आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Editorial On Political Iftar Party

इफ्तारची शिष्टाई (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रमजानच्या निमित्ताने राजकीय पक्षांकडून साजर्‍या केल्या जाणार्‍या इफ्तार पार्ट्यांचा उद्देश हा आता केवळ नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव म्हणून पुढे येत आहे. गेल्या काही वर्षांत तर या पार्ट्या म्हणजे राजकीय विसंवाद मिटवण्यापासून रागावून दूरवर गेलेल्या, विजनवासात गेलेल्या सहकार्‍यांना एकत्र आणण्याची सोय झाली आहे. रविवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीतील पंचतारांकित अशोक हॉटेलमध्ये आयोजित केलेली इफ्तार पार्टी ही अशाच स्वरूपाची होती. म्हटले तर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर या पक्षाकडून नवी राजकीय समीकरणे बांधणारा हा पहिलाच प्रयत्न होता. वास्तविक गेली तीन वर्षे सोनिया गांधी यांनी देशातील विविध नैसर्गिक आपत्तींच्या कारणास्तव सत्तेत असूनही अशी पार्टी आयोजित केली नव्हती. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या नेत्रदीपक विजयात काँग्रेसची जी काही धुळधाण उडाली होती ती इतकी जबरदस्त होती की, या पक्षाच्या घराचे छप्पर उडून फक्त वासेच उरले आहेत. अशा उद्ध्वस्त घराची डागडुजी लवकर करून ते घर पुन्हा दिमाखात उभे राहणे अवघड आहे; पण घरदुरुस्ती मात्र अपरिहार्य आहे. ही घरदुरुस्ती म्हणजे समविचारी पक्षांना पुन्हा एकत्र आणणे व वेळ पडल्यास त्यांच्या नाकदुर्‍या काढणे. काँग्रेस याबाबतीत माहीर आहे, त्यांना चांगलाच अनुभव आहे. पण रविवारच्या इफ्तार पार्टीत काँग्रेसचे नेते वगळता जनता दल(सं.)चे अध्यक्ष शरद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोनच नेते हजर होते. यातून एक अर्थ असा निघू शकतो की, देशातील सर्वच छोट्या-मोठ्या प्रादेशिक, राष्ट्रीय राजकीय पक्षांना काँग्रेसची गरज आता पडेनाशी झालेली आहे. वास्तविक काँग्रेसने 2004 ते 2014 अशा दहा वर्षांत यूपीए आघाडी बांधताना दक्षिणेतील प्रमुख पक्ष द्रमुकपासून जम्मू आणि काश्मीरमधील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्सपर्यंत, पूर्वेतील डावे पक्ष - तृणमूल काँग्रेसपासून पश्चिम भारतातील राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत, मायावतींची बहुजन समाज पार्टी- मुलायमसिंह यांच्या समाजवादी पार्टीपासून आंध्रातील तेलंगण राष्ट्र समितीपर्यंत सर्वच प्रमुख पक्षांची राजकीय मोट बांधली होती. या पक्षांच्या रुसव्याफुगव्यांचे लाड करत काँग्रेसने दहा वर्षे राज्य केले, पण या कालावधीत भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप व जनतेशी असलेला संपर्क तुटल्यामुळे काँग्रेसची अन्य पक्षांच्या तुलनेत प्रतिमा इतकी काळवंडली की, एका देशव्यापी पक्षाचा जनाधार झपाट्याने खाली येऊन त्यांचे लोकसभेतील संख्याबळही 44 वर आले. या खालावलेल्या संख्याबळामुळे काँग्रेसची देशाच्या राजकारणातील राजकीय किंमतही शून्यवत होऊन बसली. याचे स्पष्ट चित्र या पार्टीत दिसून आले. या पार्टीत मायावती, मुलायमसिंह, शरद पवार, ओमर अब्दुल्ला, अजितसिंग किंवा डाव्या पक्षांचे नेते असे एकेकाळचे दिग्गज नेते हजर नव्हते. ते उपस्थित असते तर काँग्रेस पक्षाची देशाच्या राजकारणात अजूनही गरज आहे, असा संकेत पोहोचला असता. पण तसे काहीच झाले नाही. उलट काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी अन्य पक्षांच्या गैरहजेरीबद्दल थातूरमातूर स्पष्टीकरण दिले, पण या उत्तरातून सत्य परिस्थिती लपत नाही.
सध्या काँग्रेस राजकीयदृष्ट्या इतकी एकाकी पडत चालली आहे की, संसदेतही प्रमुख विरोधी पक्षाच्या मुद्द्यावरून त्यांच्या समर्थनासाठी किंवा त्यांच्याशी हातमिळवणी करण्यासाठी एकही पक्ष पुढे आलेला नाही. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता, बिजू जनता दल काँग्रेसच्या मागे उभे राहतील असे वाटत होते; पण त्यांनीही या वादातून सोयीस्कर माघार घेतली आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष व प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही त्यांच्या राज्याला विशेष आर्थिक पॅकेज मिळेल, अशा आशेपायी काँग्रेसला संसदेत कोणतेच समर्थन न करण्याचा विडाच उचलला आहे. एकंदरीत सर्वच पक्षांनी संसदेत व संसदेबाहेर काँग्रेसला वाळीत टाकण्याचे केलेले हे प्रयत्न राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे ठरतात. या पार्टीत एकमेकांचे तोंड न पाहणारे शरद यादव व लालूप्रसाद यादव हे दोन नेते उपस्थित असले तरी या दोघांचा घरोबा किती काळ चालेल, हा प्रश्नच आहे. या दोघा यादव नेत्यांना बिहारमधील भाजपची वाढती शक्ती रोखण्यासाठी काँग्रेसची गरज आहे व काँग्रेसलाही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी या दोघांची गरज वाटू लागली आहे. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने भाजपला रोखण्यासाठी सोनिया गांधी यांनी जयललिता यांच्यापासून मुलायमसिंह, मायावती, करुणानिधी यांच्याशी शिष्टाई केली होती व ही देशव्यापी राजकीय आघाडी उभी केल्यामुळे एनडीए आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता 2019 च्या लोकसभा निवडणुका लांब आहेत; पण येत्या काही काळात महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, प. बंगाल, उत्तर प्रदेशमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुका काँग्रेसच्या अस्तित्वासाठी निर्णायक आहेत. एकंदरीत सोनियांच्या इफ्तार पार्टीकडे बहुतांश पक्षांनी फिरवलेली पाठ पाहता काँग्रेसची पुढची वाटचाल अडथळ्यांची व आव्हानांचीच आहे.