आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाफिजच्या मुक्ततेनंतर...( अग्रलेख )

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्याला रविवारी नऊ वर्षे पूर्ण झाली. या हल्ल्याच्या जखमा भारतीयांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. गेल्या २३ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी न्यायालयाने या हल्ल्याचा सूत्रधार व त्या देशातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईद याची मुक्तता करून आगीत तेल ओतण्याचाच प्रकार केला आहे. भारत, अमेरिका यांच्यासह जागतिक दबावामुळे हाफिज सईदला पाकिस्तान सरकारने गेले दहा महिने नजरकैदेत ठेवले होते, पण आता मुक्ततेनंतर हाफिज त्या देशातील राजकारणात थेट सहभाग घेऊ शकणार आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा कट रचण्यामध्ये हाफिजबरोबरच सहभागी झकी उर रहेमान, काफिया, अबू हमजा, कर्नल आदी १२ पाकिस्तानी दहशतवादीही सामील होते. या सगळ्यांना आमच्या ताब्यात द्यावे, अशी भारताची मागणी आहे. परंतु त्याबाबत पाकिस्तान नेहमीच टाळाटाळ करीत आला आहे. मुंबईवर हल्ला चढवण्यासाठी पाकिस्तानी अतिरेक्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्याचे काम ज्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केले त्या अबू जुंदालला अद्याप भारताच्या हवाली करण्यात आलेले नाही. मुंबई हल्ल्यासाठी ज्या डेव्हिड हेडलीने पाहणी केली होती तो सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. त्याला भारतात आणणे अद्यापही शक्य झालेले नाही. डेव्हिड हेडलीने मुंबई हल्ल्यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत जी साक्ष दिली त्यावरच भारताला समाधान मानावे लागले. थोडक्यात, मुंबई हल्ल्यामागील पाकिस्तानी सूत्रधार व त्याचे साथीदार मोकाट फिरत आहेत या निष्कर्षाप्रत यावे लागते. पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर तेथील सरकारने अजून कठोर कारवाई करायला हवी यासाठी अमेरिकेने गेल्या काही महिन्यांपासून दबाव आणखी वाढवला आहे. पण हाफिजची मुक्तता न्यायालयाच्या पदराआडून करून  पाकिस्तानने अमेरिकेला केराची टोपली दाखवली. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला याआधीच दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. साहजिकच आता हाफिज सईदची मुक्तता झाल्याने अमेरिकेने पूर्वी कधी नव्हे इतका कडक पवित्रा घेतला. या घटनेचा अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परिणाम होऊ शकतो तसेच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमेला तडा जाऊ शकतो, असा  इशाराच अमेरिकेने पाकिस्तानला दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूणच कारभाराविषयी बोलताना अनेकांचा सूर हा नकारात्मकतेचा असतो. पण हाफिजप्रकरणी पाकिस्तानला ठणकावून ट्रम्प सरकारने केलेल्या सकारात्मक कृतीची विशेष दखल घेणे आवश्यक आहे.

   
हाफिज सईदला अटक करून त्याला भारताच्या हवाली करणे पाकिस्तानला सहजशक्य होते. मात्र तसे केले असते तर पाकिस्तान दहशतवादी गटांना आश्रय देऊन भारतात व जगात अन्यत्र ज्या घातपाती कारवाया घडवून आणतो त्या सगळ्या कारस्थानांचा पर्दाफाश झाला असता. हाफिजने स्थापन केलेल्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेने मुंबई हल्ल्याच्या आधी २००१ मध्ये भारतीय संसदेवर घातपाती हल्ला घडवून आणला होता. काश्मीरमध्येही दहशतवादी कारवाया करण्यामागे या संघटनेचा हात आहे. त्यामुळे लष्कर-ए-तोयबावर पाकिस्तानात बंदी आणण्यात आली असली तरी हाफिजने जमात-उद-दावा या संघटनेच्या पदराआडून आपले उपद्व्याप सुरूच ठेवले आहेत. याच हाफिजने सात वर्षांपूर्वी दिफा-ए-पाकिस्तान कौन्सिलच्या नावाखाली पाकिस्तानातील चाळीसहून अधिक कट्टर व दहशतवादी संघटनांची मोट बांधली होती. या वेळी अमेरिका व भारताविरोधात जिहाद पुकारण्याचे आवाहन हाफिजने या संघटनांना केले होते. त्याचा दर्पोक्ती करण्याचा कंडू अजूनही शमलेला नाही हे तीन दिवसांपूर्वीही दिसून आले. पाकिस्तानी न्यायालयाने त्याची मुक्तता केल्यानंतर हाफिज सईदने स्वतंत्र काश्मीरचा नारा दिला. भारत सरकार माझे काहीही वाकडे करू शकत नाही, काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल, अशी दर्पोक्ती त्याने पुन्हा केली आहे. हाफिज सईदची मुक्तता झाल्याचे काही गंभीर परिणाम भारताला भोगावे लागू शकतात. त्याच्या मुक्ततेनंतर पाकिस्तानातून भारतात काश्मीरमध्ये होणाऱ्या घातपाती कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तशा हालचाली सुरू झाल्याची गोपनीय माहितीही भारतीय लष्कराला मिळाली आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी गटांची अवस्था सध्या बिकट आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांच्या २५ कमांडरसह २०२ दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे हे गट नेतृत्वहीन झाले आहेत. ती पोकळी पुन्हा भरून काढण्याचा प्रयत्न हाफिज सईद नक्कीच करणार. त्यामुळेच हाफिजच्या कारवाया हाणून पाडण्यासाठी भारताने आता अधिक सावध राहायला हवे. 

बातम्या आणखी आहेत...