आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial On Narendra Modi And RSS

मोदींचा ‘संघ’ (अग्रलेख)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगारे वाजवून लोकांमध्ये आणि सैन्यात चैतन्य निर्माण करण्याची युद्धपूर्व परंपरा प्राचीन आहे. महाभारतात शंखध्वनी करून सेनेला इशारा दिला जात असे. युरोपने सेनेच्या संचालनात बँडपथके आणली. युद्धावर जातानाही ही बँडपथके सैन्याची साथ करत असतात. लोकशाही पद्धतीत निवडणुकांना युद्धाचे स्वरूप येते. म्हणजे शंख, नगारे, बँड आलेच. आपल्या देशात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे, जरी लोकसभा निवडणुकीला अजून एक वर्ष बाकी आहे. त्या मुदतपूर्व होऊ शकतात, अशी हवा मीडियामध्ये केली जात आहे. निवडणुकीच्या काळात टीव्ही न्यूज चॅनल्सना ‘टीआरपी’ चांगला मिळतो. त्या चॅनल्सचा ‘धंदा’ मुख्यत: ‘टीआरपी’वर अवलंबून असल्यामुळे निवडणुकांच्या निमित्ताने होणारी झुंज त्यांना हवी असते. परंतु मुदतपूर्व निवडणुका आल्या तरी त्यांनाही किमान सहा महिने आहेत. तरीही ती शक्यता विचारात घेऊन भारतीय जनता पक्षाने नगारे, शंख, तुतार्‍या, ढोल-ताशे आणि बँडपथके जमा करून एकच गरबासदृश हंगामा सुरू केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना तर हे निवडणुकीचे नवरात्र लवकरात लवकर यावे याची इतकी घाई झाली आहे, की आजच त्यांनी टिपर्‍यांचे वाटप सुरू केले आहे. भारतीय जनता पार्टीने जो त्यांच्या कार्यकारिणीचा, उच्चपदस्थ समितीचा चेहरा लोकांसमोर ठेवला आहे, त्याच्यावर नरेंद्र मोदींच्या या ‘गरबा’चा अगदी पक्का ठसा आहे. त्या नेमणुकींनंतर पक्षाचा एकूण सूर असा होता की, आता भाजपला बहुमत मिळणे हा उपचार तेवढा बाकी आहे. एकदा भाजपला दोनशेहून अधिक जागा मिळाल्या की, मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात घ्यायचा, की ज्या भगवान श्रीरामाच्या कृपेने सत्ता आली त्याच्या नावाने असलेल्या रामलीला मैदानावर घ्यायचा, इतकाच प्रश्न असेल. गेल्या दोन वर्षांत त्या मैदानावर इतक्या अगाध लीला झाल्या आहेत, की आता एवढी एकच बाकी आहे. त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला हे ‘मोदी सरकार’ पाहून काय वाटेल, हे साक्षात हनुमानसुद्धा सांगू शकणार नाही. नरेंद्र मोदींच्या आग्रहामुळे अशा व्यक्तीची नियुक्ती भाजप कार्यकारिणीवर झाली आहे, की ते नाव पाहून कोदंडधारी रामाचे धनुष्यबाण आताच शिवशिवू लागले असतील. अमित शहा यांचे नाव खूनसदृश आरोपांमध्ये अडकलेले आहे आणि असे पुरुषोत्तम जर भारतात नवे ‘रामराज्य’ आणणार असतील तर आपल्या प्रतिष्ठेला चांगलाच तडा जाईल, अशी चिंता रामाला वाटणे स्वाभाविक आहे. किंबहुना रावणाच्या पक्षातली माणसे तर आपल्या पक्षात घुसलेली नाहीत ना, असा संशयही लक्ष्मणाच्या मनात येईल. एकूणच रावणाने साधूचा वेष धारण करून सीतेला लक्ष्मणरेषा ओलांडायला लावल्यापासून लक्ष्मण प्रत्येक गोष्ट पुन:पुन्हा तपासून पाहायला लागला होता. लक्ष्मणाला तेव्हाच वाटू लागले होते की, जर सीतेला मागे ठेवून तो कुटीबाहेर पडलाच नसता तर रावणाला सीताहरण करणे जमलेच नसते. म्हणजे मग एकूण रामायणच घडले नसते! आता ‘रामराज्या’चे नाव घेऊन नरेंद्र मोदींच्या रूपाने रावणच तर समोर आलेला नाही ना, असा संशय लक्ष्मणाला येऊ लागला आहे तो त्यामुळेच. म्हणूनच लक्ष्मण आणि हनुमान दोघांनी भाजपच्या नवीन समितीवर बारकाईने नजर ठेवायचा निर्णय घेतला असावा. हनुमानाला पुन्हा सीतामाईच्या मुक्तीसाठी श्रीलंकेला जायची इच्छा नाही आणि श्रीलंकेला आग लावायची तर मुळीच नाही. श्रीलंकेतील तामिळ, भारतातील तामिळींच्या मदतीने तिकडे आग लावतच आहेत! असो. हे सर्व विषयांतर झाले. मुद्दा आहे भाजपच्या संभाव्य दोनशे जागांचा. त्यानंतर उर्वरित सुमारे 75 जागांसाठी मित्रपक्ष जमा करण्याचा. या घडीला शिवसेना आणि अकाली दल हे दोनच ‘अधिकृत’ मित्रपक्ष भाजपबरोबर आहेत. नव्या आघाडीत मोदी जर पंतप्रधान होणार असतील तर अकाली दल बरोबर राहीलच असे नाही. शिवसेनेने सुषमा स्वराज यांच्या नावाला पसंती दिलेली असल्यामुळे मोदींच्या नावाला त्यांचे अनुमोदन मिळेलच असे नाही. राज ठाकरेंच्या मनसेचा मोदी समर्थनासाठी काही उपयोग नाही, कारण त्यांना लोकसभेत दोन जागाही जिंकून आणणे कठीण दिसते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या आघाडीत जरी आज भाजप असला तरी नितीशकुमार यांनी आताच वेगळे पतंग उडवायला सुरुवात केली आहे. मोदींच्या पतंगांशी काटाकाटी करून ‘नामों’चा पतंग काटण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झालाच आहे. अशा परिस्थितीत भाजपला जरी 200 जागा मिळाल्या तरी उर्वरित 75 खासदार एकत्र आणणे महामुश्किल होणार, हे उघड आहे. किंबहुना ज्या समितीची घोषणा केली गेली आहे ती पाहता राष्ट्रीय लोकशाही आघाडी उभी राहायच्या आतच आडवी होणार, अशी चिन्हे आहेत. तामिळनाडूमध्ये (जेथे रामापेक्षा रावणाविषयी अधिक आकर्षण आहे आणि राम आर्य तर रावण द्रविड अशी ऐतिहासिक धारणा असल्यामुळे) भाजपला जयललिता वा करुणानिधी दोघांकडून खात्रीलायक समर्थन मिळेल व ते टिकेल अशी खात्री नाही. जयललितांनी 1999 मध्ये भाजपचे उपरणे त्यांच्या खांद्यावरून उतरवले होते आणि करुणानिधींनी त्यांची संगत सोडून यूपीएत सामील व्हायचा निर्णय घेतला, ही ‘द्राविडी’ आठवण भाजपच्या स्मृतिपटलावरून पुसली जाणे अशक्य आहे. ओडिशाचे नवीन पटनाईक यांची बीजेडी, बंगालची ममतांची तृणमूल, आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबूंचा तेलगू देसम, इतकेच काय, कर्नाटकमधील येदियुरप्पांचा भाजपमधून बाहेर पडलेला पक्षही मोदीप्रणीत नव्या आघाडीत येणार नाही. म्हणजे दक्षिणेकडील राज्यांत समर्थन नाही आणि आसाम वगैरे ‘पूर्वांचल’ राज्यांतही नाही. बिहार-उत्तर प्रदेशात नाम के वास्ते आणि काश्मीरमध्येही काही नाही. केवळ गुजरात आणि निवडून आल्यास मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश इतक्या राज्यांतून खासदार निवडून आणून एनडीएचे राज्य येणे कठीण आहे. मोदींचे पंतप्रधानपद त्याहूनही दूर; परंतु रविवारी नवीन समिती जाहीर झाल्यापासून भाजपमध्ये मात्र मोदींच्या नावाने नवा उन्माद अंगात भिनला आहे. परंतु या उन्मादाची झिंग उतरायला फार वेळ लागणार नाही. घोडामैदान जवळच आहे!