आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मात्रा लागू ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातील राजकारणरूपी पोपटाचा प्राण हा भारताचा द्वेष करण्यात दडलेला आहे. ज्या क्षणी त्या देशातून भारतद्वेष नाहीसा होईल त्या क्षणीच पाकिस्तानचे राजकारण पार निस्तेज झालेले असेल. या वस्तुस्थितीचे पाकिस्तानातील सत्ताधारी व लष्कर या दोघांनाही विलक्षण भान आहे. उरी येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेला सर्जिकल स्ट्राइक म्हणजे पाकमध्ये दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या सर्व घटकांना सणसणीत इशाराच होता. या सर्जिकल स्ट्राइकनंतर भारतात जी राजकीय धुळवड खेळली गेली ती लज्जास्पद होती. सर्जिकल हल्ले केल्याचे ठोस पुरावे जाहीर करा, अशी तद्दन बालिश मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली गेली. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी यांची वक्तव्ये ही त्यांच्या पक्षांची प्रतिष्ठा धुळीला मिळवणारी होती. भाजपमधील काही जणांनाही युद्धज्वर झाला होता. पण हल्ल्यानंतर मोदी यांनीच प्रसारमाध्यमांसमोर येण्याचे टाळल्याने व सहकाऱ्यांनाही तशी तंबी दिल्याने वातावरणातील विखार वाढला नाही. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयानंतर मोदींनी प्रसिद्धिलोलुपतेची वृत्ती बाजूला ठेवल्यास त्यांच्या सरकारविषयी जनतेत अधिक चांगला संदेश जाण्याची शक्यता आहे. सर्जिकल हल्ल्यानंतर पाकिस्तानातील सत्ताधारी व लष्कर अस्वस्थ आहे. आधी असा काही हल्ला भारताने केलाच नाही, असा कांगावा पाकिस्तानने करून पाहिला. परंतु भारतीय लष्कराने या हल्ल्याची ९० मिनिटांची व्हिडिओ फीत मोदींना सादर केल्याची वस्तुस्थिती समोर येताच पाकिस्तानचा नूर पालटला. बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांची पाठराखण करू नका, असे पाकिस्तानच्या लष्कराला पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एका बैठकीत ठणकावले. पठाणकोट हल्ल्याची चौकशी त्वरेने करावी तसेच मुंबई हल्ल्याचा खटला वेगाने चालविला जावा, असे निर्देशही त्यांनी दिले. शरीफ यांच्या बदललेल्या पवित्र्याबद्दल पाकिस्तानातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा तेथील सरकारने इन्कार केला असला तरी कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा काही थांबत नाही. १९९९ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची लोकशाही राजवट उलथवून तेव्हाचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता हस्तगत केली होती. त्यानंतर शरीफ बरीच वर्षे पाकिस्तानातून परागंदा होते. मात्र काळ आपल्या गतीने बदल घडवत असतो. याच मुशर्रफांवर २००८ मध्ये पाकिस्तानातून परागंदा होऊन लंडनमध्ये वास्तव्य करण्याची नामुष्की ओढवली. २०१३ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर नवाझ शरीफ पंतप्रधान झाले. त्यांनी त्यानंतरच्या तीन वर्षांत आपले स्थान बऱ्यापैकी बळकट केले आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानात परतलेल्या मुशर्रफांवर विविध गुन्ह्यांपायी खटले सुरू आहेत. पाकिस्तानच्या लोकशाही राजवटींवर तेथील लष्कराचा अंकुश असतो ही सर्वविदित गोष्ट असली तरीही सर्जिकल हल्ल्यानंतर नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला जे खडे बोल सुनावले ते बदलत्या परिस्थितीचेच निदर्शक आहेत.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख राहिल शरीफ हे नोव्हेंबर महिन्याअखेर सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची चाल कायम भारतविरोधी राहिलेली आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकला प्रत्युत्तर देण्यासाठी राहिल शरीफ पाकिस्तानी लष्कराला भारतात हल्ले चढवण्याचे आदेश देतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. पण असे अविवेकी पाऊल पाकिस्तानी लष्कर उचलणार नाही याची काळजी आता नवाझ शरीफ घेत आहेत. त्यांना दुसरा पर्यायही नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला एकटे पाडण्यासाठी भारताने अत्यंत हुशारीने राजनैतिक पावले उचलली. इस्लामाबाद येथे होऊ घातलेल्या सार्क बैठकीवर भारतासह बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान आदी राष्ट्रांनी बहिष्कार घातला. त्यामुळे ती बैठक रद्द करावी लागली. पाकिस्तानचे नाक दाबण्यासाठी सिंधू नदीच्या पाण्याचा हत्यार म्हणून उपयोग करण्याचे भारताने हुशारीने ठरवले. या सर्व पावलांची कालगती ओळखून नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कराला वठणीवर आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मारला गेलेला हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी बुऱ्हान मुझफ्फर वानी याला हुतात्मा ठरवण्यापर्यंत नवाझ शरीफ यांची याआधी मजल गेली होती. काश्मीर प्रश्नाचे तुणतुणे वाजवूनही पाकिस्तानला फारसे सहानुभूतीदार मिळत नाहीत. अमेरिका तिच्या राजकीय गरजेपोटी पाकिस्तानला आर्थिक व संरक्षणविषयक मदत करते व चीन पाकिस्तानच्या बाजूने अधूनमधून उभा राहतो. आपल्या हातातील भारतविरोधी भांडवल फार काळ टिकणारे नाही याची पुरेपूर जाणीव शरीफ यांना आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकनंतर उद््भवलेल्या परिस्थितीतून पाकिस्तानने बोध घेतला तर भारतीय उपखंडात खऱ्या अर्थाने शांतता नांदू शकेल.
बातम्या आणखी आहेत...