आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमध्ये लष्करशाहीचे संकेत (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देश कुठलाही असाे, नवसुधारणावादाला कट्टरपंथीयांकडून सातत्याने विराेध हा हाेताेच. पाकिस्तानातही निवडणूक सुधारणा विधेयक -२०१७ चा मसुदा संसदेत मांडण्यात अाला. मात्र या निमित्ताने झुंडशाहीच्या हाती अायते काेलीत अाले. गेले २२ दिवस सरकार अाणि जनता वेठीस हाेती. झुंडशाहीसमाेर शहाणपण चालत नाही, हे पुन्हा एकदा पाकिस्तानातील अराजकाने अधाेरेखित केले. वस्तुत: पाकिस्तानी कायद्यानुसार निवडणूक लढवणाऱ्या सर्व मुस्लिम उमेदवारांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. त्यात इस्लाममधील शेवटचे प्रेषित पैगंबर महंमद (स.) हाेते, त्यांच्यानंतर दुसरा कुणी पैगंबर झाला नाही असे लिहून द्यावे लागते. मात्र प्रस्तावित विधेयकात या अाशयाच्या प्रतिज्ञापत्राची अट बदलण्यात अाली. नव्या विधेयकातील ही तरतूद इस्लामविराेधी अाहे असे ठरवून विराेध सुरू झाला. तेहरिक-ए-लबैक या रसूलअल्ला, सुन्नी तेहरिक-ए-पाकिस्तान, तेहरिक-ए-खत्म-ए-नबुवत या कट्टरवादी धार्मिक संघटनांनी त्याचा वणवा पेटवला. तथापि, हा गाेंधळ माजण्यापूर्वीच सरकारने ही कारकुनी चूक असल्याचे मान्य करीत दुरुस्ती केली. ती तरतूदही मागे घेतली. परंतु, दुराग्रही कट्टरपंथीयांचे यावर समाधान झाले नाही. या निमित्ताने पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेच्या पर्वाला सुरुवात झाल्याचे मात्र दिसले. धर्माच्या अाधारावर राष्ट्रगाडा हाकण्याचे दुष्परिणाम सातत्याने दिसून येत अाहेत, कारण धर्म हा तर्काचा अाधार घट्ट पकडून ठेवत नाही. पाकिस्तानात अशी परिस्थिती अाहे म्हणून अापण त्याकडे डाेळेझाक करणे याेग्य ठरणार नाही. त्यापासून याेग्य ताे धडा घेतला पाहिजे, असे अाम्हास वाटते. पाकिस्तानी पाेलिस-अांदाेलकांमधील हिंसाचारात ६ जणांचा बळी गेला; ९५ जवानांसह २०० लाेक जखमी झाले. या प्रकरणामुळे नाड्या लष्कराच्या हाती गेल्या यावरून तेथील स्थिती किती स्फाेटक अाहे याची कल्पना यावी. कायदामंत्री झाहिद हमीद यांच्या राजीनाम्यामुळे अराजक निवळले असे वरकरणी वाटत असले तरी अशी परिस्थिती निर्माण हाेणे हेच मुळात चिंताजनक अाहे. 


पाकच्या कायदामंत्र्यांना दबावापुढे झुकावे लागले असले, तरी या अराजकसदृश स्थितीत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शाैकत अजीज सिद्दिकी यांनी गृहमंत्र्यांसह लष्करालादेखील खडसावले. हा एक अाशादायक कवडसा ठरावा. मुळात अांदाेलन संपुष्टात अाणण्याचे निर्देश दिले असताना लष्कराला मध्यस्थाची भूमिका गृहमंत्र्यांनी का साेपवली? अांदाेलकांसमाेर सरकारला गुडघे का टेकावे लागले? समझाेता का केला? मध्यस्थी करण्याचा लष्कराला अधिकार तरी काय? असे काही प्रश्न या निमित्ताने उद्भवले अाहेत. त्याविषयी गृहमंत्री एहसान इक्बाल यांना खुलासा देता अाला नाही. लष्कराने खरे तर घटनादत्त कर्तव्याच्या मर्यादेत राहायला हवे असे अपेक्षित असते. मात्र देशाचा कायदा, नियम ताेडणाऱ्या अांदाेलकांविषयी लष्कर उदासीन कसे काय राहू शकते? सर्व अांदाेलकांना साेडून देण्याची हमी कशी दिली जाते? याचा अर्थ लष्करप्रमुख कमर बावेजा, मेजर जनरल फयाज हमीद, जनरल नावीद यांच्यासारख्या काहींना अासुरी महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटत असावेत. किंबहुना तशी शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत पाकिस्तानी लष्कर अाणि स्थानिक कट्टरपंथीयांमधील दिलजमाई लपून राहिलेली नाही. इतकेच नव्हे तर लष्कराचा दबदबा अाणि देशांतर्गत राजकारणातील हस्तक्षेपाची भूमिकादेखील या घटनाक्रमातून स्पष्टपणे अधाेरेखित हाेते. एकीकडे हिंसक अांदाेलनांना भारताकडून अर्थसाहाय्य पुरवले जात असल्याचा अाराेप पाकिस्तान करीत असताना दुसऱ्या बाजूला पाकच्याच लष्करी अधिकाऱ्यांचे कट्टरपंथीयांशी लागेबांधे असल्याचे या अांदाेलनाच्याच निमित्ताने जगासमाेर अाले अाहे. एक मात्र खरे की, नजीकच्या भविष्यात पाकिस्तानी राजकारणात कट्टरपंथीयांच्या आडून लष्कराचा हस्तक्षेप अाणि प्रभाव वाढण्याचे संकेत यातून मिळतात. शेजारी राष्ट्र म्हणून भारताला त्याची वेळीच दखल घ्यावी लागेल. उल्लेखनीय म्हणजे २०११ मध्ये या कायद्यातील सुधारणेच्या मुद्द्यावरूनच पंजाबचे माजी राज्यपाल सलमान तासीर यांची अंगरक्षक मुमताज कादरीने हत्या केली. त्या कादरीच्या गाैरव साेहळ्याच्या निमित्ताने ‘टीएलपी’ची स्थापना झाली हाेती. इस्लामी शरियत कायद्यातील कठाेर नियमांची बाजू घेत या पक्षाने राजकारण प्रभावित केले. एकंदरीत पाकिस्तानच्या सामाजिक-राजकीय जीवनात कट्टरतावादी संघटना, पक्षांचा प्रभाव वाढत अाहे. जनरल झिया यांच्या काळापासून पाकने इस्लामी राष्ट्रांची काही तत्त्वे स्वीकारली असतीलही; परंतु धार्मिक कट्टरपंथी पक्षांचा प्रभाव फारसा दिसून अाला नव्हता. मात्र बेनझीर भुत्तो, परवेझ मुशर्रफ, नवाझ शरीफ यांच्याही राजकारणात बेदखल राहिल्याने शून्यवत ठरलेल्या कट्टरवाद्यांनी अाता डाेके वर काढले अाहे. पाकिस्तानातील लाेकशाही समर्थक एकजुटीने या मूठभरांचा सामना समर्थपणे करू शकतील, अशी अाशा बाळगायला हरकत नाही.

बातम्या आणखी आहेत...