आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial Column On Insurance Sector

देर आये, दुरुस्त आये....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमा क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची तीव्र आवश्यकता होती. आता विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्के केल्याने अर्थव्यवस्थेत थेटपणे सुमारे 25 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक होणार आहे.
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीची मर्यादा 26 टक्क्यांवरून 49 टक्के वाढवण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे स्वागत करायला हवे. आता या संदर्भातील विधेयक सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडले जाईल व या निर्णयाला काँग्रेसचाही पाठिंबा असल्याने हे विधेयक बिनविरोधही संमत होऊ शकते. देशाच्या विमा क्षेत्राची सध्याची परिस्थिती पाहता या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची तीव्र आवश्यकता होती. कारण या एकाच निर्णयामुळे अर्थव्यवस्थेत थेटपणे सुमारे 25 हजार कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक होणार आहे. या निर्णयाची नितांत गरज होती व केंद्रात प्रबळ सत्ता आल्याने हा निर्णय तत्परतेने घ्यायलाच हवा होता. एका आकडेवारीनुसार देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 0.78 टक्के लोक जनरल इन्शुरन्सचा लाभ घेत असून 10 वर्षांपूर्वी हे प्रमाण 0.67 टक्के एवढेच होते. म्हणजे दहा वर्षांत या व्यवसायाचा पसारा असा वाढलेलाच नाही. त्याचबरोबर जीवन विमा घेणार्‍यांची आकडेवारीही फारशी उत्साहवर्धक नाही. आशिया खंडात सुमारे 4.1 टक्के लोक जीवन विमा घेतात तर भारतातील हे प्रमाण 3.2 टक्के एवढेच आहे. ही आकडेवारी कमी असण्याचे कारण भारतातील कष्टकरी, मजूर, शेतकरी, कामगारवर्ग हा मोठ्या प्रमाणात विखुरलेला व असंघटित आहे. त्यामुळे या मोठ्या वर्गाला विमा संरक्षणाचे कवच नाही. महत्त्वाचे म्हणजे विमा या संकल्पनेबाबत शंका व संशयच अधिक असल्याने व काही विमा एजंटांकडून आलेल्या वाईट अनुभवामुळे या क्षेत्राबाबत गैरसमज अधिक पसरले आहेत. मधल्या काळात सरकारने विमा नियंत्रक व विकास प्राधिकरणाची स्थापना करून विमा क्षेत्रातील बर्‍याच अपप्रवृत्तींना आळा घातल्याने हे चित्र बदलले आहे. या पार्श्वभूमीवर आता नव्या विदेशी कंपन्या, नव्या कल्पनेसह भारतीय बाजारपेठेत उतरल्याने ग्राहकांना त्याचा फायदाच होणार आहे व महत्त्वाचे म्हणजे लोकांना बचतीची सवय लागून अर्थव्यवस्था सशक्त होऊ शकते.