आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपयशी सज्जन (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे वर्णन अपयशी सज्जन असे करता येईल. राजकारणाच्या दलदलीत राहूनही स्वच्छ राहणाऱ्या व्यक्ती विरळा. हिशेब तपासणीतील त्यांची तज्ज्ञता ही लाखात एक आहे. शिवसेनेत असूनही त्यांनी सभ्यता कधी सोडली नाही वा ‘मातोश्री’कडून पाठ थोपटून घेण्यासाठी अाततायी वर्तन केले नाही. बॅलन्सशीटइतकाच समतोल प्रभूंचा स्वभाव आहे. ते मितभाषी आहेत. जाहिरातबाजीचा त्यांना वीट आहे. सर्व पक्षांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. इतके की, यांच्यासारखा माणूस माझ्या पक्षात का नाही, असा प्रश्न सोनिया गांधींनाही पडला होता. अभ्यासाला सभ्यतेची जोड हा दुर्लभ गुण सुरेश प्रभू यांच्याकडे आहे. पण केवळ या गुणावर कर्तृत्व दाखवता येत नाही.

सभ्यता, अभ्यास, मितभाषीपणा हे सज्जनांचे गुण असले तरी परिस्थितीला वळण द्यायचे असेल तर धैर्य, स्पष्टवक्तेपणा, करारी स्वभाव आवश्यक असतो. प्रभू या गुणांत कमी पडतात आणि त्यामुळेच प्रामाणिकपणे काम करूनही ते अपयशी ठरतात. वाजपेयी सरकारच्या काळात ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी केलेल्या कामाची वाहवा होत असतानाच त्यांना अचानक जावे लागले. कारण वीज क्षेत्राची त्यांनी जितकी काळजी घेतली तितकी शिवसेनेची घेतली नाही. केंद्रात आमचा मंत्री असून उपयोग काय, असा सवाल सेना नेत्यांनी करताच बाळासाहेबांनी सुरेश प्रभूंना परत बोलावले. त्या वेळी ठाकरेंनी प्रभूंची पाठराखण केली असती तर देशाचे भले झाले असते. पण ठाकरेंचे अग्रक्रम वेगळे आणि ठाकरेंना आव्हान देण्याचे धाडस वाजपेयींमध्ये नव्हते. आता परिस्थिती बदलली आहे. प्रभू यांचे गुण लक्षात घेऊन मोदींनी त्यांना शिवसेनेच्या जोखडातून प्रथम मोकळे केले. भाजपच्या तिकिटावर तेही हरियाणातून राज्यसभेवर घेऊन मोकळेपणे काम करण्यासाठी आवश्यक ते राजकीय स्थैर्य प्रभूंना मिळेल याची तजवीज मोदींनी केली.

रेल्वेच्या कारभारातही मोदींनी हस्तक्षेप केल्याचे ऐकिवात नाही. उलट रेल्वेमध्ये प्रभू करत असलेल्या बदलांचा मोदींच्या भाषणात अनेकदा गौरवाने उल्लेख झाला. प्रभू प्रामाणिकपणे काम करत आहेत याची मोदींना जाण असल्यानेच त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. रेल्वे पुन्हा रुळावर आणण्यासाठी, रेल्वेला आधुनिक करण्यासाठी प्रभू प्रयत्न करत होते, हे टीकाकारही नाकारत नाही. परंतु, रेल्वेचा कारभार हा फक्त आकड्यांवर चालत नाही. मालवाहतूक रेल्वेला अधिक पैसा पुरवत असली तरी प्रवासी वाहतूक ही रेल्वेची ओळख आहे. ही प्रवासी वाहतूक जेव्हा  अपघातांच्या चक्रात अडकली तेव्हा त्याचा जाब रेल्वेमंत्र्यांना विचारला जाणे साहजिक होते. प्रभूंसारखी व्यक्ती पदावर होती, म्हणून हा जाब संयमाने विचारला गेला. पण हा संयम कायम राहणार नाही, हे प्रभू यांनी ओळखले व वेळीच राजीनामा सादर केला. त्यांनी केले ते योग्यच आहे.
 
कनिष्ठ पातळीवरील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुकांबद्दल सर्वोच्च पातळीवरील अधिकाऱ्याला वा मंत्र्याला जबाबदार धरणे चुकीचे आहे, हा युक्तिवाद बरोबर असला तरी व्यक्तिगत प्रतिमा व जीवित हानीचा प्रश्न येतो तेव्हा हा युक्तिवाद फोल ठरतो. म्हणून स्वभावाबद्दल प्रशंसा करताना प्रभूंचे अपयशही सांगितले पाहिजे. काँग्रेस सरकारच्या काळात रेल्वे पूर्णपणे डबघाईला आली होती. एअर इंडियासारखीच रेल्वेची स्थिती झाली होती. सुरक्षित प्रवासासाठी अफाट पैसा लागणार होता व तितका पैसा रेल्वेकडे नव्हता. कर्मचाऱ्यांचा पगार हा मोठा भार झाला होता. रेल्वेसाठी अब्जावधी रुपये हवे होते व कर्मचाऱ्यांमध्ये कार्यक्षमता आणणे हे त्याहून कठीण होते. ही वस्तुस्थिती स्पष्टपणे लोकांसमोर मांडून प्रभूंनी काम सुरू करायला हवे होते. त्याचबरोबर अफाट आश्वासने देण्याची गरज नव्हती. साठ टक्के रेल्वे रूळ बदलणे आवश्यक आहे, हे माहीत असताना अपघात होऊच देणार नाही, ही घोषणा कधीही आपल्यावर उलटेल हे प्रभूंना कळायला हवे होते. निर्माण केलेल्या अपेक्षा व कारभारातील वास्तव यांच्यातील दरी रुंदावत गेली. अपघातातील मृतांच्या संख्येमुळे ही दरी स्पष्टपणे जनतेला दिसू लागल्याने नाराजी वाढली. रेल्वेतील अडचणी जनतेला माहीत असत्या व आश्वासनांबाबतही प्रभू मितभाषी राहिले असते तर इतके अपयशी ठरले नसते. अपघात वाढण्यामागची खरी कारणे लोकांना कळली असती. रेल्वेची आर्थिक व अभियांत्रिकी स्थिती इतकी वाईट असताना झकपक योजनांवर भर देण्याऐवजी सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देणे आवश्यक होते. बुलेट ट्रेनपेक्षा लोकांचे जीव अधिक महत्त्वाचे होते. रेल्वेची वाईट परिस्थिती स्पष्टपणे मांडून धोरणात अग्रक्रम ठरवण्याचा कणखरपणा प्रभूंमध्ये नसल्याने सज्जन असूनही ते अपयशी ठरले. प्रभूंचे अपयश हा एक प्रकारे मोदींनाही इशारा आहे. कारण पक्क्या रुळांच्या अभावी मोदींच्या आश्वासनांची रेल्वेही घसरण्याचा धोका आहे.
बातम्या आणखी आहेत...