आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याभिषेक आणि आव्हाने ( अग्रलेख )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुल गांधी यांचा अपेक्षेप्रमाणे बिनविरोध राज्याभिषेक झाला. गांधी घराण्याला आव्हान देण्याची परंपरा काँग्रेसमध्ये रुजलेली नाही. ज्यांनी आव्हान दिले त्यांचे काय झाले हे इतिहासाने दाखवून दिले आहे. काँग्रेसची एक स्वत:ची पद्धत आहे. लोकशाहीअंतर्गत घराणेशाही हे त्याचे स्वरूप आहे. सरंजामी वृत्तीच्या भारतीय माणसाला लोकशाहीचा बुरखा व सरंजामशाहीचा कारभार यामध्ये काही विसंगती आहे, असे वाटत नाही. यामुळे काँग्रेससह सर्व पक्षांतील सरंजामी नेतृत्व तो पटवून घेतो. प्रत्येक पक्षाचा एक सरदार आहे व त्याची इच्छा हीच पूर्व दिशा आहे. कम्युनिस्ट थोडे अपवाद. पण तेथेही एकाची हुकुमत असतेच. तरीही काँग्रेसमधील घराणेशाही व भाजपमधील सरंजामशाही यामध्ये फरक आहे. भाजपमध्ये नवे सरदार पक्षावर पकड बसवू शकतात. अनेकांना गादी चालवण्याची संधी मिळू शकते. काँग्रेसमध्ये तशी संधी नाही. गांधी घराण्याशिवाय अन्य कोणालाही गादीचा हक्क नाही. मोतीलाल नेहरू यांची इच्छाच तशी होती व ती आजही पूर्ण होत आहे. अर्थात यामुळे देशाचे फार काही बिघडले असे नाही. लोकांना हे घराणे मान्य आहे आणि हे घराणे निवडणुकीला सामोरे जाऊन लोकांकडून आपल्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून घेते. निवडणुकीची परीक्षा देण्यास गांधी घराण्याने कधी टाळाटाळ केली नाही. हा सर्व इतिहास व भारतीय मनोवृत्ती लक्षात घेता राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकावर भाजपने कडवट प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती. मोदी यांनी तर बोलायलाच नको होते. तथापि, काँग्रेस व त्यातही राहुल गांधी म्हटले की भाजपच्या अस्तन्या वर होतात व विनाकारण वाद झडतात. त्यात नुकसान भाजपचेच होते, पण भाजपच्या ते लक्षात येत नाही. 


खरे तर जानवेधारी हिंदू काँग्रेसच्या अध्यक्षपदी येणार, याचे भाजप व संघ परिवाराने स्वागत करायला हवे होते. राहुल गांधी जानवेधारी हिंदू आहेत, अशी स्पष्ट कबुली काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला यांनी दिली. त्यावर काहीच प्रतिक्रिया उठली नाही. असेच वक्तव्य समजा भाजप अध्यक्षाबद्दल भाजप वा संघाच्या प्रवक्त्यांनी केले असते तर गदारोळ माजला असता व मनुचे राज्य आल्याची ओरड माध्यमांतून झाली असती. जानवेधारी हिंदू असूनही राहुल गांधी वा काँग्रेसविरोधात अशी प्रतिक्रिया का उठत नाही, याचा विचार भाजप व संघ परिवाराने केला पाहिजे. याचा विचार न केल्यामुळेच भाजपची वैचारिक व राजकीय कोंडी होत आहे. जानवेधारी हिंदू असा राहुल गांधी यांचा उल्लेख हा अनवधानाने झालेला नाही. बदलत्या काळानुसार काँग्रेसने घेतलेला हा मुखवटा आहे. सोनिया गांधींच्या काळात हिंदूविरोधी पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा होत गेली. ही प्रतिमा पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरली, असे अँथनी समितीच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले होते. हिंदूविरोधी पक्ष ही प्रतिमा बदलण्याचा राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केला. देवळांच्या भेटी व दंगलीबद्दल मौन ही याची दोन मुख्य उदाहरणे. हा बदल महत्त्वाचा आहे. काँग्रेसच्या वाटचालीवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो व भाजपची डोकेदुखी त्यातून वाढू शकते.  


तथापि, वरकरणी केलेला हा बदल राहुल गांधी यांचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी पुरेसा ठरणार नाही. काँग्रेसमध्ये चैतन्य आणण्यासाठी त्यांना नवा विचार पक्षासाठी द्यावा लागेल. ती क्षमता त्यांच्याकडे आहे का, याची शंका आहे. आजपर्यंत त्यांचा प्रचार हा काँग्रेसच्या परंपरागत पद्धतीने सुरू आहे. मोदींची मिजास, भाजपचे फसलेले माध्यमांचे व्यवस्थापन व नोटबंदी तसेच जीएसटीचे खरे फायदे काय हे लोकांपर्यंत पोहोचवण्यात मोदींना आलेले मोठे अपयश हे घटक राहुल गांधींना मिळत असलेल्या प्रतिसादाला कारणीभूत आहेत. मात्र, या पलीकडे जाऊन नव्या काळानुसार काँग्रेसला नवे विचार राहुल गांधी देऊ शकतील काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. अर्थात राहुल गांधींकडे अशी वैचारिक क्षमता नसली तरी त्यांना मदत करण्यासाठी काँग्रेसकडे अनेक चांगले नेते आहेत. राहुल गांधींनी डोळे उघडे ठेवले व सुज्ञपणा दाखवला तर या नेत्यांकडून मिळणाऱ्या सल्ल्यांचा ते उपयोग करून घेऊ शकतात. पण आंग्लाळलेल्या व कालबाह्य विचारसरणी रेटण्याची धडपड करणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार परिषदेचा सोनिया गांधीरचित प्रयोग राहुल गांधींनी करु नये. अन्यथा काँग्रेस पुन्हा अडचणीत येईल. माध्यमे व स्वयंसेवी संस्था यांच्याबद्दलची तुसडी वृत्ती मोदी-शहा यांना सध्या महागात पडते आहे. पण माध्यम व संस्थास्नेह वाढल्यामुळेही काँग्रेस अडचणीत आली याचा विसर राहुल गांधींना पडू नये. त्यांना स्वतंत्र विचार करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...