आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial, Columns, Olympic Vision

‘रिओ’ची तयारी आजपासूनच हवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सगळे असूनही आपल्या मुलाला खेळाडू बनवण्याची मानसिक तयारी आई-वडील करू शकत नाहीत, ते ‘स्पोटर्स कल्चर’ भारतात अजून निर्माण झालेले नाही. लंडनच्या नेत्रदीपक कामगिरीनंतर आजपासूनच 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी तयारी सुरू करावी लागेल.
आमचे सहा ऑलिम्पिकवीर ‘जग’ जिंकून परत आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात भारताची मान इतकी उंच कधीच झाली नव्हती. एकही सुवर्णपदक मिळाले नसले तरी आमच्या 80-82 खेळाडूंच्या मोठ्या चमूने पहिल्यांदाच इतकी पदके जिंकली. सध्या देशभरातून त्यांच्यावर पैशाचा पाऊस पडतोय. स्वागत समारंभ, कौतुक सोहळे झडताहेत. एकूणच देशात गेले 15-20 दिवस चोहीकडे खेळांबद्दल उत्कंठा आकर्षण, प्रेम व वेगळाच उमाळा दाटून आलेला दिसतोय. तो निश्चितच हृद्य म्हणायला हवा. पैशाचा असा रतीब नेहमी क्रिकेटवाल्यांसाठी घातला जातो. त्यामुळे या सहा लंडन-बहाद्दरांचे होणारे सार्वत्रिक कौतुक, त्यांना मिळणारे भूखंड, बढत्या वगैरेमुळे देशात वेगळाच; परंतु स्वागतार्ह माहौल निर्माण झाला आहे. सरकार व खासगी क्षेत्रांनी आमच्या ऑलिम्पिक चमूला ब-यापैकी आर्थिक मदत केली होती. स्पोर्ट्स ऑथोरिटी ही सरकारी संस्था 1982च्या एशियाडनंतर जन्मास आली. ही संस्था व खासगी क्षेत्रातील मित्तल चॅम्पियन्स ट्रस्ट किंवा ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट आदींनी मिळून कोट्यवधी रुपये खर्च केले, तेव्हा कुठे आम्हाला सहा पदके जिंकता आली. 2009 मध्ये 678 कोटी आणि 2011 मध्ये 258 कोटी रुपये खेळाडूंचे प्रशिक्षण, राहण्या-जेवणाचा खर्च, परदेशातील स्पर्धांमध्ये सहभाग आणि सरावासाठी क्रीडा मंत्रालयाने दिले होते. आजपर्यंत सरकारने खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी दिलेली ही सर्वाधिक आर्थिक मदत आहे. खासगी क्षेत्र, सैन्य व इतर संस्थांनी दिलेली मदत वेगळीच...
अमेरिका (104) आणि चीन (88) यांची लंडनमधील कामगिरी आणि त्याआधी बीजिंगमधील कामगिरी (अमेरिकेची 110 आणि चीनची 100 पदके) कधीही नेत्रदीपकच म्हणावी लागेल. पदक तालिकेच्या शेवटी असलेले युगांडा, व्हेनेझुएला किंवा ट्युनिशिया, बहामा या देशांपेक्षा आम्ही केव्हाही सरसच ठरलो; परंतु मेडल जिंकणे महत्त्वाचे असले तरी मेडलच्या अपेक्षेने प्रचंड ताकद लावून, सातत्यासाठी अनेक वर्षे खेळत राहणे हे तरी काय कमी आहे? जो खेळाडू चौथा आला त्याला, त्याच्या मेहनतीला किंवा त्याच्या कुटुंबाला कमी लेखणे कितपत योग्य आहे, हा प्रश्नही लंडन कामगिरीचा ताळेबंद मांडताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
भारत हा क्रिकेटवेडा देश आहे. येथे क्रिकेटपटूला देव मानले जाते. क्रिकेटमधील मोठा पैसा, अनेक स्पर्धा, मोठे प्रायोजक यामुळे इतर खेळांची उपेक्षा होते ही बाब खरी आहे. अनेक वर्षांपूर्वी जगज्जेत्या मायकल परेराने ही गोष्ट मला बोलून दाखवली होती. पुढे मिल्खा सिंग, पी. टी. उषा किंवा अनेक भारतीय हॉकीपटूंनीही ही वेदना व्यक्त केली होती. अर्थात, क्रिकेटेतर खेळांकडे सरकारचे लक्ष आहे आणि त्यातही आपले खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात हे पहिल्यांदा सिद्ध झाले आहे. आता 100-125 कोटींच्या देशाने फक्त 6 पदके आणि त्यात एकही सुवर्णपदक न जिंकणे हे कितपत योग्य आहे, इतका पैसा खर्च करून 80-85 खेळाडूंनी मिळून 6 पदके आणली यावर लगेच टीकाही सुरू झाली आहे. ती योग्य आहे का? ही सहा पदके जिंकणे इतके सोपे आहे का? स्वतंत्र भारतात अन्न, वस्त्र, निवाºयाचे प्रश्न 65 वर्षांनंतरही सुटलेले नाहीत. रस्ते, वीज, पाणी, दोन वेळचे जेवण, औषधे आणि शिक्षणाच्या सुविधा या मुद्द्यांवर अजूनही निवडणुकांमध्ये मते मागितली जातात. या पार्श्वभूमीवर लंडनमध्ये मिळालेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे.
एखाद्या शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्याला जर विचारले की, तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? तर डॉक्टर, इंजिनिअर, कॉम्प्युटर सायंटिस्ट, फॅशन डिझायनर, आर्किटेक्ट किंवा वकील, सीए किंवा एमबीए होणार हेच ऐकायला मिळते. ‘मी बास्केटबॉलपटू, फुटबॉलपटू किंवा जलतरणपटू होऊन देशाचे नाव मोठे करणार’, असे स्वप्न सातवी-आठवीतील मुलीने किंवा मुलाने पाहिले असे क्वचितच घडते. हा दोष या मुलांचा आहे की पालकांचा, की आमच्या शिक्षण पद्धतीचा? भारतातील शिक्षण पद्धतीत इतके दोष आहेत की फक्त पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणानंतरही आज उच्चपदावर नोक-या मिळत नाहीत. पदवीधर मुलांचे ज्ञान आजच्या शिक्षण पद्धतीतील खाच-खळग्यांमुळे अनेकदा अपुरे पडते. तरीही नोकरीसाठी डिग्री हवी (ज्ञान नसले तरी चालेल) आणि ती कुठल्याही मार्गाने मिळवणे हेच एकमेव ध्येय प्रत्येक मुलाच्या डोक्यात असते. प्रकाश पदुकोणने 1980 मध्ये जेव्हा इंडोनेशियाच्या लीम स्वी किंगला हरवून ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती तेव्हा आम्हाला ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळाल्यासारखेच वाटले होते, परंतु त्यानंतर देशात बॅडमिंटन प्रचंड लोकप्रिय खेळ बनला, असे घडले नाही. आता काही वर्षांपासून सायना नेहवाल भारताची बॅडमिंटनमधील ओळख आहे आणि तिने कांस्यपदक जिंकल्यामुळे बॅडमिंटनला मानाचा तुरा मिळाला आहे; पण म्हणून लगेच असंख्य पालक आपल्या मुलींना बॅडमिंटन खेळायला पाठवतील, असा समज वेडेपणाचा ठरेल.
एकूण काय, तर भारतात सगळे असूनही आपल्या मुलाला किंवा मुलीला खेळाडू बनवण्याची मानसिक तयारी आई-वडील करू शकत नाहीत, कारण ते ‘स्पोटर्स कल्चर’ भारतात अजून निर्माण झालेले नाही. लंडनच्या नेत्रदीपक कामगिरीनंतर आता सरकारला आजपासूनच 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी प्रचंड तयारी सुरू करावी लागेल. खेळात राजकारण न आणता, उत्तम प्रशिक्षणाची व्यवस्था करून कशात आपली कामगिरी उत्कृष्ट राहील त्याकडे लक्ष द्यावे लागेल या पार्श्वभूमीवर खेळात करिअर करण्याचा विचार करणे अजूनही दुरापास्तच म्हणावे लागेल. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले नाही म्हणून आपल्या खेळाडूंवर आपण सोयिस्कररीत्या टीका करतो; परंतु त्यांना मैदान, तलाव, चांगला प्रशिक्षक, अनुकूल वातावरण आणि समाजात इतरांना मिळणारी प्रतिष्ठा मिळवून देण्याची आमची तयारी नाही. मोकळे मैदान दिसले रे दिसले की ते राजकारणी किंवा बिल्डरच्या नजरेत भरते आणि तमाम नियम लीलया मोडून तेथे इमारत उभारली जाते. मुंबई, दिल्ली, रांची, भोपाळपासून पुणे-बंगळुरूपर्यंत सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. मोठ्या शहरांमध्ये किमान दोन-तीन पोहण्याचे तलाव, एखादा अ‍ॅथलेटिक्सचा अद्ययावत ट्रॅक किंवा फुटबॉलची एखाद्-दोन मैदाने असतात. बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेबल टेनिससाठी एखादा हॉल असतो. हॉकीच्या अ‍ॅस्ट्रो टर्फची तर वानवाच आहे. केपीएस गिल जेव्हा इंडियन हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा (1995) पहिल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घोषणा केली होती की, फेडरेशन देशभरात 100 अ‍ॅस्ट्रोटर्फ लावील. त्यातील अर्धे अ‍ॅस्ट्रोटर्फही आज 15 वर्षांनंतर पूर्ण देशात लागले नसतील.
तात्पर्य काय, तर ऑलिम्पिकमध्ये सातत्याने पदके जिंकणारी राष्ट्रे आणि भारतात खेळांची संस्कृती या निकषांवर कुठलीच बरोबरी होऊ शकत नाही. चीन आणि भारत यांची लोकसंख्या या निकषावर अनेक तज्ज्ञ तुलना करतात. गेल्या अनेक वर्षांत भारत व चीन यांच्यातील अर्थशास्त्रीय व सामाजिक तफावत दाखवण्याची जणू चढाओढ अर्थतज्ज्ञांमध्ये लागली असावी, अशी पुस्तके बाजारात येत आहेत, पण फारच कमी लोकांना माहीत आहे की, कम्युनिस्ट चीनमध्ये खेळाची वेगळीच संस्कृती आहे. शीतयुद्ध संपण्याआधी जर्मनी, रशिया, पोलंडमध्ये अशीच संस्कृती होती. चीनमध्ये पहिले ऑलिम्पिक होणार हे सन 2000 मध्ये ठरल्यानंतर आठ वर्षांत चीनने ‘प्रोजेक्ट-119’ अंतर्गत 119 पदके जिंकण्याची योजना आखली. हजारो अकादमींचे जाळे उभारले आणि देशात खेळाडूंना व प्रशिक्षकांना मानाचे स्थान दिले.
लंडनमध्ये भारताचे जे खेळाडू चौथ्या व पाचव्या क्रमांकांवर आले त्यांचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, कुटुंबांचे सांत्वन व त्यांचा सन्मान करणेही समाजाचे व सरकारचे कर्तव्य आहे. पदक जिंकणा-याचे कौतुक व इतरांची उपेक्षा, यातून क्रीडा-संस्कृती निर्माण होणार नाही. मेरी कोम किंवा सुशीलकुमार ज्या प्रकारच्या कुटुंबांतून इथपर्यंत आले आहेत अशा अनेक कुटुंबांना प्रोत्साहनाची, पैशाची, कौतुकाची आणि प्रशिक्षणाची गरज आहे. आपल्या समाजात खेळाला असामान्य महत्त्व प्राप्त झाले तरच ही वाटचाल पुढे सुरळीत होईल. रिओमध्ये 12 किंवा 24 पदके हवी असतील तर देशात किती लोक रोज खेळतात आणि त्यांना सरकार किंवा समाजातर्फे काय सुविधा मिळतात हे बघणेही आवश्यक आहे.