आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा विजय व आपचा त्रागा (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील निकालानंतर ‘आप’च्या नेत्यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. हे केजरीवाल यांच्या आततायी स्वभावाला धरूनच झाले. पराभव झाला की संशयाचे धुके उभे करून आपले अवगुण झाकायचे ही पद्धत ‘आप’ने पहिल्यापासून वापरली आहे. पुराव्याविना सटासट आरोप करत सुटायचे, त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीवर पक्षाची हवा करायची ही पद्धत वापरून आपने तीन वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता मिळवली. दिल्लीत काही चांगले कामही केले. मात्र, मुख्य रोख नरेंद्र मोदी यांची बदनामी करण्यावर ठेवला. राष्ट्रीय नेते होण्याची महत्त्वाकांक्षा अरविंद केजरीवाल यांच्यात जागी झाली. मात्र, त्यासाठी पक्षबांधणी करण्याऐवजी आरोपांच्या फैरी झाडत सत्ता मिळेल, असे त्यांना वाटले. दिल्ली विधानसभेत ‘आप’ला विजय मिळाला तेव्हा एक तर पक्षाची प्रतिमा चांगली होती. दुसऱ्या बाजूला अमित शहा यांनी अहंकारापोटी हर्षवर्धनसह अनेक नेत्यांना बाजूला सारून किरण बेदींचे घोडे पुढे दामटले. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. मात्र, दिल्ली व बिहारमधील पराभवानंतर अमित शहा शहाणे झाले आणि त्यांनी कार्यपद्धती बदलली. केजरीवाल बदलले नाहीत. जगाचा शहाणपणा व नीतिमत्ता आमच्याकडेच आहे, अशा गुर्मीत ते व त्यांचे भक्तगण वावरत राहिले. नीतीच्या गप्पा मारणाऱ्या केजरीवाल यांनी स्वत:चा खटला चालवण्यासाठी दिल्लीकरांच्या तिजोरीतील चार कोटी उचलले. दिल्लीकरांना हे पसंत पडलेले नाही, हे पालिका निवडणुकांतून दिसून आले. आम्ही जेथून विजयी झालो तेथे भाजपचे नगरसेवक विजयी होतातच कसे, असा खुळचट सवाल आपचे नेते करत आहेत. भारतात अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. त्या नेत्यांनी कधी असे सवाल केले नाहीत. जय-पराजय खुल्या मनाने स्वीकारणे ही भारतीय लोकशाहीची परंपरा आहे. देशात भाजपची सत्ता आली हे न आवडणारे लोकही आहेत. आपली आवड-निवड ठरवण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. मात्र, माझ्याप्रमाणेच सर्व जनतेचे मत आहे असे नेत्याला, व्यक्तीला वा पक्षाला वाटू लागले तर तो भ्रमिष्ट होत चालला आहे, असे म्हणावे लागते. नरेंद्र मोदी हे सायकोपाथ आहेत असली भाषा केजरीवाल यांनी वापरली होती. त्याला प्रत्युत्तर देण्याचे मोदी यांनी शहाणपणाने टाळले. मात्र, पंजाब, गोवा व आता दिल्लीत होणाऱ्या पराभवानंतर आपने ईव्हीएमवर चालवलेली टीका हे केजरीवाल भ्रमिष्ट होत चालल्याचे लक्षण आहे. 

अर्थात भाजपनेही २००९मध्ये ईव्हीएमच्या विरोधात थयथयाट केला होता. त्या वेळचा काँग्रेसचा विजय केजरीवालांप्रमाणेच लालकृष्ण अडवाणी यांना सहन झाला नव्हता. ईव्हीएमवर संशय व्यक्त करणारी पुस्तके भाजप नेत्यांनी लिहिली. अडवाणी यांच्या नेतृत्वाचा उतार सुरू झाला तो त्यानंतरच. मात्र, पुढे भाजपने ही टीका कमी केली व निवडणूक आयोगाला सहकार्य करत ईव्हीएम यंत्रात बऱ्याच सुधारणा केल्या. पुढील निवडणुकीत मतदारांना मताची पावतीही मिळेल. त्यासाठी साडेतीन हजार कोटी सरकारने मंजूर केले आहे. घोटाळा करणाऱ्या यंत्रातून फायदा होत असता तर मोदी सरकारने इतकी मोठी रक्कम मंजूर केलीच नसती. तीन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील राजौरी मतदारसंघातही पोटनिवडणुकीत आपला फटका बसला. तेथे पावती देणारी ईव्हीएम बसवण्यात आली होती. गमतीचा भाग म्हणजे पालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयुक्त व अन्य यंत्रणा ही केजरीवाल यांनी सुचवलेल्या अधिकाऱ्यांची होती. तसेच केजरीवाल यांच्या सरकारचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात होते. हे सर्व भाजपकडून पैसे घेऊन काम करत होते काय? दिवसेंदिवस आप ही अराजकवादी पार्टी बनत चालली आहे. हे जनतेच्या लक्षात आल्यामुळे काही बरे काम करूनही दिल्लीकरांनी आपला विरोधी बाकावर बसवले. काँग्रेसला ते बाकही मिळवता आले नाही. तथापि, काँग्रेसची घसरण हा वेगळा विषय आहे. 
भाजपला सलग तिसऱ्यांदा विजय मिळाला असला तरी ही सर्वोत्तम कामाला पावती आहे, असे समजण्याचे कारण नाही. सध्या मोदी नावाची चलती आहे व विरोधक सैरभैर झाले असल्याने जनतेने भाजपला पुन्हा मतदान केले. हा मोदींच्या धोरणांचा विजय आहे, असे अमित शहा म्हणाले. शहरातील पालिकांच्या निवडणुकाही पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर व धोरणावर लढवल्या जात असतील तर ते लोकशाहीसाठी चांगले लक्षण नाही. विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा आत्मा आहे व विकेंद्रीकरण हे फक्त प्रशासकीय अधिकारांचे नसून राजकीय अधिकारांचेही असते. भाजप हा एकखांबी तंबू असल्याची कबुली अमित शहा देत आहेत. इंदिरा गांधींच्या काळात काँग्रेसही असाच एकखांबी तंबू बनली. त्यानंतर काँग्रेस पुन्हा पुन्हा सत्तेत येत असली तरी पक्षाची वाताहत होण्यास ही एकखांबी नेतृत्वाची राजनीती जबाबदार ठरली हे भाजपने वेळीच लक्षात घ्यावे.
बातम्या आणखी आहेत...