आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सारे ‘भारतीय’ (अग्रलेख)

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहा वर्षांची एक पिढी धरली तरी सात पिढ्यांनी स्वातंत्र्याची पहाट पाहिली आहे. स्वातंत्र्यातला श्वास आनंददायीच असतो. ब्रिटिशांचे जे परचक्र दीडशे वर्षे टिकले, त्या स्वरूपाचे पारतंत्र्य भारतावर यापुढे कधीही कोसळणार नाही. कारण स्वातंत्र्य-पारतंत्र्याच्या संकल्पना बदलल्या आहेत. परक्या देशातून कोणी येईल आणि दिल्लीतली सत्ता ताब्यात घेईल, हा काळ इतिहासजमा झाला आहे. अर्थ, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती आणि संरक्षण या ‘पंचकारा’तील सार्वभौमत्व, स्वावलंबन, स्वत्व आणि स्वामित्व या कसोट्यांवर स्वातंत्र्याची व्याख्या ठरण्याचा हा काळ आहे. त्यामुळे देशभक्तीचे मोजमापसुद्धा या पंचकाराच्या फुटपट्टीनेच व्हायला हवे. तसे घडत नाही. स्वातंत्र्याला नख लावू शकणारी आव्हाने देशांतर्गत समस्यांमधूनच उभी राहत असल्याचे वास्तव दिसते ते यामुळेच.

एकीकडे मंगळावर स्वारी करण्यासाठी सज्ज झालेला भारत, सॉफ्टवेअर-सेवा क्षेत्रात मुसंडी मारणारा भारत, अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणाऱ्या किसानांचा भारत, जगातल्या सर्वोच्च उंचीवरच्या युद्धभूमीवर प्राणपणाने सीमा जपणाऱ्या पराक्रमी जवानांचा भारत यांसारख्या शंभर चांगल्या गोष्टी देशात घडत आहेत. त्याच वेळी रुग्णालयातली साठ बालके हकनाक बळी गेल्याचे ऐकावे लागते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि आयाबहिणींच्या अब्रूला हात घालणाऱ्या घटना काळजात घर करत आहेत. ‘वंदे मातरम्’बद्दल आदर असावाच, पण तेवढाच एकमेव निकष ठरवण्याची अरेरावी सहन करावी लागते आहे. गोरक्षण ही एखाद्याची श्रद्धा जरूर असू शकते, पण त्याला ‘राष्ट्रीय कर्तव्य’ ठरवण्याचा उपद्व्याप उघड्या डोळ्याने पाहावा लागतो आहे.

काश्मीरसह काही प्रांतांत देशविरोधी भावनेने मूळ धरल्याचे सिद्ध होत आहे. विशिष्ट धर्मीयांना देशातून चालते होण्याचे हाकारे दिले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची चर्चा आतापासूनच ऐरणीवर आणली जात असताना हे वातावरण चांगले म्हणता येत नाही. अमाप वैविध्याने समृद्ध असलेला भारत किमान सहिष्णुता बाळगल्याखेरीज एकसंध, एकजीव राहू शकत नाही, याची पक्की खूणगाठ बांधायला हवी. महासत्ता, विश्वगुरू या स्वप्नांचे स्वागत आहे, पण हा प्रवास कोणाच्या सोबतीने आणि कोणाला वगळून होणार हे महत्त्वाचे आहे. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत,’ ही संविधानाला मान्य असणारी प्रतिज्ञा आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या सतराशे साठ जाती आणि असंख्य धर्मांची गर्दी केवळ ‘भारतीय’ या एकाच शब्दात विरघळवून टाकण्याची सुबुद्धी रुजवून घेण्यासाठी ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करावा लागेल. परस्परांच्या जातीय, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक भेदांचा आदर बाळगूनही गुण्यागोविंदाने नांदण्याची शिकवण मनात मुरवण्यासाठी आजचा दिवस आहे. चीनची चिंता, ईशान्येचा गुंता आणि पाकिस्तानच्या कुरापतींपेक्षाही हे जास्त गरजेचे आहे.
 
जगातला सर्वात तरुण देश ही खासियत या दशकात देशाला लाभते आहे. म्हटले तर ही प्रचंड संधी आणि मोठे आव्हानही आहे. सळसळत्या तरुणाईच्या बळावर देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची ती संधी आणि याच कोट्यवधी तरुण हातांना काम देण्याचे आव्हान. नोटाबंदी आणि कर सुधारणेच्या निर्णयांमुळे आर्थिक प्रगती अडखळली आहे. नव्या उद्योगांची उभारणी ठप्प तर असलेल्या उद्योगांमधून कामगार कपात सुरू आहे. अतिभाराने आधीच गलितगात्र झालेले शेती क्षेत्र आणखी मनुष्यबळाचा बोजा सहन न करण्याच्या अवस्थेत आहे. सेवा आणि बांधकाम क्षेत्र मंदावले आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून बेरोजगारांचे तांडे वाढत आहेत. या तांड्यांमधली अस्वस्थता घातक आहे. अशा वेळी अर्थकारणाला गती देण्याखेरीज दुसरे कोणतेही राजकीय प्राधान्य असू शकत नाही. प्रत्यक्षात मात्र संस्कृती, देव, धर्म हे विषय महत्त्वाचे ठरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होताना दिसतो.

दोन वर्षांत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा धोका अधिक गडद होतो आहे. दुर्दैवाने सर्वच राजकीय पक्ष या मुद्द्यावर संधिसाधू आहेत. अशा वेळी स्वातंत्र्याच्या नव्या वर्षातला नवा श्वास भरून घेताना या देशातल्या ‘आम आदमी’ची जबाबदारी वाढते. जात, धर्म, भाषा, प्रांत, इतिहास, अस्मिता आदींवरचे भेद जोपासण्यापेक्षा अर्थ, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योगाच्या प्रगतीसाठी एकत्र येणे ही खरी देशभक्ती आहे. ‘देशाने मला काय दिले, यापेक्षा तुम्ही देशाला काय देणार,’ या सुभाषचंद्र बोसांनी विचारलेल्या प्रश्नाचे आपापल्या परीने उत्तर शोधणे हेच खरे राष्ट्रकार्य आहे. स्वराज्याचे ‘सुराज्य’ व्हायचे तर याला पर्याय नाही.
बातम्या आणखी आहेत...