाखवून दिले आहे. विशेषत: भाजपला प्रतिगामित्वाच्या दिशेने नेण्यासाठीच जणू सध्या या पक्षातील काही जणांचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. त्यासाठी ही नेतेमंडळी जी विधाने करत आहेत वा जे निर्णय घेत आहेत त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण गोरक्षकांना पाठीशी घालणे असो, वादग्रस्त कलाकृतींवर बंदी घालणे असो वा त्या अनुषंगाने होणाऱ्या वादविवादाप्रसंगी थेट संबंधित कलाकारांचे नाक कापणे वा शिरच्छेद करण्याच्या वल्गना असोत.. यामध्ये गेल्या काही दिवसांत भाजप नेत्यांची वक्तव्ये कट्टरपंथीयांच्या जवळ जाणारी आहेत. हे कमी म्हणून की काय, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ असोत, शिवराजसिंह चौहान वा वसुंधराराजे असोत.. या सर्वांचीच रूढीवादासाठी जणू अहमहमिका लागल्याचे दिसते. त्या तुलनेत फडणवीसांच्या या निर्णयाचे वेगळेपण उठून दिसते. कारण अशा निर्णयांतून केवळ पुरोगामित्व सिद्ध होते असेच नाही तर सत्ताधाऱ्यांचे असे निर्णय सामाजिक स्वीकारार्हतेला बळ देतात. आपल्याकडे तर अद्यापही लैंगिकता आणि त्यासंबंधित विषयांकडे कलंकित नजरेनेच पाहिले जाते. वास्तव काहीही असले तरी सामाजिक कलंकाच्या छायेखाली हे विषय दडपून टाकण्याचीच मानसिकता बहुतेकदा दिसते. परंतु वैज्ञानिक प्रगतीमुळे म्हणा, संपर्क माध्यमांची व्याप्ती वाढल्यामुळे अथवा इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या खिडक्या सर्वांसाठी खुल्या झाल्याने म्हणा, समाजाची धारणा बदलत आहे. खासकरून नवी पिढी अशा विषयांकडे सामाजिक वास्तवाच्या दृष्टिकोनातून पाहते आहे. एखाद्या व्यक्तीची अंत:प्रेरणा लिंगबदलाची असेल आणि त्यासाठी अगदी सरकारी नोकरी पणाला लावण्यापर्यंत तयारी असेल तर त्याकडे तेवढ्याच गांभीर्याने पाहायला हवे, हेच माजलगावच्या या उदाहरणातून पुढे येते. पण त्यावर आपल्याकडची बेरोजगारी पाहता उद्या हा ‘ट्रेंड’ बनेल असा युक्तिवादही दुसऱ्या बाजूकडून केला जात असला तरी लिंगबदल प्रक्रियेतील गुंतागुंत, त्यासाठी तब्बल दहा ते बारा लाखांपर्यंतचा खर्च आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक दबाव पाहता फक्त नोकरी मिळवण्यासाठी ही पद्धत रूढ होईल असे म्हणणे अतिशयोक्तिपूर्ण ठरावे. तेव्हा ही कारणे पुढे करण्यापेक्षा अशा व्यक्तींची मानसिकता, त्यांच्या कुटुंबीयांची धारणा, नातेवाईक आणि मित्रपरिवाराचा दृष्टिकोन आदी सामाजिक अंगांचा विचार करून त्याकडे पाहणे महत्त्वाचे आहे. फडणवीस यांचा प्रस्तुत निर्णय याच धाटणीचा असल्याने त्याचे स्वागत करायला हवे.
बातम्या आणखी आहेत...