आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहाला उधाण (अग्रलेख)

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधाराचा विनाश करणा-या दिव्यांच्या राशी घेऊन आलेली दिवाळी देशभरात नेहमीच्याच उत्साहाने साजरी केली जात आहे. देशातील हा आगळा-वेगळा आणि सर्वांत महत्त्वाचा सण प्रत्येकाच्याच आयुष्यात उत्साह, आनंद, नव्या आशा-आकांक्षा घेऊन येतो. त्याच्या आनंदलहरींमध्ये इंग्रजी वर्षाची अखेरही चैतन्यमय ठरते. जगभरात मंदीचे सावट असताना हा उत्सव यंदा कसा असेल, याबद्दल अनेकांच्या मनात शंका-कुशंका येत होत्या. दिवाळीच्या मोसमात एरवीही महागाईचीच चर्चा असते, पण यंदा त्यावर मात करून, महागाईची पर्वा न करता लोकांनी धूमधडाक्यात या पर्वाची तयारी केली. ‘राजाच्या घरी रोजच दिवाळी’ असे म्हणतात, पण दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपापल्या परीने ‘राजा’ होण्याचा प्रयत्न करीत असतो. वर्षभराची काटकसर विसरून तो या उत्सवात सढळ हाताने नवी खरेदी करतो. नव्हे, कोणतीही नवी वस्तू घेण्यासाठी तो दिवाळीचीच वाट पाहतो आणि या खरेदीमुळे बाजारात उलाढाल वाढते, अर्थचक्राला वेग येतो. शिवाय, कोणतेही कर्मकांड न करता हा उत्सव साजरा करता येतो. काही पणत्या, नवे कपडे, आकाशदिवा, फराळ आणि फटाके म्हणजे दिवाळी, असा या सणाचा साधा बाज आहे. त्यासाठी फार खर्चही करावा लागत नाही. त्यामुळे सर्वच थरांतील लोक त्यात सहभागी होताना दिसतात. एका इंग्रजी दैनिकात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बातमीत तर असे म्हटले आहे की, गेल्या 65 वर्षांत झाली नाही एवढी खरेदी भारतीयांनी दसरा आणि दिवाळीदरम्यान यंदा केली. सोने-चांदी, पेट्रोल-डिझेलची महागाई, मंदी, रुपयाची घसरण या सर्व नकारात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही पाहणी अचूक असेल, तर मग निराशा कुठे आहे? वास्तविक, मंदीच्या सावटातून सावरण्याची संधीच या दीपोत्सवाच्या निमित्ताने चालून आली आहे. आजही अनेक अर्थतज्ज्ञ असे मानतात की, देशात मंदीचे सावट फक्त चर्चेत आहे. प्रत्यक्षात परिस्थिती तेवढी ढासळलेली नाही. मंदी मोजण्याची काही परिमाणे आहेत. सोन्याचे दर, सेन्सेक्स अनपेक्षितपणे गडगडले तर तो मंदीचा परिणाम आहे, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. देशाचे चित्र नेमके याउलट आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि सेन्सेक्सनेही 20 हजारी पातळी ओलांडली आहे. मंदीच्याच मोसमात कॉर्पोरेट व खासगी क्षेत्रात घसघशीत वेतनवाढही झाली आहे. देशाच्या काही भागांत दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे उलाढालीवर जरूर परिणाम झाला, पण त्याचा ठपका मंदीवर ठेवता येणार नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्यामुळे एकंदरच महागाई वाढली. समृद्धी तेवढ्या प्रमाणात वाढलेली नसली तरी हल्ली इंधन, वीज, पाणी या मूलभूत वस्तूंचा दरडोई वापर लक्षात घेतला, तर काही अंशी लोकांची क्रयशक्तीही वाढली, हे मान्यच करावे लागते. कोणत्याही देशाची समृद्धी शिक्षणाच्या सुविधा, शहरीकरण, वस्तूंचा खप, नागरी सुविधा या मूलभूत गोष्टींवरून मोजली जाते. आपल्या देशात मोबाइल वापरणा-यांच्या संख्येवरून ती मोजण्याचे ठरले तर 80 टक्के लोक गरीब नाहीत, हेच सिद्ध होईल. अर्थात, गरिबांनी मोबाइल वापरू नये असे नाही, पण रोटी, कपडा या मूलभूत बाबींच्या नंतर दळणवळणाचा क्रमांक येतो आणि या बाबतीत देश कितीतरी पुढे गेला आहे. पूर्वी सायकल बाळगणा-यांना सुखवस्तू मानले जायचे, तसे आज ज्यांच्याकडे दुचाकी, चारचाकी वाहने आहेत, त्यांना गरीब मानले जात नाही. म्हणजे गरिबी-श्रीमंतीची परिमाणेही बदलली आहेत. सरकारी रोजगार योजनेतच दीडशे रुपये रोज मजुरी दिली जाते आणि आता अन्नावाचून कोणी उपाशी राहू नये, याचीही तरतूद सरकारने करून ठेवली आहे. अर्थात, या कुबड्या बाळगण्याची वेळ कमीत कमी लोकांवर यावी यासाठी विकासाची फळे मूठभरांच्या मुठीतून सोडवून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी लागणारच आहेत. ख्यातनाम शायर खलील धन्तेजवी यांनी ‘इतनी महंगाई है के बाजार से कुछ लाता हूं, अपने बच्चों में उसे बांटते शरमाता हूं’ या शब्दांत कोट्यवधी पित्यांची खंत व्यक्त केली आहे. ती दूर करावी लागणार आहे. त्यासाठी गरिबांची क्रयशक्ती आणि बाजारपेठेलाही मजबूत करावे लागेल. शेजारच्या चीनमध्ये जी धोरणे पत्करली गेली, त्यामुळे तो जगातील एक प्रबळ अर्थसत्ता म्हणून पुढे आला. अगदी तसेच बदल भारतात शक्य नसले तरी संपत्तीच्या न्याय्य वाटपाच्या प्रक्रियेला वेग द्यावाच लागणार आहे. त्यासाठी शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात काम करण्यास मोठा वाव आहे. दिवाळसणाच्या मोसमात संपत्तीचे वाटप किती विषम आहे, याची प्रचिती येते आणि गरीब-श्रीमंतातील दरी अधोरेखित होते. ही दरी सांधण्यासाठी राजकीय स्थैर्य महत्त्वाचे आहे आणि ते मतदार राजाच्याच हातात आहे. यंदा दीपोत्सव निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आल्यामुळे राजकीय फटाके देशभरात फुटत आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांची रणधुमाळीही दिवाळीच्या रंगात न्हाऊन निघाली आहे आणि उर्वरित राज्यांत पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या निवडणुकांचे निकाल काय असतील, याबद्दल झालेल्या निवडणूकपूर्व चाचण्यांची चविष्ट चर्चाही वाहिन्यांवरून सुरू आहे. त्यामुळे दिवाळीच्या उत्सवी वातावरणात राजकीय रंगही भरले आहेत. फराळाचा आस्वाद घेत लोक या चर्चांचे मोजमाप करीत आहेत. एखाद्या पक्षाला विजयी किंवा पराभूत ठरवण्याच्या माध्यमांच्या निष्कर्षांची ही आतषबाजी प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल हाती येईपर्यंत सुरूच राहणार आहे.