आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्जना आणि वास्तव (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एरवीही ‘भाषणोत्सुक’ नेते आहेत. ‘मन की बात’ असो, निवडणूक प्रचार असो, न्यूयॉर्कमधली गर्दी असो की गुजरातेतल्या खेडेगावातली सभा. नमोदींना बोलायला आवडते. आक्रमक शैलीच्या बळावर मोदींनी स्वत:चा असा खास श्रोतृवर्गही अलीकडच्या दशकभरात मिळवला आहे. मोदींना ऐकणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याचे मान्य करून काही आक्षेप नोंदवले पाहिजेत. गर्दीपुढे मोदी बेभान होत असल्याचा प्रत्यय गेल्या दोन स्वातंत्र्यदिनी आला. स्वातंत्र्यदिनाच्या सुप्रभाती देशवासीयांच्या संयमाची परीक्षाच मोदींनी पाहिली.

१९४७ च्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाला पंडित नेहरू ७२ मिनिटे बोलले होते. दोन वर्षांपूर्वी ८६ मिनिटे बोलून मोदींनी नेहरूंना मागे टाकले. हेही कमी की काय म्हणून गेल्या वर्षी ९६ मिनिटे भाषण करून मोदींनी स्वत:वरही कुरघोडी केली. यंदा मोदी मिनिटांची शंभरी ओलांडणार की काय, या शंकेने उभ्या देशाचा जीव टांगणीला लागला होता. मात्र बहुधा ‘अच्छे दिन’पैकी एक उगवला आणि मोदी महोदयांनी ५६ मिनिटांत उरकते घेतले. वेळ पाळण्याच्या बाबतीत तरी किमान मोदींनी ‘सवासो करोड देसवासीयां’ची मने यंदाच्या १५ ऑगस्टला जिंकली, असे म्हणता येईल. बाकी देशाचे नेतृत्व करणाऱ्याने स्वातंत्र्यदिनी बोलण्यातून आत्मविश्वासाचा उंच हिमालय उभारावा, प्रगतीचे द्रुतगती महामार्ग चौफेर अंथरावे, सुरक्षेचे कोट बांधावे, शत्रू देशांना उद्देशून दमबाजीचे डोस द्यावे, बहारदार भविष्याच्या बागा फुलवाव्या, आशेची कारंजी उडवावी वगैरे निकष असतात. मोदींनी नेहमीच्या लालित्याने ते सहज पूर्ण केले.
 
स्वप्ने पूर्ण करण्याआधी ती पाहावी लागतात. इतरांनाही ती दाखवावी लागतात. मोदींना हे चांगले जमते. अडचण एकच आहे. सन २०१४ च्या रणधुमाळीत राष्ट्रीय पातळीवर मोदींची पाटी कोरी होती. त्यामुळे त्यांच्या ‘अच्छे दिन’ला लोकांनी प्रतिसाद दिला. हे ‘अच्छे दिन’ दिसण्यासाठी तीन वर्षे पुरेशी नसल्याचे व्यवहारी भानसुद्धा सुज्ञ नागरिकांकडे आहे. मात्र ‘अच्छे दिन’च्या दिशेने जाण्यासाठी किमान काय पावले उचलली जात आहेत, याचे वास्तववादी दर्शन मोदींकडून नक्कीच अपेक्षित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकलेल्या नाहीत. तेव्हा ‘स्वामिनाथन’ अंमलबजावणीच्या आश्वासनाचे काय, याची स्पष्टता मोदींनी लाल किल्ल्यावरून करायलाच हवी होती. ‘स्वामिनाथन’ अहवाल निरर्थक असल्याची उपरती मोदींना सत्तेवर आल्यानंतर झाली असण्याची शक्यता आहे. तसे असेल तर त्याचीही कबुली जनतेला विश्वासात घेऊन द्यायला हवी होती. नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतानाच्या अटकळी चुकल्या का? बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा मोजण्यात रिझर्व्ह बँक कुचराई का करते? या प्रश्नांची उत्तरे मोदींनी टाळली. उलट नोटाबंदीमुळे करदात्यांची संख्या वाढल्याचे सांगून ‘ईमानदारी का उत्सव’ देशात सुरू झाल्याचे नवेच संशोधन त्यांनी मांडले. त्यामुळे मोदी दिशाभूल करत असल्याची शंका आली.
 
सन २०१९ मधली पंतप्रधानपदाची दुसरी खेप मोदींना आता खुणावू लागली आहे, हे निश्चित. म्हणूनच गेल्या तीन वर्षांतले यश, लक्ष्यपूर्तीच्या दिशेने होणारी सरकारची वाटचाल याबद्दलची आश्वासक शिदोरी देण्याएेवजी नव्या घोषणांचे चणे-फुटाणे उधळण्यातच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य वाया गेले. ‘अच्छे दिन’ उगवण्याआधीच मोदींनी ‘न्यू इंडिया-नवा भारत’ हा उद््घोष सुरू केला. सन २०२२ मध्ये देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करेल. तोपर्यंत जातीयवाद, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि पक्षपातापासून मुक्त ‘नवा भारत’ घडवण्याची इच्छा मोदींनी प्रदर्शित केली. ‘मेक इन इंडिया’, काळ्या पैशापासून मुक्ती, प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये, दोन कोटी रोजगार आदींची वाट पाहण्यात तीन वर्षे उडून गेलेल्या भारतीयांच्या डोक्यावर आलेले नव्या भारताचे हे नवे ओझे. जनतेसमोर पुन्हा एकदा मते मागण्यासाठी मोदींकडे वास्तविक जेमतेम दोन वर्षे उरली आहेत. नवी स्वप्ने, नव्या घोषणा, नव्या संकल्पना उदंड झाल्या. मोदींवरचा लोकांचा विश्वास अजून कायम आहे. उर्वरित कार्यकाळात करून दाखवण्यावर देता येईल तेवढा भर मोदींनी द्यायला हवा. सरकारची कृती आधी बोलली पाहिजे, मग मोदींनी त्यांच्या वक्तृत्वकलेचा आनंद यथेच्छ लुटावा. अन्यथा ‘गर्जेल तो पडेल काय’ अशी मोदींची प्रतिमा होऊन बसेल.‘शायनिंग इंडिया’चा चमचमाट न पटल्याने अटलबिहारी वाजपेयींना नाकारल्याचा इतिहास मोदींनी विसरू नये. चिंता मोदींच्या प्रतिमेची नाही. मोदींच्याच भाषेत ‘सवासो करोड प्यारे देसवासीयां’ची आहे. कारण अस्मानी आणि अर्थसंकटाची चाहूल लागली आहे. सरकारनिर्मित संकटांची धग आणि त्यामागील कारणे जनता लक्षात तर ठेवणारच.
बातम्या आणखी आहेत...