आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial On Narendra Modi's Announcement

मोदींच्या नव्या घोषणा (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशवासीयांसाठी नवनव्या घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या कृषी क्षेत्रासाठी ‘प्रत्येक थेंबातून अधिक उत्पादन’ (पर ड्रॉप-मोर क्रॉप) आणि ‘प्रयोगशाळा ते जमीन’ (लॅब टू लँड) अशा नव्या घोषणा दिल्या आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयसीएआर) 86 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी भारतीय शेतीच्या विकासाविषयी अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. कृषी उत्पादनात जगातील पहिल्या पाच देशांत स्थान असलेल्या भारतीय कृषी क्षेत्राचे महत्त्व जग आणि देशाच्या दृष्टीने अनन्यसाधारण असे आहे. एक तर आजही 50 टक्के म्हणजे 60 कोटी भारतीय शेतीवर अवलंबून आहेत आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताला अन्नसुरक्षेचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. या वर्षी पावसाने सुरुवातीच्या दीड महिन्यात दगा दिल्याने काय परिस्थिती निर्माण झाली होती, याचा अनुभव देशवासीयांनी नुकताच घेतला आहे. अर्थात गेल्या आठ दिवसांत पावसाने बहुतांश भागात मेहरबानी केल्याने देशाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. शेती उत्पादनात अनिश्चितता निर्माण झाल्याने वाढलेली महागाई आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर होऊ घातलेले परिणाम, हा गेले दोन महिने चिंतेचा विषय झाला होता. कारण एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा वाटा 15 टक्क्यांवर आला असला तरी या क्षेत्रातील उत्पन्नाची वाटणी 60 कोटी भारतीयांमध्ये होते, हे विसरता येत नाही. 1970 ते 80 या दशकातील हरितक्रांती सोडली तर बहुजन समाज ज्यावर थेट अवलंबून आहे, त्या शेतीसाठी ठोस असे काही होऊ शकलेले नाही. जागतिकीकरणानंतर म्हणजे गेल्या 23 वर्षांत तर या क्षेत्राची पीछेहाटच झाली आहे. ती दोन मार्गांनी झाली, एक तर परकीय गुंतवणुकीचा लाभ शेतीला अत्यल्प झाला आणि दुसरे म्हणजे आयटीसह सेवा क्षेत्राचा आणि औद्योगिक क्षेत्राचा ज्या वेगाने विकास झाला, त्यात शेती सतत मागे पडत गेली. त्याचा परिणाम असा झाला की, जागतिकीकरणामुळे भारतात जो प्रचंड पैसा खेळायला लागला तो शेतीच्या म्हणजे त्यात असणार्‍या 60 कोटी जनतेच्या वाट्याला आलाच नाही. त्याचाच परिणाम म्हणजे दारिद्र्यरेषा असो किंवा मागास भाग आणि समाज ठरवण्याच्या निकषांची चर्चा वेळोवेळी करूनही आज एकमत होऊ शकत नाही, या नामुष्कीला आपण येऊन पोचलो आहोत.
‘सर्वांसोबत सर्वांचा विकास’ असा नारा देत सत्तारूढ झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या मॉडेलमध्ये अद्याप कृषी क्षेत्राची तेवढी चर्चा झाली नव्हती. मात्र ती केल्याशिवाय म्हणजे 60 कोटी जनतेला सोबत घेतल्याशिवाय आपण विकासावर बोलू शकत नाही, याची जाणीव अर्थातच मोदी यांना आहे आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या नव्या घोषणांत दिसते आहे. भारतीय शेतीसमोर पाण्याचा अतिरेकी वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कमी वापर ही जी दोन मोठी आव्हाने आहेत, त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. भारतीय बहुतांश शेती आजही पावसावर अवलंबून आहे आणि जेथे सिंचनाच्या सोयी झाल्या आहेत, तेथे पाण्याची नासाडी प्रचंड आहे. शिवाय वाढती शहरे आणि कारखाने शेतीचे पाणी ओढून घेत आहेत. या आव्हानावर मात करण्यासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर उत्पादन वाढीसाठी करणे क्रमप्राप्त आहे. पाणी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे, हे बिंबवण्याची गरज गेली काही वर्षे व्यक्त केली जाते आहे, मात्र त्या दिशेने ठोस काही प्रयत्न सुरू झालेले दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या या नव्या मंत्राला व्यवहारात आणण्यासाठी किती आणि कसे प्रयत्न सुरू केले जातात, हे महत्त्वाचे आहे. शेतीसाठीचे संशोधन प्रयोगशाळांतून प्रत्यक्ष शेतकर्‍यांच्या हातात गेले पाहिजे, ही अपेक्षा नव्याने व्यक्त होत नसली तरी मोदी यांच्या कार्यशैलीमुळे त्याला आता खरोखरच गती येईल, अशी आशा करूयात. आकडेवारी असे सांगते की, भारतातील शेती उत्पादन आणि त्याचा वापर याची तुलना करायची तर वापराचा वेग जास्त वाढला आहे. म्हणूनच भारतातील मध्यमवर्गाची अन्नधान्याची वाढलेली गरज हा अमेरिकेसारख्या देशाला चिंतेचा विषय वाटतो. पण याचा अर्थ एवढाच आहे की, देशाला आणखी एका कृषी क्रांतीची गरज आहे, ज्यात अन्नधान्याच्या कमी काळात आणि कमी पाण्यावर येणार्‍या नव्या जाती आवश्यक ती काळजी घेऊन वापराव्याच लागणार आहेत. नव्या-जुन्याचा मेळ घालून हे उद्दिष्ट साध्य करावे लागेल, असे मोदी म्हणतात. ते खरे असले तरी नियोजनात शेतीला तेवढे महत्त्व दिले गेल्याशिवाय असे होणे शक्य नाही. ज्या शेतीवर देशाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, त्या शेतीतील माणसाला विकासाच्या मूळ प्रवाहात सामावून घेतल्याशिवाय शेतीसंबंधीचे नवे मंत्र जमिनीवर उतरणार नाहीत, एवढे नक्की. शेतीविकासाची चर्चा पंचतारांकित हॉटेलांत बसून केली जाते आणि तिचा फायदा घेणारेही भलतेच असतात. हा शिरस्ताही त्यासाठी बदलावाच लागेल.