आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial On Nepal Earthquake Rescue Opration

मदतीचा हात (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भौगोलिक किंवा राजकीयदृष्ट्या नेपाळ हा केवळ आपला शेजारील देश नाही, तर या देशाशी आपले प्राचीन काळापासून मैत्रीचे, व्यापाराचे, सांस्कृतिक संबंध आहेत. म्हणून नेपाळ प्रलयंकारी भूकंपाने हादरला आणि या देशाचे उद्ध्वस्तपण जेव्हा प्रसारमाध्यमांतून जगापुढे आले तेव्हा सामान्य भारतीयही मनापासून हादरला. शेकडो वर्षे गरिबीने पिचलेल्या नेपाळवर असे अस्मानी संकट यायला नको होते, अशी सार्वत्रिक भावना सर्वच थरांतून व्यक्त होत होती. शेकडो वर्षांपासून उभी असलेली प्राचीन मंदिरे, इमारती, ऐतिहासिक वास्तू एका क्षणात भग्न झालेल्या पाहून प्रत्येक भारतीयाच्या मनाला दु:ख वाटले असेल. तसेच अधिक क्लेश, वेदना मातीच्या हजारो टन ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या हजारो नेपाळी नागरिकांसाठी होत्या हे महत्त्वाचे. जागतिकीकरणाच्या, विकासाच्या आपण कितीही गमजा मारल्या, तंत्रज्ञानाने माणसाची जीवनशैली कितीही बदलली असली, जग माहिती-तंत्रज्ञानाने कितीही जवळ आले असले तरी नैसर्गिक आपत्तींपुढे माणूस हतबल होतो, तो असाहाय्य असतो हे पुन्हा दिसून आले. मानवाने निसर्गावर केलेले आक्रमण त्याचाच घात करणारे ठरले. भूकंप हा जीवित हानी करत नाही, तर ज्या इमारतींमध्ये, घरांमध्ये मानवी वस्त्या वसलेल्या असतात त्या माणसांचा घात करताे हे मान्य करण्याची वेळ आली आहे. जपान असाच भूकंपप्रवण क्षेत्रातील देश होता. पण या देशाने मोठ्या तीव्रतेच्या भूकंप धक्क्यांतही तग धरू शकणारी, कमीत कमी जीवित हानी होणारी घरे, इमारती बांधण्याचे तंत्रज्ञान विकसित केले व ते कठोरपणे राबवलेही. त्यामुळे साडेसात ते आठ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसूनही जपानमध्ये जीवित हानीचा आकडा दोन अंकी संख्येच्या वर कधी गेलेला दिसत नाही. जपानचे भौगोलिक क्षेत्र व हिमालय रांगांचे क्षेत्र यांच्यामध्ये तुलनात्मक प्रचंड फरक आहे; पण काश्मीर ते अरुणाचल प्रदेश या हिमालय रांगांच्या विस्तीर्ण भौगोलिक प्रदेशात जी काही महत्त्वाची शहरे आहेत तेथे भूकंपाचा अवरोध करणारी व्यापक बांधकाम यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे. भूकंप असो वा महापूर असो, अशा नैसर्गिक आपत्तीत एखाद्या देशाची राजधानी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यानंतर त्या देशाचे मनोबल किती खचत असेल याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा.
नेपाळची अर्थव्यवस्था राजधानी काठमांडूसह ज्या काही दोन-चार शहरांवर अवलंबून आहे ती सर्व शहरे मातीमध्ये जमीनदोस्त झाली आहेत. देशाचे सर्व व्यवहार बंद पडले आहेत. वीज, पाणी, रस्ते, वाहतूक अशा सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. प्रशासनामध्ये समन्वय नाही. हे सर्व केव्हा पूर्ववत होईल हे सांगता येणार नाही. अजूनही नेपाळला भूकंपाचे धक्के बसत असल्याने काठमांडू शहरातील व या शहरालगतच्या ग्रामीण भागातून हजारो लोक जीव वाचवण्यासाठी, निवाऱ्यांसाठी मैदानी प्रदेशात वेगाने स्थलांतर करत आहेत. हे पाहिल्यास लोकांच्या मनात किती भीती उत्पन्न झाली आहे हे आपण समजू शकतो. रविवारी आपल्या "मन की बात' या रेडिओवरील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्ध्वस्त नेपाळच्या उभारणीसाठी भारत सर्वतोपरी साहाय्य करेल, असे आश्वासन दिले आहे. त्यानुसार भारताचे लष्कर, हवाई दलाची विमाने मोठ्या प्रमाणात मदतकार्य पोहोचवण्यात गुंतले आहेत. या यंत्रणेवर नेपाळमध्ये अडकलेल्या सुमारे पाच लाख पर्यटकांना सुखरूप मायदेशी आणण्याची आव्हानात्मक अशी जबाबदारी आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या हजारोंचे प्राण वाचवण्याचीही जबाबदारी आहे. आपल्याकडे केदारनाथ प्रलयावेळी लष्कराने व प्रशासनाने कौतुकास्पद कामगिरी केली होती. ते मॉडेल भारत या वेळी वापरत आहे. एकंदरीत नेपाळवरचे संकट लक्षात घेता भारताने नेपाळच्या पुनर्उभारणीत सार्क देशांशी चर्चा करून स्वत:कडे नेतृत्व घेण्याची गरज आहे. अशा नेतृत्वामुळे सार्क देशांमध्ये भारताविषयीची धारणा बदलेल. सार्क गटातील सर्वच देश भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींच्या तडाख्यांना तोंड देतच असतात. अशा आपत्तींशी सामना करण्यासाठी भारताने सार्कच्या साहाय्याने एक आर्थिक निधी उभा करून व्यापक स्वरूपाची आपत्कालीन व्यवस्था उभी केल्यास भारतीय उपखंडातील वित्त हानी व जीवित हानीवर नियंत्रण येऊ शकते. नेपाळच्या मदतीला आज जग धावले आहे ते मानवतेच्या भूमिकेतून. अमेरिका, ब्रिटन, चीन, पाकिस्तान, इस्रायल, फ्रान्स या प्रमुख देशांनी तातडीने आपली मदत पोहोचवल्याने बऱ्याच अडचणींवर मात होईल. भारतीय उपखंडातील राजकारण हे राष्ट्रवाद व लष्करी सामर्थ्याच्या जोरावर रेटले जात होते. त्यामुळे सीमावादाचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट अशा संघर्षामुळे मानवी संबंध व आर्थिक संबंध दुरावलेले आहेत. काळाच्या गरजेनुसार आर्थिक सहकार्य हाच शेजारील देशांशी शांतता व सामंजस्य टिकवण्याचा मार्ग झाला आहे. नेपाळला त्याच्या पायावर उभे करणे हा केवळ मदतीचा भाग नाही, तर कठीण काळात मैत्री धावून येते हे सांगण्याचाही प्रयत्न आहे.