आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगे वेगे धावू...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युसेन बोल्टचे यश हे अनेक क्रीडातज्ज्ञ वांशिक अंगाने बघतात. धावण्याच्या स्पर्धेत गो-यांपेक्षा कृष्णवर्णीय खेळाडूंनी नेहमीच सरस कामगिरी केली आहे. यात पश्चिम आफ्रिकन, कॅरेबियन व ब्रिटनमधील कृष्णवर्णीयांचा समावेश आहे.
ऑलिम्पिकमध्ये भाग घेणा-या खेळाडूंच्या शारीरिक क्षमतांबाबत चर्चा होत असतात. या स्पर्धांमध्ये भाग घेणा-या सर्व खेळाडूंनी किमान शारीरिक क्षमतांचे निकष पार केलेले असतात. असे असले तरी प्रत्येक विजेता असलेल्या प्रत्येक खेळाडूचे स्वत:चे शारीरिक वैशिष्ट्य असते, त्याची मेहनत व त्याचे तंत्र वेगळे असते. अमेरिकेच्या ऑलिम्पिक कमिटीमधील फिजॉलॉजिस्टच्या मते ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू व चौथा क्रमांक मिळवणा-या खेळाडूच्या कामगिरीत फार मोठे अंतर नसते; पण सुवर्णपदक मिळवणा-या खेळाडूकडे जो फिटनेस असतो तो नक्कीच महत्त्वाचा असतो. हा फिटनेस नेमका काय असतो? फिजिओलॉजिस्टांच्या मते सुवर्णपदक मिळवणा-या खेळाडूच्या शरीरांचे स्नायू इतरांपेक्षा अधिक ऑक्सिजन ग्रहण करतात व त्यांच्या स्नायूमध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड इतरांच्या तुलनेत कमी स्रवते. खेळाडूंच्या फिटनेसचे स्वरूप त्याच्या शरीरातील ऑक्सिजन ग्रहणक्षमतेवरून (व्हीओ-2 मॅक्स) मोजले जाते. प्रत्येक खेळाडू आपल्या वजनाच्या प्रति किलो, प्रति मिनिट किती मिलिमीटर ऑक्सिजन ग्रहण करू शकतो यावरून व्हीओ-2 मॅक्सची टक्केवारी काढली जाते. सर्वसाधारणपणे एका व्यक्तीची दिवसाला 30 ते 35 टक्के ऑक्सिजन ग्रहण करण्याची टक्केवारी असते तर ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या पण सर्वात टॉपच्या खेळाडूंमध्ये हेच प्रमाण 75 टक्क्याच्या आसपास असते. अमेरिकेच्या सायकलपटूंमध्ये हे प्रमाण 82 ते 85 टक्के इतके आहे. जगप्रसिद्ध सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँगने 90 टक्के इतका आकडा गाठला होता. पण व्हीओ 2 मॅक्सद्वारेच उत्तम अ‍ॅथलिट असे काही ठरू शकत नाही. अनेक धावपटू आणि जलतरणपटू शरीरात कमी ऑक्सिजन घेऊन स्पर्धा जिंकतात व विश्वविक्रम प्रस्थापित करतात.
लंडन ऑलिम्पिकमध्ये तीन सुवर्ण पदके मिळवणारा जमैकाचा धावपटू युसेन बोल्ट याची शारीरिक संपदा थक्क करणारी आहे. बोल्टने लंडन ऑलिम्पिकमध्ये 100 मी. धावण्याची स्पर्धा 9.63 सेकंदांत जिंकून सुवर्णपदक पटकावले. बोल्टच्या नावावरच 9.58 सेकंदांचा विश्वविक्रम आहेच; पण बोल्टच्या ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर माणूस आणखी किती वेगाने धावू शकतो, तो चित्त्यापेक्षा वेगाने धावू शकतो का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. अमेरिकेचा धावपटू जेम्स हिन्स याने 1968 च्या मेक्सिको ऑलिम्पिकमध्ये 10 सेकंदांच्या आत 100 मी. धावण्याची स्पर्धा जिंकून विश्वविक्रम केला होता. त्या वेळी त्याची कामगिरी 9.95 सेकंद अशी होती. जेम्स हिन्सचा हा विक्रम पुढे 28 वर्षे कायम होता. नंतर तो कार्ल लुईसने मोडला; पण युसेन बोल्टने लुईसपाठोपाठ इतर अन्य खेळाडूंना मागे टाकत या पृथ्वीवर सर्वात वेगवान धावपटू (29 मैल/तास) होण्याचा मान मिळवला आहे. वास्तविक या पृथ्वीवर सर्वात वेगवान प्राणी हा चित्ता असून (70 मैल/तास) त्याच्यानंतर इम्पाला हे काळवीट (50-60 मैल/तास), शर्यतीतील घोडा (45-50 मैल/तास), ग्रेहाऊंड जातीचे कुत्रे (40 मैल/तास) यांच्यानंतर युसेन बोल्टचा क्रमांक लागतो.
युसेन बोल्टचे यश हे अनेक क्रीडातज्ज्ञ वांशिक अंगाने बघतात. आतापर्यंतच्या वेगाने धावण्याच्या स्पर्धेत गो-या वंशापेक्षा कृष्णवर्णीय खेळाडूंनी नेहमीच सरस कामगिरी केली आहे. ही सरस कामगिरी करण्यामध्ये पश्चिम आफ्रिकन वंशाचे, कॅरेबियन व ब्रिटनमधील कृष्णवर्णीयांचा समावेश आहे. या प्रदेशातील खेळाडूंच्या जनुकांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या खेळाडूं्चे धावताना स्नायू वेगाने आकुंचन आणि प्रसरण पावतात. त्यामुळे रक्तातील साखरेतून प्रचंड ऊर्जा तयार होते व खेळाडूंची धावण्याची क्षमता वाढते. पश्चिम आफ्रिकन देशातील खेळाडूंचा दबदबा असण्याची दुसरी थेअरी अशी आहे की, अमेरिका खंडात 17 व्या शतकात बरेचसे गुलाम पश्चिम आफ्रिकेतून आणले जात असत. या गुलामांकडून गुरांसारखी कष्ट आणि मेहनतीची कामे करून घेतल्यामुळे त्यांच्या पुढील पिढ्यांच्या जनुक रचनेत बदल घडून आले. खुद्द युसेन ही थेअरी मानतो. बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने, जमैकामध्ये गुलाम म्हणून नांदणा-या अनेक पिढ्यांमधील आपण एक असल्याचे म्हटले होते; पण आफ्रिकेच्या इतर भागातून वेगवान धावपटू ऐवजी मॅरेथॉनपटू जन्माला येण्याचे कारण जरा वेगळे आहे. साधारणपणे केनिया, इथिओपिया या देशातील खेळाडूंची मॅरेथॉन किंवा लांब पल्ल्याच्या शर्यतीत मक्तेदारी असते. त्याचे कारण या प्रदेशातील खेळाडूंची उंची अधिक असते, ते सडपातळ असतात आणि त्यांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता अधिक असते. युसेन बोल्टची उंची 6 फूट 5 इंच अशी असल्याने तो खरा तर 400 मी. शर्यतीसाठी योग्य धावपटू ठरला असता असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे; पण युसेन बोल्टने या तज्ज्ञांना आपल्या अविश्वसनीय ताकदीच्या जोरावर खोटे ठरवले आहे. ज्या वेगाने सध्या युसेन बोल्ट पळतो आहे ते बघता त्याने आपल्याला मेहनतीत सुधारणा केल्या किंवा तंत्रात बदल केल्यास तो 100 मी.ची शर्यत 9.48 सेकंदांत पार करू शकतो, असे स्टॅनफर्ड विद्यापीठातील मार्क डॅनी यांचा अंदाज आहे. युसेन बोल्टकडून ही अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही.