आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमची साथ अशीच राहो ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजाची सेवा करणे हे मानवतेचे कार्य अाहे. विशेषत: ज्यांचा व्यवसाय समाजाच्या प्रबोधनाशी निगडित असतो अशांसाठी ती सामाजिक बांधिलकीही असते. भांडवलदार हा नफेखोरच असतो, तो शोषण करतो अशा व्याख्या १९ व्या शतकात रूढ झाल्या होत्या. पण जेव्हा भांडवलशाहीचा विस्तार होऊ लागला, लोकांच्या जीवनमानात फरक पडू लागला, विज्ञान-तंत्रज्ञानात प्रगती होऊ लागली तसे भांडवलशाहीला एक मानवी चेहराही येऊ लागला. १९ व्या शतकात अमेरिकेतील भांडवलशाही चौखूर उधळली होती. पण जेव्हा ही व्यवस्था तेथील समाजाने स्वीकारण्यास सुरुवात केली तेव्हा तेथे बडे भांडवलदार आपणहून समाजाच्या सेवेसाठी पुढे आले. रॉकफेलर, डेल कार्नेजी, फोर्ड यांच्यासारख्या दिग्गज भांडवलदारांनी आपल्या नफ्यातील बराचसा हिस्सा केवळ अमेरिका नव्हे तर जगाच्या परिवर्तनासाठी वापरण्यास सुरुवात केली. आज महिला सबलीकरण, शिक्षण, विज्ञान संशोधन, आरोग्य, कृषी, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत जी प्रचंड गुंतवणूक व संशोधन होताना दिसते आणि त्यातून जे सकारात्मक चित्र पाहावयास मिळते त्यामागे या भांडवलदारांचा पैसा, ऊर्जा व प्रेरणा आहे. भारतात टाटा, बिर्ला, मोरारका अशा भांडवलदारांचे सामाजिक क्षेत्रातले योगदान उल्लेखनीय आहे. हे भांडवलदार स्वातंत्र्यपूर्व भारतातले होते. स्वातंत्र्योत्तर भारतात जो नवभांडवलदार वर्ग जन्मास आला तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आला. त्याला सरकारचे संरक्षण नव्हते. दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाचे अध्वर्यू रमेशचंद्र अग्रवाल हे स्वातंत्र्योत्तर भारतातील एक प्रमुख व्यावसायिक.

 

भांडवलशाहीसाठी पोषक वातावरण त्यांच्यापुढे नव्हते, पण आपण करत असलेल्या व्यवसायाबद्दल त्यांना नितांत आदर होता, त्यांच्यामध्ये साहस होते. आपल्या व्यवसायाचे भविष्य काय असेल याचे नेमके स्पष्ट चित्र होते व सोबत प्रागतिक विचारसरणीही होती. वर्तमानपत्र चालवण्यासारखा बेभरवशाचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला. वर्तमानपत्रे केवळ जाहिरातीवर चालत नाहीत तर ती सामाजिक प्रबोधन, रोखठोक राजकीय भूमिकांवर चालतात, हे मालक म्हणून त्यांना मान्य होते. वाचकाच्या वैचारिक विश्वाचा आवाका वाढवणे, त्याच्या जगाविषयीच्या जाणिवा अधिक प्रगल्भ करणे हे वृत्तपत्राचे खरे काम. रमेशचंद्र अग्रवाल यांनी याच ध्येयवादातून एका आवृत्तीच्या ६६ आवृत्त्या केल्या व भास्कर समूह देशातील एक प्रतिष्ठित व्यावसायिक समूह बनला. गुरुवारी त्यांच्या ७३ व्या जन्मदिवसाचे औचित्य साधून भास्कर परिवाराने त्यांच्या समाजोन्नतीच्या अपुऱ्या राहिलेल्या स्वप्नांना प्रत्यक्ष रूप देण्याचा मनोदय जाहीर केला. ‘रमेश व शारदा अग्रवाल फाउंडेशन’च्या माध्यमातून भास्कर परिवार ‘संस्कार विद्यानिकेतन’च्या माध्यमातून येत्या दोन वर्षांत तीन हजार गरीब मुलांना नि:शुल्क शिक्षण देणार आहे. त्याचबरोबर पुढील दोन वर्षांत देशातील विविध शहरांतील दोन हजार मुलींना या प्रकल्पात सामावून घेतले जाणार आहे. देशात वृद्धांच्या समस्या जटिल होत आहेत. मागील पिढी ही आपली मार्गदर्शक आहे याच दृष्टिकोनातून भास्कर समूह २० शहरांतील वृद्धाश्रम दत्तक घेणार आहे. या वृद्धाश्रमांच्या देखभालीचा सर्व खर्च हा समूह उचलणार आहे. तरुण उद्योजकांना केवळ प्रोत्साहन देऊन चालत नाही तर त्यांना साधनसुविधा देण्याची गरज आहे. या उद्देशातून हे फाउंडेशन व्यापारवृद्धीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. हयात असताना रमेशजींनी अनेक तरुणांची व्यवसायवृद्धीची धडपड पाहून त्यांना जातीने मदत केली होती. काही नवउद्योजकांना व्यवसायात यश मिळावे म्हणून त्यांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी वर्ग मदतीला दिला होता. त्यांचा पगार भास्कर समूहाकडून दिला जात होता, इतकी सहृदयता, उदारता त्यांच्यापाशी होती. भास्कर समूहाची मातृभूमी मध्य प्रदेश. या राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य प्रदेश जगाशी जोडला जाणार आहे. 


रमेशजी यांचे साधेपण ही त्यांच्या यशाची पावती होती. एका मोठ्या वृत्तपत्र समूहाच्या देशव्यापी ताकदीचा अहंकार त्यांना कधी शिवला नाही. आपण जे काही कमावतो त्यातील काही हिस्सा समाजाला दिला पाहिजे कारण सामाजिक कार्यात गुंतवणूक केल्याने समाज सशक्त होतो, या विचारांचे ते पाईक होते. आपण वृक्ष लावला आहे तो वटवृक्ष व्हायला पाहिजे असे ते म्हणत असत. पीक लावून व्यवसाय वाढत नाही असे ते निक्षून सांगायचे. वाचक हा आपला मालक असल्याने तो काय म्हणतोय ते आपण ऐकायचे, असे ते कायम आपल्या सहकाऱ्यांना सांगायचे. एकमेकांशी जोडले जाणे हे खरे जगणे असते कारण त्यामुळे निखळ सुसंवाद राहतो. ताकद मिळते, चैतन्य निर्माण होते, असे ते मानत असत. त्यांचे अपुरे स्वप्न हे तुम्हा वाचकांच्या प्रेमातून पूर्ण होणार आहे. तुमची साथ अशीच राहो.

बातम्या आणखी आहेत...