आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोखठोक उत्तर (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांचा ग्रुप फोटो. सुरक्षेच्या कारणांमुळे चेहरे झाकण्यात आले आहेत. - Divya Marathi
या मोहिमेत सहभागी झालेल्या जवानांचा ग्रुप फोटो. सुरक्षेच्या कारणांमुळे चेहरे झाकण्यात आले आहेत.
भारताच्या शेजारील नेपाळ, भूतान, म्यानमार व बांगलादेश हे सर्वच विविध दहशतवादी गटांच्या सुळसुळाटामुळे त्रस्त झालेले देश आहेत. त्याचे कारण गेल्या २०-२५ वर्षांत भारतीय उपखंडात प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाने आपले रंग बदलत दहशतवादाचा रंग धारण केला आणि अमली पदार्थ, अवैध शस्त्रास्त्रांचा व्यापार, मानवी तस्करी अशा मार्गांतून विविध दहशतवादी गट फोफावत गेले. मंगळवारी म्यानमारच्या हद्दीत शिरून भारतीय लष्कराने केलेली धडक कारवाई व या कारवाईला आलेले यश पाहता गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरोधात सातत्याने घेतलेल्या भूमिकेला अधिक बळ आले आहे. या घटनेमुळे पाकिस्तानवर दबाव तर येईलच; पण भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकपुरस्कृत दहशतवादाकडे जगाचे लक्ष वळवून घेता येईल. काही दिवसांपूर्वी दहशतवाद रोखण्यासाठी दहशतवादाचा वापर करावा लागतो, असे विधान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी करून खळबळ माजवून दिली होती; पण पर्रीकरांच्या या अंगाशी येणाऱ्या व्यूहरचनेच्या आहारी न जाण्याचे तारतम्य लष्कराने पाळले, हे महत्त्वाचे आहे. शेजारील देशाशी सौहार्दाचे, शांततेचे संबंध प्रस्थापित असतील, आर्थिक करार व संवादाचे पूल बांधले गेले असतील तर केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर दहशतवादासारख्या प्रश्नाला सामूहिकपणे सामोरे जाऊ शकता येते, हे भारतीय लष्कराने दाखवून दिले. म्यानमार व भारताची सीमा ही घनदाट जंगले, डोंगर, नद्या व दलदलीच्या प्रदेशामुळे तशी दुर्गमच आहे. नागालँड, मिझोराम, मणिपूर अशा राज्यांची सीमा म्यानमारला लागून असल्याने या सीमेलगतच्या प्रदेशात एनएसीएन (खापलांग गट), उल्फा व एनडीएफबी यांसारख्या दहशतवादी गटांचे तळ मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत. हे गट भारत व म्यानमारमध्ये अशांतता निर्माण करत असतात. भारतात आसाम, मणिपूर, त्रिपुरा व नागालँड या चारही राज्यांत जी फुटीरतावादी चळवळ गेली अनेक वर्षे सुरू आहे, त्याला खतपाणी घालण्याचे काम हे दहशतवादी गट आजपर्यंत करत आलेले आहेत. लोकशाही प्रक्रियेत अडचणी निर्माण करणे, विकास प्रक्रियेत सातत्याने हस्तक्षेप करत स्वत:चा दबाव गट प्रस्थापित करणे, अशी या गटांची नेहमीची कार्यशैली आहे. त्यात अवैध शस्त्रास्त्रांचा व अमली पदार्थांचा व्यापार असतो. यातून कोट्यवधी डॉलरची कमाई हे गट करत आले आहेत. गेल्या आठवड्यात मणिपूरमध्ये भारतीय जवानांच्या ताफ्यावर करण्यात आलेला दहशतवादी हल्ला हा जबरच होता. कारण या हल्ल्यात १८ भारतीय जवान शहीद झाले होते. अशा हल्ल्यांना रोखठोकपणे उत्तर देणे गरजेचे होते, पण ते अशा पद्धतीने की, दहशतवादी गटांना चोख प्रत्युत्तर मिळावेच; पण अशा दहशतवादी गटांना प्रोत्साहन देणाऱ्या, छुपी मदत करणाऱ्या देशांनाही योग्य संदेश मिळू शकेल.
महत्त्वाचे म्हणजे, भारतीय लष्कराने केलेली कारवाई खूप सावध व अचूक वेळ साधणारी होती. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या दौऱ्यावर असताना भारतीय लष्करावर हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याने देशातील जनमतही ढवळून गेले होते. दहशतवादी हल्ल्यांवरून आपल्याकडे लगेचच राजकारण केले जाते, पण तसे व्हायच्या आत भारतीय लष्कराने म्यानमार लष्कराच्या सहकार्याने ही मोहीम फत्ते केली. भारत आणि म्यानमार सीमेवर दोन्ही बाजूंकडील खेड्यांमध्ये एनएसीएन, उल्फा, यूएनएलएफ, केवायकेएल अशा दहशतवादी गटांनी मोठ्या प्रमाणात आपले जाळे विस्तारलेले आहे. स्थानिक जनता, व्यापाऱ्यांना बंदुकीच्या नळीची दहशत दाखवून हे गट आपल्या सरकारविरोधी कारवाया करत असतात. या भागात अहोरात्र गस्त घालणाऱ्या आसाम रायफल्स, डोग्रा रेजिमेंटवर या गटांकडून या अगोदर अनेकदा हल्ले झाले आहेत. गेल्या काही वर्षांत नेपाळ-भूतानपासून बांगलादेशपर्यंत सर्वच सीमा भागात विविध दहशतवादी गट एकमेकांशी संधान साधून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. २०१०मध्ये भारत व म्यानमारने एक करार केला होता. या करारानुसार भारतीय सैन्याला म्यानमारच्या हद्दीत शिरून दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची परवानगी देण्यात आली होती. आजपर्यंत पाकिस्तान वगळता भारताने पूर्वेकडील देशांशी संयुक्त कारवाईचे करार केले आहेत. २००३मध्ये भूतानमध्ये "ऑपरेशन क्लिअर' या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने उल्फा, एनडीएफबी व केएलओ या दहशतवादी गटांचे ३० हून अधिक तळ उद्ध्वस्त केले होते. शिवाय सुमारे साडेसहाशे दहशतवाद्यांना मारले किंवा कायमचे जायबंदी केले होते. पूर्वेकडील दहशतवाद हा पश्चिमेकडील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादापेक्षा वेगळा आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय स्वरूपही वेगळे आहे. ते लक्षात घेऊन या मोहिमेबद्दल संयमाने बोलणे आवश्यक होते. तो संयम भाजप नेत्यांना दाखवता आला नाही. आत्मविश्वास कसा दाखवायचा याचेही तंत्र असते. ते अमेरिका आणि चीनकडून शिकावे आणि मोदींनी आपल्या शागीर्दांना शिकवावे.
बातम्या आणखी आहेत...