आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन पुरेसे नाही (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा मोर्चाच्या आयोजकांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नवी मुंबईत माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठा जातीला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना हे आवाहन केले. आवाहन ठीक असले तरी परिस्थिती आता आवाहन करण्यापलीकडे गेली आहे. मराठा समाजाला आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा या दोन प्रमुख मागण्या मराठा क्रांती मोर्चानंतर पुढे आल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील प्रचंड प्रतिसाद पाहून आता मुंबईत महामोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईत असा मोर्चा निघू नये यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न सुरू झाल्याचे सांगतात; पण त्याला यश मिळण्याची शक्यता नाही. शांततेत काढला गेलेला भव्य मोर्चा हा शक्तिप्रदर्शनाचा उत्तम मार्ग असल्याचे लक्षात आल्यावर मुंबईत मोर्चा काढण्याची संधी कोणताही आयोजक सोडणार नाही. त्याला प्रतिसादही तुफान मिळेल व मुंबईतील जनजीवन निदान दोन दिवस तरी कोलमडेल. मोर्चे शांततेत निघत असले तरी त्यातील आक्रमकता वाढत चालली आहे. याची प्रतिक्रिया म्हणून ओबीसी व मागास जातींमध्ये अस्वस्थता वाढली आहे. छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ निघणाऱ्या मोर्चाचे नामकरण अचानक ‘ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा’ असे झाले. औरंगाबादमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याचे समर्थन करण्यासाठी विशेष परिषद झाली व त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. आरक्षण व अॅट्रॉसिटी हे दोन्ही मुद्दे ज्या समूहांशी निगडित आहेत, त्या लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे साहजिक आहे, असे मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनीही समजून घेतले पाहिजे. यामागे कोणाचे कटकारस्थान नाही.
मात्र शक्तिप्रदर्शनात सरकारची कोंडी झाली आहे व त्यातून मार्ग कसा काढावा याचे निश्चित उत्तर सरकारकडे नाही. मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाची ग्वाही दिली; पण ते प्रत्यक्षात आणणार कसे हे सांगितले नाही. मराठा समाजाला आरक्षण देणे अशक्य नाही. मात्र त्यासाठी व्यवस्थित आराखडा तयार करावा लागेल व अन्य समाजगटांचीही सहमती मिळवावी लागेल. यातील कायदेशीर बाबी तज्ज्ञांकडून तपासता येतील; पण हा प्रश्न फक्त कायद्याचा नसून भावनेचा आहे. त्या बाजूवर काम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे कुमक नाही. मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे आवाहन केले असले तरी मोर्चाचे आयोजक कोण हे अद्याप पुढे आलेले नाही. गुजरातमध्ये हार्दिक पटेल हा चेहरा समोर होता. इथे तसे नाही. आयोजक पडद्याआड राहिले असताना चर्चा कोणाशी करणार, हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्र्यांची कोंडी इथेच होणार आहे. अॅट्रॉसिटी कायद्यातील सुधारणांबाबतीही असाच पेच आहे. सुधारणा कोणत्या व कशा प्रकारच्या हे सांगणारा कुणी नाही. मोर्चातून मागण्या तर होत आहेत; पण त्या मागण्यांची जबाबदारी घेणारे चेहरे पुढे आलेले नाहीत. जाट, पटेल समाजाचे आंदोलन व महाराष्ट्रातील आंदोलन यात हा प्रमुख फरक आहे. ही राजकीय खेळीही असू शकते. उद्या ओबीसी, मागास जाती यांचेही, असे नेत्यांचे चेहरे नसलेले, मोर्चे निघू लागले तर पेच आणखी गडद होईल. शिवाय हे नेतृत्व त्या समाजाला मान्य असणारे हवे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरील पंचाईत ही आहे.
भाजपमध्येही मराठा आमदारांची संख्या लक्षणीय आहे. पण त्यापैकी कुणीही चर्चेसाठी पुढाकार घेतलेला नाही. स्वत: प्रदेशाध्यक्ष मोर्चात सामील होते. खडसेंच्या शक्तिप्रदर्शनातही त्यांनी हजेरी लावली होती. दुसरीकडे पंकजा मुंडे भुजबळांच्या भेटीला गेल्या. पक्षातील वारे दाखवणाऱ्या या घटना आहेत. चर्चा कुणाशी, याचबरोबर चर्चेसाठी भाजपतून पुढाकार कुणाचा हाही प्रश्न आहे. अशा स्थितीत केवळ आवाहनावर भागणारे नाही. मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन सर्वपक्षीय समिती उभी करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. मराठा आरक्षण सर्वमान्य असताना, प्रश्न आरक्षण मिळवून देणारी योग्य कायदेशीर पावले उचलण्याचा आहे. त्यावर सर्वपक्षीय समितीमध्येच मार्ग निघू शकेल. चर्चेसाठी कोण पुढे येणार याची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी स्वत:च व्यासपीठ तयार करण्याची गरज आहे. विधीमंडळाचे विशेष अधिवेशन हा उत्तम मार्ग असून मुख्यमंत्र्यांनी याचा पाठपुरावा करावा.महाराष्ट्रातील उद्योगधंदे वाढवण्याकडे गेली दोन वर्षे मुख्यमंत्र्यांचे अधिक लक्ष आहे. त्यात गैर काहीही नाही, महाराष्ट्रासाठी तेच महत्त्वाचे आहे. कारण जीएसटी लागू झाला की सर्वात मोठे नुकसान महाराष्ट्राचे होणार आहे. मात्र हा सध्या फक्त मुख्यमंत्र्यांचा अजेंडा आहे. तो संपूर्ण मराठी समाजाचा अजेंडा घडणे आवश्यक आहे. तो अजेंडा राबवण्यासाठी सर्व पक्षांची मदत मिळवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांना करावे लागतील, पण विशेष धडपड स्वपक्षीयांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी करावी लागेल. समस्या सामाजिक असली तरी कोंडी राजकीय आहे. ती केवळ चर्चेच्या आवाहनातून सुटणार नाही.
बातम्या आणखी आहेत...