आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमो न ‘महा’? (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कितीही मोठी लाट असली तरी काही काळाने ती ओसरणारच, हा सृष्टीचा नियम तसे पाहिल्यास प्रत्येक क्षेत्रासाठी लागू होतो. भावनेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणाऱ्या आपल्याकडच्या राजकारणात आणि विशेषत: निवडणुकांमध्ये तर अनेकदा लाट हाच घटक कळीचा ठरतो. मग ती कधी जनता लाट असते, कधी गरिबी हटावची लाट असते, कधी इंदिरा लाट असते, तर कधी हिंदुत्वाची लाट असते.

आजवरच्या अशा राजकीय लाटांचा अदमास घेतल्यास कोणतीही लाट दीड-दोन वर्षांनंतर ओसरायला लागल्याचे दिसते. हे सारे आताच नमूद करण्याचे कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटल्याचा खुद्द भाजपच्याच अंतर्गत पाहणी अहवालातील निष्कर्ष. नाशिकमध्ये नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राज्य समिती सदस्यांसाठी म्हणून भाजप वॉर रूमतर्फे काढण्यात आलेल्या पुस्तिकेत हा धक्कादायक म्हणावा असा (भाजप कार्यकर्ते व मोदीभक्तांसाठी) निष्कर्ष दिला गेला आहे. पुस्तिकेत ‘भाजपकडे लोकांचा बदलता कल’ असा तक्ता दर्शवला असून त्यानुसार २०१३-२०१४ मध्ये नमो समर्थकांची संख्या ४० टक्के, कार्यकर्ता ४५ टक्के, तर इच्छुक नागरिक १५ टक्के अशी तुलनात्मक विभागणी होती. तर २०१६ मध्ये ही तुलना नमो समर्थक २५ टक्के, त्याबरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थक २५ टक्के, कार्यकर्ता १५ टक्के, इच्छुक नागरिक २५ टक्के, तर सत्तेमुळे प्रभावित झालेला गट १० टक्के अशी विभागणी आहे. यातील प्रत्येकच मुद्दा खरे तर अभ्यासविषय आहे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोदींची लोकप्रियता तब्बल १५ टक्क्यांनी घटल्याचे पक्षीय पातळीवरच मान्य करण्यात आले आहे. अर्थात, ही कबुली केवळ वरिष्ठ सदस्यांसाठीच असणाऱ्या अंतर्गत पुस्तिकेत दिली गेली असली तरी माध्यमांद्वारे ती चर्चेत आली आहे. सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने ही बाब प्रकाशात आणली होती. तत्पूर्वी, प्रस्तुत बैठकीच्या पूर्वसंध्येला ‘दिव्य मराठी’ने नाशिकमध्ये घेतलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्षदेखील याच्याशी अगदी मेळ खाणारे असेच होते. भाजपच्या लोकप्रियतेचा आलेख कसा घसरणीला लागला आहे, त्याचा आरसाच ‘दिव्य मराठी’ने दाखवला होता.
बैठकीसाठी आलेल्या पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींमध्ये तसेच बैठकस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हे सर्वेक्षण चांगलेच चर्चेत राहिले. किंबहुना, पक्षाच्या कोअर कमिटीतदेखील त्यावर चर्चा झालेल्या बैठकीतीलच काही नेत्यांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर दुजोराही दिला होता. पण या दोनदिवसीय बैठकीत जाहीरपणे मात्र त्यावर कोणतेही वक्तव्य आले नाही. अर्थात, कार्यकर्त्यांचे मनोबल टिकवून ठेवायचे तर अशा विषयांवर जाहीर चर्चा होणे अपेक्षितदेखील नसते. मात्र, पक्षाच्या अंतर्गत पुस्तिकेतील हे तुलनात्मक विश्लेषण बरेच काही सांगून जाणारे आहे. कारण या तुलनेनुसार मोदी आणि फडणवीस यांची लोकप्रियता राज्यात समसमान आहे आणि कार्यकर्त्यांचा पक्षाकडचा कल तर ३० टक्क्यांनी घटला आहे. अन्य माध्यमांमध्येही त्याची आता चर्चा सुरू झाली असून मुंबईतल्या एका इंग्रजी दैनिकाला यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी काहीसा सावध पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार हे सर्वेक्षण नसून लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांमधले ‘ट्रेंड’ कसे वेगळे आहेत त्याची आरेखनात्मक स्वरूपातील मांडणी आहे. तसे गृहीत धरले तरी एकूण वास्तवात फरक पडत नाही आणि येत्या वर्षभरात तर भाजपला राज्यात आणखी स्थानिक स्तरावरच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. तेव्हा अशा ‘ट्रेंड’कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण मुळात गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट तयार होण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरली ती काँग्रेसची कमालीची भ्रष्ट आणि नाकर्तेपणाची राजवट. त्या राजवटीला कंटाळलेली जनता मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या वायद्याला चटकन भुलली. पण दोन वर्षांचा कालावधी लोटत आला तरी लोकांना आणि विशेषत: भाजपचा पाठीराखा असलेल्या शहरी, नोकरदार, मध्यमवर्गीयांना अद्याप काहीही अनुभूती आलेली नाही. २००९ मध्ये तत्कालीन सरकारच्या अणुकार्यक्रमासारख्या बाबींनादेखील विरोधासाठी विरोध करणाऱ्या भाजपच्या नीतीला दूर ठेवून याच शहरी, मध्यमवर्गीयांनी काँग्रेसला निवडून दिले होते, हा इतिहास ताजा आहे. तेव्हा आता तरी भाजप आणि संघ परिवाराने गोमांस, मंदिर प्रवेश, भारतमाता की जय अशा बिनकामाच्या मुद्द्यांना दूर लोटून ज्यासाठी लोकांनी मते दिली त्या विकासाच्या मुद्द्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे, हे बरे.