आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial On Congress Vice President Rahul Gandhi Vidarbha Visit

कार्यकर्त्यांत ऊर्जा तेवढी वाढली (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी विदर्भाचा दौरा केला. सुमारे साडेचार तास ४० डिग्री तापमान असलेल्या कडक उन्हात चाललेली १४ किलोमीटरची पदयात्रा आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेट हे या दौऱ्याचे आकर्षण होते. प्रमुख पक्षाचा राष्ट्रीय नेता पहिल्यांदाच या भागात असा प्रयोग करत असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्यांच्या या दौऱ्याकडे होते. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते नेता येणार, बोलणार म्हणून उत्साहात होते तर सर्वसामान्य ते काय भूमिका घेतात, या उत्सुकतेत होते. काही दिवसांच्या सुटीवरून आल्यानंतर राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेउन संसदेत सरकारवर टीकास्त्र सोडल्याची घटना ताजीच असल्यामुळे या दौऱ्याचे महत्त्व अधिक होते. देशभरातील शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून अस्मानी संकटांचा सामना करत आहे. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे अर्थचक्र थांबले आहे. पहिल्या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत तर दुसरे संकट तयार, असा खेळ काही महिन्यांपासून सुरू आहे. सरकारने काही नुकसानीत मदत मिळवून दिली. पण, नुकसान आणि मदत याचे आकडे कधीच मेळ खाणारे नसतात याचा प्रत्यय येथेही आला. त्यात मग सरकारी मदत वेळेत मिळेल याचे नियोजनही वेळकाढूच. पण, त्यातही सावरायचा प्रयत्न करणारा शेतकरी अधिकच अडचणीत येत आहे. अनेक कारणांमुळे होणाऱ्या शेतकऱी आत्महत्येच्या घटना थांबायला तयार नाहीत. विदर्भाचा भाग शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे आधीच बदनाम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या आत्महत्या थांबाव्या यासाठी अनेक संशोधन आणि उपाययोजनांचे प्रयत्न झाले, पण तेही निष्फळ ठरले. कर्जमाफीसारखा मोठा निर्णय तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग सरकारने घेतला, पण त्याचा अपेक्षित परिणाम झाला नाही. तो का झाला नाही हा मोठा वादाचा विषय आहे. पण, याच राहुल गांधींनी त्या वेळीही आत्महत्याग्रस्त भागाला भेट देऊन हा विषय देशाच्या संसदेत गाजवला होता. एका कुटुंबाला मोठी मदत मिळवून दिली होती. तेव्हा ते सरकारमध्ये होते. आता परिस्थिती उलटी आहे. तेव्हाचे विरोधक आता सरकारमध्ये आहेत. ते त्या वेळी या प्रश्नावर रान उठवायचे, आम्ही या समस्येवर जालीम उपाय करू, असे सांगायचे. सत्तेच्या सारीपाटावरील चेहरे बदलले आहेत. समस्यांनी मात्र इंचभरही जागा सोडलेली नाही. उलट अलीकडच्या काळात समस्या वाढतच आहेत. शेतकरी आत्महत्यांचे विदर्भातील लोण आज महाराष्ट्रातील उर्वरित भागात पोहोचत आहे. ही चिंताजनक बाब आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींचा दौरा विशेष होता. त्यामुळेच काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे ‌उत्साहात स्वागत केले. पदाधिकारी गळाटले, पण जुळत गेलेल्या नवनवीन कार्यकर्त्यांच्या जोशात राहुल गांधींनी पदयात्रा यशस्वी केली. आत्महत्या केलेल्या नऊ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी भेट दिली. त्यांच्याशी संवाद साधला, समस्या जाणून घेतल्या. हे सगळे करताना ते लोकांमध्ये मिसळत गेले. काँग्रेसची मूळ नाळ अशाच सर्वसामान्य कार्यकर्ता आणि जनतेत जोडलेली होती. गेल्या काही वर्षात ती कमी झाली असा विश्लेषकांचा दावा आहे. या पदयात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींनी ती जोडण्याचा प्रयत्न केला. पण, दौरा आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना जाणून घेण्यासाठी होता. लोक भरभरून बोलत होते. राहुल गांधी समस्या समजून घेत होते. ते ऐकत आहेत, हे पाहून लोकांनाही आशा वाटत होती. पण, नंतर संवाद साधताना त्यांनी जुन्या विरोधकांप्रमाणेच, आधीच केलेल्या टीकेची री ओढली. या शेतकऱ्यांना मदत करणार काय, या प्रश्नावर हतबलता व्यक्त केली. सामान्यांनी मांडलेल्या सिंचनासारख्या समस्यांच्या विषयाला बगल दिली. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. गरज पडल्यास पक्षातर्फे थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न करू, एवढेच काय ते आश्वासन देऊ शकले. त्यांच्या दौऱ्याने नेमके काय साधले हा प्रश्न कायम आहे. लोकसभा निवडणुकीत झालेला पराजय आणि राजकीय क्षेत्रात कार्यक्षमतेबद्दल निर्माण झालेले प्रश्नचिन्ह अशा वातावरणात राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या भावनिक प्रश्नाला हात घालत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील टीकेमुळे राजकीय चर्चेला विषय दिला आहे, त्याचसोबत कार्यकर्त्यांमधील ऊर्जा तेवढी वाढवण्यात यश प्राप्त केले आहे. पण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज ठोस आणि आश्वासक उपाययोजनेची गरज आहे. परंपरागत राजकारणाच्या पलीकडे जाऊन याविषयी ते पुढाकार घेणार आहेत का, हा प्रश्न कायमच आहे.