आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवालाच आव्हान! (अग्रलेख)

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या ‘विश्वाचा आकार केवढा’ हा प्रश्न केशवसुतांना पडला तेव्हा, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, आइन्स्टाइनचा सिद्धांत मांडलाही गेला नव्हता! फक्त ‘आकाराचा’ प्रश्न नव्हता, तर विश्वनिर्मितीचेच गूढ सर्व वैज्ञानिकांना झपाटून टाकत होते. केशवसुत वैज्ञानिक नव्हते-त्यांचा तर आधुनिक विज्ञानाचा शास्त्रशुद्ध अभ्यासही नव्हता. पण असे म्हणतात की जे कवीला दिसू शकते ते रवीला, म्हणजे सूर्यालाही दिसू शकत नाही! म्हणून केशवसुतांनी ‘विश्वाचा आकार केवढा’ या प्रश्नाचे उत्तर ‘ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!’ असे देऊन त्यांच्यापुरता प्रश्न मिटवून टाकला. परंतु वैज्ञानिकांना कवी मंडळींप्रमाणे प्रश्न टाळून चालत नाही. विश्वनिर्मितीच्या शोधाला आइन्स्टाइनच्या सिद्धांतानंतर (1905) अधिकच वेग प्राप्त झाला. ऊर्जेचे पदार्थात आणि पदार्थाचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकते; कारण ते दोन्ही एकाच मूळ ‘शक्ती’चे आविष्कार आहेत, असे आइन्स्टाइनने म्हटले आहे. परंतु मुद्दा हा होता की ही विश्वनिर्मिती झाली कशी? तिच्यातील ऊर्जा व पदार्थ हे कसे आले? वगैरे अनेक प्रश्न होते. अध्यात्मवाद्यांनी ईश्वर-परमेश्वर-देव-अल्ला वगैरे संकल्पना मांडल्या, पण विश्वनिर्मितीचे रहस्य त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनातून उलगडले जाणे शक्य नव्हते. साहजिकच शोध चालूच राहिला (व अजूनही राहील). परंतु त्या शोधाच्या महाप्रवासातील एक मोठा टप्पा आता पार पडल्याचा दावा युरोपीय वैज्ञानिकांनी केला आहे. (विश्व एकच आहे की अनेक, आणि अनेक म्हणजे किती आणि त्यांचा आकार व विस्तार किती, यावर संशोधन व गणिती मांडणी केली जात आहेच. असो.) विशेष म्हणजे, विश्वनिर्मितीच्या या रहस्याचा भेद ‘गॉड पार्टिकल’ या संज्ञेचा आधार घेऊनच केला आहे. आइन्स्टाइन असे म्हणे, जोपर्यंत मानवी जिज्ञासा जिवंत आहे तोपर्यंत विश्वनिर्मितीचे गुह्य उलगडणे मानवी मेंदूला शक्य आहे. त्याने एक उदाहरण दिले. तो म्हणतो, घड्याळाचे काटे फिरताना आपणास दिसतात. त्याची टिकटिक ऐकू येते. त्यातून वेळ कळते. पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्या डोळ्याला घड्याळाचे अंतरंग दिसते, त्याची रचना कळते. विश्व असे घड्याळासारखे आहे. विश्व जसे दिसते तसे ते असत नाही. मानवी मेंदूच्या प्रयत्नातून विश्वाची रचना मांडता येऊ शकते. पण हीच रचना एकमेव सत्य आहे असे विज्ञान मानू शकत नाही. मानवी आकलनात असलेल्या विश्वासंबंधी (म्हणजे आपल्या सूर्यमालिकेबाबत) आपण काही बोलू शकतो. पण या अथांग पसरलेल्या ब्रह्मांडात अशी अनेक अब्जावधी विश्वे आहेत, की जेथे मानवाने शोधलेले भौतिकी सिद्धांत लागू पडतील का, हा प्रश्न आहे. पण मानवी जिज्ञासा आणि प्रतिभेने ब्रह्मांड निर्मितीच्या शक्यता मात्र मांडल्या जाऊ शकतात. त्याची गृहीतके, त्याची गणिते मांडली जाऊ शकतात. आज 21व्या शतकाच्या दुस-या दशकात भौतिक शास्त्रज्ञांनी हिग्ज बोसॉन या विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडणा-या कणाचे पुरावे मिळाले असल्याचा दावा केला आहे. या दाव्याचा थोडक्यात अर्थ असा आहे की हे विश्व मूलकणांनी बनलेले आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी जो महास्फोट झाला, त्या वेळी अनेक अतिसूक्ष्म कण फेकले गेले. या अतिसूक्ष्म कणांपैकी काही कणांमुळे आपल्या सूर्यमालेतील तारे, ग्रह व पृथ्वीवरील सृष्टी तयार झाली. काही कणवादी भौतिकवाद्यांनी हे विश्व कणांपासून बनल्याचे स्टँडर्ड मॉडेल 40 वर्षांपूर्वी मांडले होते. या मॉडेलनुसार विश्वनिर्मितीवेळी जे काही कण फेकले गेले, त्यापैकी काही कण (बोसॉन) हे अधिक वस्तुमानाचे होते. या कणांना कोणताही विद्युत भार नव्हता. ते रंगहीन, वासहीन होते. या कणांची शक्यता एडिनबर्ग विद्यापीठातील भौतिक शास्त्रज्ञ डॉ. पीटर हिग्ज यांनी अनेक गणिती आकड्यांनी मांडली होती. त्यांच्या मते विश्वनिर्मितीचा स्फोट झाल्यानंतर अवकाशात मूलकणांचे साम्राज्य पसरले होते. हे मूलकण डोळ्यांना दिसत नसले वा ते वासहीन असले तरी या कणांमधून इतर सूक्ष्म कणांची निर्मिती होत होती. या सूक्ष्म कणांवर जर अन्य कणांचा मारा केला तर त्यातून ऊर्जा निर्माण होते. जसे फोटॉन या मूलकणांमधून प्रकाश निर्माण होतो, त्याप्रमाणे हिग्ज बोसॉनमधूनही ऊर्जेची निर्मिती होते. त्यांच्या या गृहीतकाचा पडताळा पाहण्यासाठी युरोपियनऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च (सर्न) या संस्थेने स्वित्झर्लंड-फ्रान्स सीमेवर जमिनीखाली 330 फूट अंतरावर हा महाप्रयोग केला होता. या प्रयोगासाठी अतिउच्च ऊर्जेचे प्रोटॉन एका मोठ्या लार्ज हार्डन कोलायडरमध्ये परस्परांवर आदळवले होते. या प्रयोगाचे फलित म्हणजे, प्रोटॉनच्या धडकेतून हिग्ज यांनी मांडलेले कण मिळाले. हिग्ज बोसॉन कण मिळणे हे 40 वर्षांच्या भौतिक शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे यश म्हणावे लागेल. जेव्हा डॉ. पीटर हिग्ज यांनी आपले प्रमेय मांडले, तेव्हा त्यांच्या एका सहका-याने या कणांना ‘गॉड्स पार्टिकल’ असे नाव दिले. या नामकरणाची खिल्ली अनेक थरातून त्या वेळी उडवली गेली होती. जर देवच हे कण निर्माण करणारा होता तर त्याने इतर पशू-पक्षी-प्राणी सोडून मनुष्याला प्रज्ञा का दिली, असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित केला होता. पण सर्न संस्थेने या गृहीतकाचा पाठपुरावा करण्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करून भौतिकशास्त्राला एक नवी दिशा दिली आहे. हिग्ज बोसॉन कणाचे पुरावे मिळाले असले तरी ते पुरेसे नाहीत, असे शास्त्रज्ञ सांगत आहेत. पण या पुराव्यामुळे कणभौतिकीमधील स्ट्रिंग थेअरीला अधिक बळ मिळेल, असेही काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मध्यंतरी सर्नमधील काही अतिउत्साही शास्त्रज्ञांनी आइन्स्टाइनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत खोटा ठरल्याचा दावा केला होता. पण हा दावा किती बेमालूमपणे करण्यात आला होता, हे काही दिवसांत जगजाहीर झाले होते. आताही या नव्या प्रयोगामुळे आइन्स्टाइनच्या प्रस्थापित सापेक्षतावाद सिद्धांताला कोणताही धक्का लागलेला नाही, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. काही दैववादी शास्त्रज्ञांनी आतापासूनच या विश्वाच्या निर्मितीमागे एखादी परमेश्वरी शक्ती असल्याचे म्हणण्यास सुरुवात केली आहे. पण आपल्या सुदैवाने आधुनिक भौतिकशास्त्र अशा दैववादाला अजून तरी बळी पडलेले नाही. ते तसे पडले असते तर हा प्रयोगही झाला नसता.