आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावन पर्वाला प्रारंभ... (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भक्ती, श्रद्धा अन् संस्कृतीचा संगम असलेल्या कुंभपर्वास आजपासून गोदातीरी अर्थात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रारंभ होत आहे. अनादि कालापासून अव्याहत सुरू असलेली ही हिंदू परंपरा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजली जाते, ती तिच्या वेगळेपणामुळे. कारण, भक्तीबरोबरच शक्तीचा, संघटनाचा प्रत्यय देणे हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश आहे. एका आख्यायिकेनुसार समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या अमृताचा कुंभ गरुडाकरवी वाहून नेला जात असता त्यातील काही थेंब हरिद्वार, प्रयाग (अलाहाबाद), नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथे अनुक्रमे गंगा, गंगा-यमुना संगम, गोदावरी आणि क्षिप्रा या नद्यांच्या पात्रांत सांडल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्या त्या विशिष्ट ग्रहस्थितीत या प्रत्येक ठिकाणी स्नान करून पापक्षालनाबरोबरच पुण्यसंचयही जोडण्याची श्रद्धा कुंभमेळ्यातील पवित्र स्नानामागे आहे. हे झाले धार्मिक अधिष्ठान. पण, त्याबरोबरच धर्मरक्षण आणि संवर्धन हेदेखील या परंपरेचे एक प्रमुख अंग आहे. साधारणपणे दर तीन वर्षांतून एकदा वरीलपैकी एका ठिकाणी पवित्र स्नानाच्या निमित्ताने एकाच वेळी जमून आपल्या विराट संघटन शक्तीचा प्रत्यय इतरांना द्यावा या हेतूनेच कुंभपर्वात साधूंच्या आखाड्यांना खास महत्त्व प्राप्त झाले असावे. कारण, आखाडा या शब्दाची व्युत्पत्ती अखंड यापासून झाली असून हा शब्द मुळातच बलोपासनेशी निगडित आहे. स्वधर्मावर होणारी आक्रमणे साधू आखाड्यांच्या माध्यमातून परतवून लावण्याची भूमिका त्यामागे असणार आणि त्या काळातील परिस्थितीशी ती एकंदर सुसंगत अशीच म्हणावी लागेल. त्यामुळेच साधू आखाड्यांच्या शाही स्नानाला कुंभमेळ्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
शाही स्नानाच्या मानपानावरून या आखाड्यांमध्येच संघर्ष घडल्याचीही उदाहरणे इतिहासात असली तरी अपवाद वगळता कुंभमेळ्याकडे जगातले एक सर्वात मोठे आणि शांततेत पार पडणारे लोक संमेलन (मास गॅदरिंग) म्हणून पाहिले जाते, हे विशेष. गेल्या कुंभमेळ्यात प्रयाग येथे जवळपास दहा कोटी भाविकांनी हजेरी लावल्याचे सांगितले जाते. आजपासून नाशिक आणि त्र्यंबक क्षेत्री सुरू होत असलेल्या कुंभपर्वातही शाही स्नानाचे दिवस आणि महत्त्वाच्या तिथी मिळून उपस्थितांचा आकडा कोट्यवधीच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. एखाद्या ठिकाणी विशिष्ट कालावधीत एवढ्या अफाट संख्येने जनसमुदाय जमत असेल तर त्याकडे आजच्या काळात केवळ एक रूढी, प्रथा अथवा परंपरा म्हणून पाहून भागणार नाही. त्यातून खुणावणाऱ्या संधींचे सोने कसे करता येईल, हेदेखील पाहिले गेले पाहिजे. म्हणूनच नव्या पिढीने कोणताही पूर्वग्रह न ठेवता हे सारे मुळातून समजावून घ्यायला हवे. एवढ्या प्रचंड संख्येने जगभरातून येणाऱ्या मंडळींमुळे स्थानिक पातळीवर उद्योग-व्यवसायांत प्रचंड मोठी उलाढाल होणे ओघानेच आले. त्यातून राज्याला तब्बल दहा हजार कोटी एवढी कमाई होऊ शकते, असा अंदाज असोचेमसारख्या वित्त क्षेत्रातील आघाडीच्या संस्थेने दिला आहे. स्थानिक तरुणांनी या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या ‘मार्केट’चा लाभ उठवायला हवा. कुंभमेळ्याचे स्वरूप लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या साऱ्या ‘मेगा इव्हेंट’मधून अधिकाधिक संधी शोधायला हव्यात. दुसरीकडे कुंभपर्वात अनेकविध आव्हानेही समोर उभी ठाकणार आहेत. हा सोहळा अनुभवण्यासाठी केवळ भारतातल्याच नव्हे, तर जगभरातील भाविकांची जशी मांदियाळी जमते तसेच देशोदेशीचे अभ्यासकदेखील आवर्जून हजेरी लावतात. अमेरिका, फ्रान्स आदी विकसित देशांतील यंत्रणाही ‘क्राऊड मॅनेजमेंट’चे धडे घेण्यासाठी कुंभमेळ्यावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. विशेषत: सुरक्षेचा मुद्दा या काळात अत्यंत कळीचा ठरणार आहे. अतिप्रचंड संख्येने जमणारी गर्दी पाहता हिंसक कारवाया करू इच्छिणाऱ्या अतिरेक्यांच्या टार्गेटवर कुंभमेळा असणे सहज शक्य आहे. त्यादृष्टीने सुरक्षा यंत्रणांना अत्यंत सजग राहावे लागणार आहे. त्यामुळे या यंत्रणांना सर्वतोपरी सहकार्य करणे आणि प्रत्येकाने आपापल्या परीने नियम पाळून यंत्रणेवरील ताण होता होईल तितका कमी करणे हे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाने आपले आद्यकर्तव्य समजायला हवे. गतवेळी नाशिकला ३४ भाविक शाही स्नानाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत बळी गेले होते. त्या कटू स्मृतींचे सावट या वेळीही असणार आहे. शिवाय, कोट्यवधींच्या संख्येने येणाऱ्यांची प्रवास व निवास व्यवस्था, त्यांना स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा यांसारख्या प्राथमिक सुविधांची उपलब्धता अशा अनेक आव्हानांचा डोंगर समोर उभा ठाकणार आहे. शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर त्यादृष्टीने सर्वतोपरी नियोजन करण्यात आले असले तरी त्यामध्ये काही त्रुटी राहणारच. अशा अनेकविध आव्हानांना पार करून यंदाचा कुंभमेळाही यथासांग पार पडेल या विश्वासासह त्यासाठी सर्व संबंधित घटक व यंत्रणांना आजच्या धर्मध्वजारोहणाच्या औचित्याने लक्ष लक्ष शुभेच्छा!
बातम्या आणखी आहेत...