आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाराणसीतला महासंग्राम (अग्रलेख)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचे नाव जाहीर केले, तेव्हाच त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशातील वाराणसी हा मतदारसंघही निश्चित करण्यात आला होता. मोदी गुजरातमधून कुठून उभे राहणार, हा प्रश्न संघ परिवारासाठी महत्त्वाचा नव्हता; पण 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदींचा होणारा नेत्रदीपक विजय हा गुजरातमधून नव्हे, तर जातीय समीकरणाची प्रचंड गुंतागुंत असलेल्या वाराणसी मतदारसंघातून झाल्यास ते हिंदूंचे मसिहा ठरतील व तसा संदेश देशातल्या सेक्युलर राजकारण करणार्‍या राजकीय पक्षांना मिळेल, अशी संघ परिवाराची व्यूहरचना होती. संघ परिवाराने मोदींच्या वाराणसीमधील उमेदवारीबाबत भाजपमधील ज्येष्ठ धुरीणांनाही अंधारात ठेवले होते. त्याच्या प्रतिक्रिया नंतर दिसून आल्या. मोदींचे नाव वाराणसीतून जाहीर होणार, याची कुजबुज सुरू होताच वाराणसीतील भाजपचेच विद्यमान खासदार मुरली मनोहर जोशी यांनी खळखळ व्यक्त केली. त्यांनी आपला मतदारसंघ मोदींना सोडण्यास नकार दिला. पण त्यांचा विरोध संघ परिवाराने मोडून काढला व मोदींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. मोदींची वाराणसीतील उमेदवारी देशाच्या राजकारणातली जशी अनपेक्षित व धक्का देणारी घटना होती तसेच ‘आम आदमी पार्टी’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी मोदींना वाराणसीतून दिलेले आव्हानही अनपेक्षित होते. काल-परवापर्यंत काँग्रेसविरोधात रण माजवणारे केजरीवाल थेट मोदींना आव्हान देतील, याची गंधवार्ताही मोदींना व त्यांच्या खुफिया एजंटांना लागली नाही. केजरीवाल यांनी दिलेल्या आकस्मिक आव्हानामुळेच मोदींच्या संभाव्य दणदणीत विजयाला गालबोट लागेल, अशी चर्चा सुरू झाली. आता मंगळवारी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर करताना मोदींच्या दिल्लीच्या तख्ताकडे जाणार्‍या रथामध्ये आणखी एक अडथळा आणला आहे. काँग्रेसने वाराणसी लोकसभा मतदारसंघात येणार्‍या पिंडरा विधानसभा मतदारसंघातील आमदार अजय राय यांना उमेदवारी देताना जातीय राजकारणाचा विचार केला आहे. काँग्रेसने वाराणसीमध्ये एवढ्या उशिरा का उमेदवार जाहीर केला, याचे उत्तर तेथील गुंतागुंतीच्या जातीय राजकारणात दडलेले आहे. एक म्हणजे, या मतदारसंघात मतदारांची संख्या सुमारे 16 लाख आहे. त्यात दोन लाख मते ब्राह्मण समाजाची, सव्वातीन लाख मते बनिया समाजाची, साडेचार लाख मते मुस्लिमांची, सव्वा लाख मते कुर्मी समाजाची, 90 हजार मते दलितांची व सव्वा लाख मते यादवांची, सव्वादोन लाख मते भूमिहार समाजाची व उर्वरित मतदार ठाकूर, कोइरी, कायस्थ या समाजाचे आहेत. या आकडेवारीवर नजर मारल्यास कोणत्याही विशिष्ट समाजाचा या मतदारसंघावर प्रभाव नाही, असे दिसून येते. पण कोणत्याही समाजघटकाचा प्रभाव नाही म्हणजे मतांचे ध्रुवीकरण किंवा सोशल इंजिनिअरिंग होऊ शकत नाही, असे नाही. मायावतींनी ब्राह्मण, ओबीसी, दलित असे अशक्य वाटणारे सोशल इंजिनिअरिंग उत्तर प्रदेशात करून दाखवले होते व या इतिहासाची पुनरावृत्ती मोदींना वाराणसीमध्ये करून दाखवायची आहे. मोदींना हिंदू उच्च जातींची जशी मते मिळवायची आहेत, तसेच त्यांना ओबीसी आणि दलित मतांचेही ध्रुवीकरण करायचे आहे. मोदींना मुस्लिमांची मते महत्त्वाची वाटत नाहीत, याचे कारण वाराणसीमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी त्यांच्याच बळावर आजपर्यंत कोणी उमेदवार निवडून आलेला नाही. प्रत्येक उमेदवाराला अन्य जातींना चुचकारावे लागते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भविष्यात मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांची प्रतिमा गुजरातचे नेते अशी न ठेवता ती उत्तर प्रदेशासारख्या जातीय राजकारणाने पोखरलेल्या पण मुस्लिमबहुल मतदारांतून निवडून आलेला हिंदू नेता, अशीही स्थापित करण्याचे प्रयत्न आहेत. काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी देताना याच समीकरणाचा विचार करून मोदींचे मताधिक्य कसे खाली येऊ शकते, याचा अधिक विचार केल्याचे स्पष्ट दिसून येते. काँग्रेसच्या दृष्टीने केजरीवाल फॅक्टर महत्त्वाचा आहे, तो या अर्थाने की, मोदींच्या सुपरमॅन प्रतिमेला आव्हान देणारा नेता खुद्द त्यांच्या पक्षातच नाही. त्यातच गेल्या चार महिन्यांत केजरीवाल यांनी एक राजकीय नेता म्हणून देशभरात आपली सर्वांपेक्षा वेगळी प्रतिमा प्रस्थापित केल्याने मोदींना ते आव्हान देत असतील, तर ते काँग्रेसच्या फायद्याचे होते. पण केजरीवाल यांना वाराणसीत मतदारांना आपल्याकडे वळवण्यात बर्‍याच मर्यादा आहेत. एक म्हणजे, त्यांचा पक्ष नवा असल्याने वाराणसीच्या जनतेमध्ये त्यांच्या राजकारणाविषयी उत्सुकता आहे; पण त्याचे परावर्तन मतांमध्ये किती होईल, हा प्रश्न आहे. केजरीवाल मुस्लिम व काही प्रमाणात मध्यमवर्गाला साद घालू शकतात; पण त्यांच्या मतांवर ते निवडून येणे अशक्य आहे. काँग्रेसचे अजय राय हे केजरीवाल यांच्यापेक्षा अधिक मते मिळवू शकतात व ते मोदींना मिळणार्‍या मतांचे विभाजन केजरीवाल यांच्यापेक्षा अधिक करू शकतात. कारण अजय राय या भागातून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. एकदा ते वाराणसीचे आमदारही होते. त्यामुळे राय यांना मानणारे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे व त्यांची धनशक्ती काँग्रेसच्या अधिक फायद्याची आहे. राजनाथसिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना अजय राय त्यांच्या जवळचे होते. 2009 मध्ये त्यांनी पक्षांतर्गत असंतोषातून भाजपला सोडचिठ्ठी दिली होती व नंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले होते. अशा अजय राय यांच्याकडे सध्या सुमारे अडीच लाख भूमिहार व साडेचार लाख मुस्लिम मते जातील, असा हिशेब मांडला जात आहे. शिवाय त्यांच्याकडे भाजपतील मोदीविरोधी गटाची (मुरली मनोहर जोशी यांना मानणारा वर्ग) मते जातील, असेही बोलले जात आहे. अजय राय यांना वाराणसीची खडान्खडा माहिती असल्याने त्यांना काँग्रेसची बाहेरून मदतही लागणार नाही. एकंदरीत मोदींना वाराणसीत पराभूत करण्यासाठी एकच नेता उभा करून मतांचे ध्रुवीकरण करण्यापेक्षा अनेक उमेदवार उभे करून मतांचे विभाजन करण्याची राजकीय चाल खेळली गेली आहे.