आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमवीर विराट ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट’ असे क्रिकेटमध्ये म्हटले जाते. नवाब पतौडी, अजित वाडेकर, कपिल देव, सुनील गावसकर, मोहंमद अझरुद्दीन, सौरभ गांगुली, महेंद्रसिंग धोनी अशी यशस्वी कर्णधारांची परंपरा भारतीय क्रिकेटने पाहिली आहे. या प्रत्येकाचा कालखंड वेगळा, त्यांचे वैशिष्ट्यगुण भिन्न. आता पुढचा मोठा कालखंड विराट कोहली याचा कर्णधार म्हणून निश्चित आहे. सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेिवरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ज्या पद्धतीने दोन सलग कसोटींमध्ये द्विशतके साजरी केली व अनेक विक्रम रचले ते पाहता यापुढचे क्रिकेटचे युग विराट कोहलीचे असेल यात शंका वाटत नाही. अत्यंत दुर्दम्य आशावाद व सामन्यावर एकहाती पकड याचा उत्तम संयोग विराटच्या शैलीतून दिसून आला. विराटची ओळख आजपर्यंत लढवय्या, आक्रमक आणि विजिगीषू अशा विशेषणांनी केली जात होती; पण या गुणी खेळाडूच्या खेळात महेंद्रसिंग धोनी (मिस्टर कूल), द्रविड (मिस्टर डिपेंडेबल) व गांगुली (मिस्टर अॅग्रेसिव्ह) अशा तिघांमधील गुणांचा संगम दिसून आला. समोरच्या खेळाडूला कसे निष्प्रभ वा नामोहरम करायचे याचे तंत्र विराटने गेल्या काही वर्षांत चांगलेच आत्मसात केलेले दिसते. वेगाने बॅट फिरवत व लवचिक मनगटाचा सुरेख वापर करत तो समोर आलेल्या चेंडूवर असा काही ताबा घेतो व चेंडूला अशा काही अंशातून फटकवतो की समोरचा गोलंदाज बुचकळ्यात पडायला हवा. उजव्या यष्टीवरचा चेंडू टाकण्याची चूक श्रीलंकेच्या गोलंदाजांनी या मालिकेत अनेक वेळा केली त्याची शिक्षा त्यांना मिळाली.  विराट पूर्वी ऑफ साइडला सहजगत्या खेळत असायचा. त्याचे कव्हर ड्राइव्ह, लॉँग ऑफच्या दिशेने मारलेले फटके त्याच्या खेळात नैसर्गिकरीत्या आले आहेत. पण त्याच्या नैसर्गिक शैलीला रोखणारे डावपेच २०१४च्या इंग्लंड दौऱ्यात इंग्लिश खेळाडूंनी यशस्वी करून दाखवले होते. या दौऱ्यातील पाच कसोटींच्या मालिकेत विराटने प्रत्येक कसोटीत कशाबशा ५० धावा जमवल्या. हा काळ विराटसाठी मोठा कठीण कालखंड होता. मीडियातून त्याच्यावर प्रचंड टीका होत होती. सचिन नुकताच निवृत्त झाला होता, पण सचिनच्या उत्तुंग कामगिरीचा प्रभाव भारतीय प्रेक्षकांवर गारूड करून होता. सचिनची जागा विराट घेऊ शकत नाही अशा चर्चा त्याही वेळेपासून सुरू होत्या. अशा काळात विराटने सचिनच्याच सल्ल्याने आपल्या शैलीत बदल केला. सचिनने त्याला असा सल्ला दिला होता की,  पुढचा गोलंदाज तेजगती असो वा फिरकी, त्याच्यापुढे पवित्रा एकच एक ठेवायचा. चेंडूला वेग असो वा तो स्विंग होत असेल, या चेंडूच्या गतीत बदल होण्याअगोदर त्याच्यावर ताबा घ्यायचा व तो फटकावायचा. चमत्कार असा झाला की, पुढील दौऱ्यात विराटने सहजपणे सलग चार शतके लगावली. आपल्या खेळीत एवढा अंतर्बाह्य व  कमालीचा विस्मयकारी बदल विराटने करून दाखवला. श्रीलंकविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत बहरलेला कोहली हा त्याने त्यांच्या तंत्रात केलेल्या बदलामुळे आपल्याला पाहायला मिळाला. त्याची बॅट आता बहुश्रुत झाली असे म्हणावे लागेल. तो एकाच वेळी पारंपरिक क्रिकेट खेळू शकतो, मोठ्या धावा उभ्या करू शकतो, त्याचबरोबर तो ऑन व ऑफसाइडवर हुकूमत दाखवत नियंत्रित व विध्वंसकही खेळी करू शकतो. 


श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यात विराटमधील कर्णधार म्हणून एक गुण दिसून आला तो त्याच्या कामगिरीतील सातत्याचा, त्याने घेतलेल्या मेहनतीचा. त्याने अवघ्या १७ महिन्यांच्या कालावधीत सहा द्विशतके झळकवली आहेत. त्यामुळे कसोटीत कर्णधार म्हणून सहा द्विशतके झळकावणारा विराट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिलाच फलंदाज बनला आहे. वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व कर्णधार ब्रायन लारा याचा विक्रम त्याने मोडीत काढला, त्यावरून विराटचे यश किती अनन्यसाधारण आहे हे लक्षात येते. विराट हा प्रतिभावान खेळाडू असला तरी त्याचा फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. त्या जोरावर त्याने आता खेळावर मांड ठोकली आहे असेच म्हणावे लागेल. सध्याचे क्रिकेट कसोटी, एकदिवसीय सामने व ट्वेंटी-२० अशा तीन प्रकारांत खेळले जाते. ते वेगवान झाले आहे. पण बहुसंख्य खेळाडू तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी दाखवू शकत नाहीत. त्याचे कारण फिटनेसची कमतरता. पण विराट याला अपवाद ठरला. सचिन जसा तासन््तास नेटमध्ये सराव करत राहायचा तसे विराटचे आहे. (म्हणून तो बीसीसीआयवर गेल्या आठवड्यात खेळाडूंना सरावासाठी वेळ मिळत नाही म्हणून रागावला होता.) खाण्यापिण्याच्या बाबतीत अत्यंत दक्ष, फिटनेसकडे लक्ष व आपला खेळ सर्वोत्तम व्हावा ही धडपड या बळावर आता विराटची आगेकूच क्रिकेटमधील विक्रम मोडण्याकडे सुरू झाली आहे. त्याच्या पुढच्या अनेक इनिंग्ज क्रिकेटमधील रोमहर्षक इनिंग्ज असतील.

बातम्या आणखी आहेत...