आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सांगाड्याची गोष्ट (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विज्ञान प्रवाही असते. नवनवी गृहीतके मांडणे, त्यातून कलाटणी देणारे निष्कर्ष शोधणे, स्वत:च्याच संशोधनात सातत्याने भर टाकणे व केवळ वर्तमानाला नव्हे, तर भूतकाळालाही नव्याने समजून घेण्याचा विशाल उदारपणा विज्ञानाच्या प्रवृत्तीत असतो. विज्ञानाला ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या मुळाशी जसे जावेसे वाटते तसे मानवजातीच्या उत्क्रांतीचे मागचे गुह्यही शोधावेसे वाटते. गेल्या आठवड्यात ‘नेचर’ या विज्ञानाला वाहिलेल्या नियतकालिकात माणसाच्या जन्माचा एक धक्कादायक शोधलेख प्रसिद्ध झाला.

या लेखामुळे मानवाची उत्पत्ती, त्याच्या शरीरात होत असलेले क्रमिक बदल, अन्नाच्या शोधासाठी त्याचे होत असलेले स्थलांतर व त्याने शोधलेल्या वस्तू यांच्यावर नव्याने प्रकाश पडला आहे. सध्याच्या मानव जातीचा पूर्वज समजल्या जाणाऱ्या होमो सेपियन्सचे सांगाडे पूर्व आफ्रिकेत मिळाले तेव्हा त्यांचा काळ सुमारे एक लाख ९५ हजार वर्षे असा सांगितला गेला होता. पण साठच्या दशकात मोरोक्को येथील जेबेल इरहूड या ठिकाणी सापडलेल्या पाच माणसांच्या सांगाड्याचा काळ सुमारे तीन लाख वर्षे इतका मागे जाणारा आहे. या संशोधनामुळे दोन महत्त्वाच्या बाबी पुढे आल्या आहेत. एक, माणूस केवळ पूर्व आफ्रिकेत (इथिओपिया) राहत नव्हता किंवा त्याचा जन्म त्या प्रदेशात झाला नसून तो हजारो किमी दूर पश्चिम वा मध्य आफ्रिकेत, सध्याच्या सहारा वाळवंट क्षेत्रात सुमारे दीड लाख वर्षांपूर्वी राहत होता आणि तो शिकारीच्या साधनांसह अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत होता. दुसरी बाब म्हणजे आजचा माणूस हा निअँडरथलपेक्षा वेगळा होता. मोरोक्कोत सापडलेल्या मानवी सांगाड्याचा चेहरा, जबडा, दातांची रचना आधुनिक मानवजातीशी मिळतीजुळती आहे. समजा आज हाच माणूस रस्त्यावरून चालला तर तो आपला लाखो वर्षांपूर्वीचा पूर्वज आहे हे पटकन ओळखू शकू इतके त्याचे आपल्याशी साधर्म्य आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
 
आज माणसाच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते असणारे चिम्पांझी व बोनोबोज हे दोन होमोसेपिअन्स प्राणी आपल्याबरोबर आहेत. आपले या प्रजातीशी नाते सुमारे ६० लाख वर्षांपासूनचे आहे. मानव व ही माकड प्रजाती यांच्यात सर्वात मोठा फरक मेंदूच्या रचनेत आहेत. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आपले या प्रजातींशी असलेले नाते तुटले व होमिनीन्स म्हणून मानव जात वेगळी ओळखली जाऊ लागली. ही जात माकडांसारखी दिसत असली तरी त्यांची उंची कमी होती. मेंदूचा आकार छोटा होता व ते दगडांचा वापर करण्यास शिकले होते. मोरोक्कोतील जेबेल इरहूडमध्ये सापडलेल्या उत्खननातील पाच सांगाड्यंासोबत वेगवेगळ्या प्रकारचे टोकदार दगडही सापडले आहेत. या दगडांची टोके जळालेली आढळली आहेत, त्याचा अर्थ असा की, ही मानव जात आगीच्या साहाय्याने आपले अन्न शिजवत असावी. शास्त्रज्ञांनी हे सर्व अनुमान मांडण्यासाठी प्रगत अशी थर्मोल्युमिनसन्स ही संशोधन पद्धत वापरली आहे. या पद्धतीत जळालेल्या दगडांचे पृथ:करण करून काळ  शोधला जातो.

त्यातून हे दगड व सांगाडे यांचा काळ सुमारे तीन लाख वर्षे असा निष्कर्ष हाती लागला आहे. जेबेल इरहूडमधील उत्खनन हे १९६१ पासून सुरू आहे व आज ५५ वर्षांनंतर मानवी इतिहासाला एक वेगळी कलाटणी देणारा मोलाचा ठेवा आपल्याला मिळाला आहे. या संशोधनातून सहारा प्रदेशातल्या ऋतुबदलाबाबत जी वैज्ञानिक मांडणी केली जात होती त्यालाही पुष्टी मिळाली आहे. म्हणजे तीन लाख वर्षांपूर्वी आजचा वाळवंट असलेला सहारा जंगले, गवताळ प्रदेश व वन्यजीवांनी समृद्ध असा प्रदेश होता आणि तसे पुरावे जेबेल इरहूडमध्ये मिळाले आहेत.
 
या उत्खननाच्या ठिकाणी विल्डर बिस्ट, हरणे, झेब्रा व सिंह-चित्त्यासारख्या प्राण्यांचे अवशेष मिळाले आहेत. म्हणजे या प्रदेशात राहणारा माणूस या वन्यजीवांची तीक्ष्ण हत्याराने-भाल्याने-शिकार करण्यात तरबेज होता, असे म्हणता येईल. सहारा प्रदेशाची व्याप्ती टांझानिया ते मोरोक्को अशी विस्तीर्ण आहे. हा आकार अमेरिकेएवढा आहे. एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात मानवजात जगत होती व ती टोळ्यांच्या स्वरूपात अन्नाच्या शोधासाठी एका ठिकाणाहून अन्य प्रदेशात स्थलांतर करत होती, असे व्यापक अनुमान या संशोधनातून मिळते. एकुणात शास्त्रज्ञांना भविष्यात माणसाचे पूर्वज शोधण्यासाठी या प्रदेशात शोधमोहीम घ्यावी लागणार आहे. यातून माणसाच्या प्रगतीचे आजपर्यंतचे अनेक अज्ञात टप्पे तसेच उत्क्रांतीच्या काळात मानवी मेंदूमध्ये झालेले बदल आपल्याला कळतील. विज्ञानाच्या निरंतर प्रवासाचे हे फायदे उपकारकच आहेत.