आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी गुरुजींचा तास! (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे पंतप्रधान देशातील मुलांशी थेट संवाद साधतात, या घटनेकडे राजकारणापलीकडे आज देश पाहू शकत नाही, हे या देशाचे दुर्दैवच म्हटले पाहिजे. आमच्या रक्तात आणि दैनंदिन जीवनात राजकारणाने कसा धुमाकूळ घातला आहे, हे तर सारा समाज दररोज पाहतो आहे आणि त्यामुळे होणारे प्रचंड नुकसान सोसतो आहे. ध्यानीमनी राजकारणाचा हा करंटेपणा बाजूला ठेवला तर नरेंद्र मोदी गुरुजींचा तास शिक्षकदिनी लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणा देऊन गेला. नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांचा हिशेब होत असताना आणि तोंडावर असलेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण २४ तास सुरू असताना शुक्रवारचे हे दोन तास वेगळे ठरले. विशेषत: सतत गंभीर रूप धारण केलेले नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तसे मोजून मापूनच बोलले असले तरी पंतप्रधानांना आपल्याशी बोलावे वाटते आणि त्यासाठी सारी यंत्रणा हलते, हा मुलांच्या दृष्टीने खरोखरच आनंदाचा भाग ठरला. हा आनंद माध्यमांनाही कळला आणि केवळ दूरदर्शनच नव्हे, तर सर्व खासगी वाहिन्यांनीही या तासाचे थेट प्रक्षेपण केले, यातच त्याविषयी किती कुतूहल होते, हे आले. मोदींनी एक चिमटा काढलाच. यानिमित्ताने प्रथमच दिवसभर मुले टीव्हीवर दिसत आहेत, असे ते म्हणाले. ते अगदी खरे आहे, कारण मुलांसाठी टीव्हीचा असा टीआरपी कधी मिळाल्याचे उदाहरण नाही. हे शक्य झाले, कारण काही धोरणे आणि काही भाषणे यामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधानांना मुलांशी बोलावे वाटले. हेही देशात प्रथमच घडत होते. देशाच्या व्यवस्थेत आज आणि गेली सहा दशके अनेक त्रुटी आहेत आणि त्या कमी करायच्या असतील तर तरुण पिढी जाणीवपूर्वक घडवावी लागणार आहे. त्यासाठी तिला विश्वासात घ्यावे लागणार आहे. ते या देशाचे जबाबदार नागरिक आहेत, हे सतत ठसवावे लागणार आहे. नरेंद्र मोदी यांनी या संवादातून हा संदेश परिणामकारकरीत्या दिला.
दिल्ली आणि देशभरातील १७ विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारले. ते प्रश्न साधारण काय असू शकतात, याचा अंदाज कोणीही सुजाण नागरिक करू शकतो. मात्र, त्याला त्यांनी दिलेली उत्तरे महत्त्वाची ठरली. आपले निवेदन त्यांनी १० मिनिटांपुरते मर्यादित ठेवले आणि प्रश्नोत्तरांना अधिक वेळ दिल्याने त्या तासाची परिणामकारकता वाढली. विशेषतः स्वच्छ भारत-स्वच्छ विद्यालय, डिजिटल इंडिया ही राष्ट्रीय मोहीम, वीज आणि पाणी बचतीचे आवाहन, अवांतर वाचनाची गरज, रोजगारवाढीसाठी कसे शिक्षण हवे, याचा उल्लेख आणि मुलींच्या शिक्षणाबाबत असलेला महत्त्वाचा मुद्दा – या गोष्टी सोप्या शब्दांत त्यांनी मुलांसमोर मांडल्या. दिवसभरात किमान चार वेळा घाम आला पाहिजे आणि खेळणे-बागडणे अभ्यासाइतकेच महत्त्वाचे आहे, हेही मुलांनी ऐकले खरे; मात्र बदललेल्या जीवनशैलीत आणि वाढत्या स्पर्धेत याचा मेळ कसा घालायचा, असा प्रश्न मुलांना पडल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणात तंत्रज्ञानाचे महत्त्व वाढत चालले असून त्याला गती दिली तर दर्जेदार शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता लवकर सापडेल, असे ते म्हणाले. मात्र, ही बाब काही मुलांनी करण्याची नसून ती सरकारी यंत्रणा आणि शिक्षकांनी करावयाची आहे. अनुभव की शिक्षण, महत्त्वाकांक्षा की प्रयत्न, बुद्धिमान आणि आळशी, निसर्ग बदलला की माणूस आणि राजकारण हा व्यवसाय नसून ती सेवा असल्याचे प्रतिपादन, हे सर्व सांगताना पंतप्रधानांनी तत्त्वज्ञानाचा आधार घेत मांडणी केली, ती शिक्षक आणि पालकांना उद्देश्ून असावी. प्रश्न विचारण्याची संधी एकाही महाराष्ट्रातील मुलाला मिळाली नाही, हा एक अगदी किरकोळ मुद्दा. पण विनोबा भावे, दादा धर्माधिकारी आणि नागपूरच्या महापौरांचा त्यांनी केलेला उल्लेख महत्त्वाचा होता. पौर्णिमेच्या रात्री शहरात दिवे बंद ठेवता येऊ शकतात, हा नागपूरमधील प्रयोग त्यानिमित्ताने देशाला कळला. सूर्योदय आणि सूर्यास्त आपण किती तरी दिवस नीटपणे पाहिलेला नाही आणि आपल्या मुलांनाही दाखविलेला नाही, ही आठवण पालक आणि शिक्षकांना त्यांनी करून दिली. हेडमास्तर नाही, मात्र आपण टास्क मास्तर आहोत, हेही त्यांनी सांगितले. साऱ्या देशाचे लक्ष असलेला एक धोरणी नेता मुलांशी कसा आणि काय बोलतो, याविषयी देशात बरेच कुतूहल होते. या संवादात कोठे राजकीय विधान केले जाते की काय, मुलांचा वापर राजकारणासाठी केला जातो की काय, अशी चर्चा होती. राजकारणाच्या बजबजपुरीत तो मोह मोदी यांनी टाळला, हे बरे झाले. ‘मला पंतप्रधान व्हायचे असेल तर काय करावे लागेल’, असा प्रश्न एका मुलाने विचारला होता, त्यावर २०२४ च्या निवडणूक तयारीला लाग, असा सल्ला दिला आणि तोपर्यंत मला धोका नाही, असाही उल्लेख केला. त्याचा अर्थ काही दीडशहाण्यांनी तोपर्यंत आपणच पंतप्रधानपदी राहणार, असे नरेंद्र मोदींना सुचवायचे आहे, असा घेतला. राजकारणाने आपली दृष्टी किती दूषित केली आहे, हेच यावरून दिसते. ही दृष्टी मुलांना तरी मिळू नये, यासाठी अशा तासांची देशाला गरज आहे.