आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial On Pm Narendra Modi Japan Visit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅबेनॉमिक्स आणि मोदीनॉमिक्स (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि जपानला चीनची गरज आहे व चीनला दोघांची. व्यापाराची वा लष्कराची भाषा जगाला कळते, वैश्विक उपदेशांची नाही. उपदेश करणारा भारत आता व्यापाराची भाषा बोलू लागला आहे.
मोदींच्या जपान दौऱ्यानंतरचा माहोल आत्मविश्वासाचा, जोशाचा आहे. हे सरकार बिझनेसची भाषा करणारे आहे, असा भरवसा या दौऱ्यातून जगाप्रमाणे भारतातील उद्योगविश्वालाही मिळाला. प्रखर राष्ट्रीय बाणा हा मोदी व जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांच्यातील समान दुवा. बोलघेवड्या राष्ट्रीय बाण्याला जगात कोणी विचारत नाही. तिजोरी भरलेली असेल तरच राष्ट्रीय बाण्याला अर्थ येतो. सुदैवाने याची जाण दोघांना आहे. किरकोळ आध्यात्मिक भाषा सोडली तर मोदींचा भर व्यापारी बाण्यावर अधिक होता व तेच जपानला मानवणारे आहे. जपान सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. विकास मंदावला आहे व आंतरराष्ट्रीय बाजारातील दबदबाही कमी झाला आहे. आपत्तीत सापडलेल्या जपानबरोबरच्या मैत्रीचा गवगवा करण्याची गरज काय, असा सनििकल प्रश्न केला जातो. पण आपत्तीत असतानाच जपानकडून हवा तसा व्यवहार करून घेता येईल. तंत्रज्ञान, कार्यकुशलता, व्यापाराची जाण, भांडवल व आंतरराष्ट्रीय नेटवर्क या जपानच्या जमेच्या बाजू. जपानची भारतातील गुंतवणूक मुख्यत: उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात होते. रोजगार वाढवणारे हे क्षेत्र सध्या भारतात थंडावले असल्याने जपानी भांडवल महत्त्वाचे ठरते. भारतातील मनुष्यबळाला जपानी तंत्रज्ञान व भांडवलाची जोड मिळाली तर दोन्ही देशांना फायदा होईल. ताज्या अंदाजानुसार जपानमधील मोठ्या उद्योजकांची गुंतवणूक ७.४ टक्क्यांनी वाढणार आहे. लहान उद्योजकही सरसावले आहेत. मॉलमध्ये गर्दी वाढली आहे व मुख्य म्हणजे मोटारींच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. अ‍ॅबेनॉमिक्सच्या उपायामुळे जपानचे उद्योग क्षेत्र नव्या गुंतवणुकीस तयार होत असतानाच मोदीनॉमिक्सने भारताची दारे उघडली. तथापि, केवळ मनुष्यबळ व सोयी-सुविधांच्या जोरावर मोदीनॉमिक्स चालणार नाही. जपानला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. जागतिक दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षणाची अर्थशास्त्राशी जोड घालून भारतातील वदि्यापीठांना कार्यक्षम करावे लागेल. धर्म, जात, पंथ आणि राजकारण यांच्या बजबजपुरीतून वदि्यापीठांना बाहेर काढावे लागेल. असे झाले तरच जपानचे अ‍ॅबेनॉमिक्स भारतातील रोजगार वाढवू शकेल.

जपानबरोबर अणुकरार न झाल्यामुळे ही भेट फसली असा निष्कर्ष फक्त अपुऱ्या माहितीवर निघू शकतो. वस्तुस्थिती वेगळी आहे. अणुबॉम्बची दाहकता अनुभवलेला जपान अणुऊर्जेबद्दल हळवा असल्याने सहजासहजी अणुकरार होणार नाही याची स्पष्ट कल्पना भारत सरकारला भेटीपूर्वी होती. त्यामुळे अपेक्षाभंगाचे कारण नाही. करार झाला नसला तरी त्या दिशेने चर्चा सुरू राहणार आहे. यातील महत्त्वाची बाब अशी की भारताला अणुभट्ट्या विकण्यासाठी अमेरिका उतावीळ असली तरी तेथील हिताची, जीई अशा कंपन्यांमध्ये जपानची मोठी गुंतवणूक असल्याने काही अडचणी येत आहेत. मोदींच्या भेटीनंतर जपान याबाबत थोडी सौम्य भूमिका घेईल अशी अपेक्षा आहे. म्हणजे जे जपानकडून साध्य करायचे ते अमेरिकेतून साध्य होईल. अर्थात, त्यातही अनेक अडथळे येऊ शकतात. याला पूरक अशी घडामोड म्हणजे जपानने भारताबरोबरच्या संबंधांना ‘विशेष सामरिक संबंधा’चा दर्जा देऊन त्याचे मूल्य वाढवले. आशियामधील त्रिकोणात चीन, जपान व भारत या तीन शक्ती मानल्या जातात. चीनचा विस्तारवाद रोखण्यासाठी अमेरिकेने मुस्लिम राष्ट्रांमधील अंग काढून घेऊन आशियाई समुद्रात पाऊल टाकले. पाठोपाठ चीनला वेसण घालण्यासाठी जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया यांनी उघड हालचाली सुरू केल्या असून लष्करी कवायतींमध्ये सामील होऊन भारतानेही सकारात्मक भूमिका घेतली. याच विस्तारवादाचा उल्लेख मोदींनी जपानमध्ये केला. चीनच्या रेल्वे कॉर्पोरेशनने भारतात गुंतवणूक करण्याची तयारी स्वत:हून दाखवली ती भारत-जपान यांच्या स्ट्रॅटेजिक मैत्रीचा अर्थ लक्षात घेऊन. आम्ही स्ट्रॅटेजिक पार्टनर आहोत असे भारत व जपान यांनी उघडपणे म्हणण्यामागे ही पार्श्वभूमी आहे. चीनची नजर असलेल्या ईशान्य भारतात चति्रवाणी व रेडिओचे जाळे वाढवण्याचा आराखडा मोदी जपानमध्ये असतानाच दिल्लीत जावडेकरांनी जाहीर केला. चीनला समोर ठेवून या घडामोडी होत आहेत, मात्र चीनबरोबर दुश्मनी घेण्याचा उद्देश त्यामध्ये नाही. भारताबरोबर मैत्री पक्की करतानाच काही महत्त्वाच्या पदांवर चीन समर्थकांची नेमणूक अ‍ॅबे यांनी केली. दोघांनाही चीनची गरज आहे व चीनला दोघांची. व्यापाराची वा लष्कराची भाषा जगाला कळते, वैश्विक उपदेशांची नाही. उपदेश करणारा भारत आता व्यापाराची भाषा बोलू लागला आहे. जपानचे अ‍ॅबेनॉमिक्स व भारताचे मोदीनॉमिक्स हे परस्परपूरक आहेत.