आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिक्कांचे अवमूल्यन (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन्फोसिसचे सीईओ विशाल सिक्का यांना नारायण मूर्ती यांनी पायउतार होण्यास भाग पाडले. आर्थिक कोंडीत सापडलेल्या इन्फोसिसची पुन्हा भरभराट करण्यासाठी सिक्का यांना तीन वर्षांपूर्वी सन्मानाने आणण्यात आले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती त्या वेळी म्हणाले होते की, ‘सिक्का म्हणजे पैसा आणि विशाल सिक्का म्हणजे खूप पैसा. इन्फोसिसला खूप पैशाची गरज आहे.’ मात्र, नंतर मूर्तींनी सिक्कांचे अवमूल्यन करण्यासाठी कंबर कसली. त्यात ते यशस्वीही झाले. संस्थापकांकडून केल्या जाणाऱ्या कटकटींना कंटाळून आणि बेजबाबदार आरोपांवर सफाई देण्याचा वैताग आल्याने राजीनामा देत असल्याचे सिक्का यांनी म्हटले आहे. बाप व पोरामधील भांडणासारखा हा प्रकार आहे. कॉर्पोरेट विश्व व्यावसायिक असले तरी माणसाचे गुण वा अवगुण तेथेही प्रभाव टाकतात. ‘सत्ता सोडणे सहजासहजी कुणाला जमत नाही, असे मूर्ती यांनी सिक्का यांच्याकडे सूत्रे देताना कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. जे अनेकांना जमत नाही, ते  मी करीत आहे, असे मूर्ती यांना सुचवायचे होते. परंतु सत्तेच्या मोहातून बाहेर पडणे त्यांनाही जमले नाही, हे सिक्कांच्या राजीनाम्यावरून दिसून येते.

पदावरून दूर राहायचे, पण नव्या माणसाला त्याच्या धोरणानुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्यायचे नाही, हा स्वभावगुण भारतात सर्वत्र दिसतो. डेलिगेशन ऑफ वर्क भल्याभल्यांना साध्य होत नाही आणि मग संघर्ष उभे राहतात. केवळ उद्योगक्षेत्र नव्हे तर राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रात याच स्वभावगुणाचे अवशेष दिसतात. मूर्ती यांनी संस्कृती व मूल्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे व इन्फोसिसमधील पारदर्शकता कमी झाली असे म्हटले. मूल्य व संस्कृती हे शब्द भुलवणारे असतात. त्याची नेमकी व्याख्या करता येत नाही. या संकल्पना व्यक्तीनुसार बदलतात. इन्फोसिस कशी चालवावी याची मूर्तींची संकल्पना सिक्कांच्या संकल्पनेशी जुळत नव्हती. अमेरिकेच्या पद्धतीने काम करणारा पंजाबी स्वभाव आणि धिमेपणाने, काटकसरीने पुढे जाणारी जुनी पठडी या दोन संस्कृतींमधील हा संघर्ष होता, असे बिझिनेस स्टँडर्डने म्हटले आहे. त्यात तथ्य आहे. धडाक्याने काम करणारी सिक्का यांची संस्कृती मूर्ती यांना मान्य नव्हती तर मुळात त्यांना इन्फोसिसमध्ये आणले का, असा प्रश्न येतो. इन्फोसिसला विशाल पैशांची गरज होती व सिक्का तो पैसा आणतील असे मूर्ती स्वत:च म्हणाले होते. सिक्का यांनी तसा तो आणलाही. अत्यंत कठीण परिस्थितीतही इन्फोसिसची आर्थिक क्षमता सिक्का यांनी वाढवली असे आकडे सांगतात. हा सिक्का खणखणीत होता, असे इन्फोसिसच्या बोर्डानेही म्हटले आहे व या दुर्दैवी घटनांचे खापर मूर्ती यांच्यावर उघडपणे फोडले आहे. मूर्ती त्यामुळे उद्विग्न झाले असले तरी मूल्ये व संस्कृतीचा जप करण्यापलीकडे त्यांना चोख उत्तर देता आलेले नाही.
 
पुढील पिढीला स्वतंत्रपणे काम करू द्यायचे की नाही, हा यातील कळीचा प्रश्न आहे. देवदत्त पटनाईक यांनी ‘ययाती सिंड्रोम’ असे नाव याला दिले आहे. रतन टाटा व मिस्त्री यांच्यामध्ये असाच संघर्ष उद््भवला. सिंघानिया यांच्या घरात तोच वाद सुरू आहे. मागील पिढी वानप्रस्थाश्रमात जाते व त्याचे कौतुक होते. पण ते पूर्ण वानप्रस्थाश्रम स्वीकारत नाहीत. चालू घडामोडीत लुडबुड सुरू ठेवतात. ज्या कंपनीला आपण जन्म दिला, जिला घडवले व नावारूपाला आणले, ती कंपनी मूळ मूल्यांपासून भरकटत असेल तर संस्थापकांनी त्याबद्दल तक्रार करणे, प्रसंगी पुन्हा सूत्रे ताब्यात घेणे यात गैर काय, असा प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो. त्यावर उत्तर इतकेच की अशी धास्ती असेल तर वानप्रस्थाश्रम स्वीकारू नये. शेवटपर्यंत कार्यरत राहणे त्याहून चांगले.

मग भल्याबुऱ्याची जबाबदारी स्वत:वरच घेता येते. मात्र एकदा खुर्ची सोडली की नव्या माणसाला स्वातंत्र्य देणे क्रमप्राप्त आहे. सिक्का किंवा मिस्त्री यांनी कोणतेही गंभीर गैरकृत्य केले नव्हते. सिक्कांवरील तथाकथित आरोपांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील वकिलांची समिती नेमून इन्फोसिसने चौकशी केली. त्या चौकशीत गैरप्रकार सिद्ध झाला नाही. हा चौकशी अहवाल जाहीर करा असे मूर्ती म्हणतात. त्यांच्या काळातील सर्व कारभार असा जाहीर होत होता काय? व्यवसायवाढ व मूल्ये यांच्यात ताण निर्माण होतो तेव्हा एकाला प्राधान्य द्यावे लागते. मूर्ती यांचे प्राधान्य मूल्यांना होते तर पैसा मिळवण्यासाठी सिक्कांना आणण्याची गरज नव्हती. सिक्कांनी पैसा आणल्यावर मूल्यांचे दाभण काढून त्यांना सतत टोचणे चुकीचे होते. कमी पैसा मिळवूनही इन्फोसिस चालवता आली असती. मग सिक्कांची गरज नव्हती. पण गरजेपुरते सिक्के आणायचे आणि मग त्यांचे अवमूल्यन करायचे हे कॉर्पोरेट गव्हर्नन्स नव्हे.
 
बातम्या आणखी आहेत...