आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोटारींची दिशागती ओळखा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ या वर्षी १८ वय पूर्ण केलेले लाखो युवक भारतीय लोकशाहीत एक मतदार म्हणून नोंदले जातील व त्यांच्या हातात भारताला प्रगतिपथावर नेण्याचे काम असेल, असे म्हटले. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी युवकांना साद घातल्याने भाजप बहुमत मिळवू शकले. आता नवा मतदार त्यांनी डोळ्यापुढे ठेवून त्याला साद घातली आहे. मोदींनी आपल्या भाषणात समाजात विज्ञानाचा दबदबा हवा असेही म्हटले. पण हे करण्यासाठी आपली विज्ञान-तंत्रज्ञानात किती गुंतवणूक करण्याची तयारी आहे, हा प्रश्न आहे. तंत्रज्ञान हे रोजगारनिर्मितीचे साधन आहे, हे लक्षात घेऊन त्याच्या अध्ययनाच्या शिक्षण संस्था निर्माण करायला हव्यात. आपल्याकडे युरोप-अमेरिकेप्रमाणे औद्योगिकीकरणाची प्रक्रिया घडली नाही. आपण थेट कृषी अर्थव्यवस्थेवरून तंत्रज्ञानाचा जबरदस्त प्रभाव असलेल्या सेवा क्षेत्राकडे उडी मारली. या उडीत कारखानदारी दुर्लक्षिली गेली. परिणामी तंत्रज्ञानावर आधारलेल्या सेवा क्षेत्राच्या बळावर पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. तंत्रज्ञान शिकण्यात भारतीय इंजिनिअर कमी नाहीत तसेच ते अंगीकारण्यात भारतीय जनताही.

तंत्रज्ञानाच्या चोरीला जुगाड हा शब्द आपल्याकडे वापरला जातो तो या वृत्तीमुळे. सध्या जगाचे वारे इलेक्ट्रिक कार, इंटरनेटचा प्रसार, रोबो तंत्रज्ञान, सौरऊर्जेच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासाचा रोडमॅप या वाऱ्यांना आपल्या कवेत घेणाराच हवा. भारतामध्ये ऑटोमोबाइल उद्योग हा वेगाने विस्तारत आहे. विविध परदेशी कार कंपन्यांनी भारतात आपले कारखाने उभारले आहेत. वाहनांची वाढती संख्या, रस्त्यांचे जाळे यांचा विकास प्रक्रियेशी संबंध असतो. (अमेरिका प्रगत झाली ती मोटारींमुळे व रस्त्यांच्या जाळ्यामुळे) काही दिवसांपूर्वी केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यापासून केंद्रीय मंत्री व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी पेट्रोल-डिझेलच्या कारऐवजी इलेक्ट्रिक कारमधून ऑफिसला येतील, अशी घोषणा केली.

सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे आहे. कारण आता मोटारींमधील इंटर्नल कम्बशन इंजिनाचेही दिवस भरत आले आहेत. टेस्ला, गुगल, ह्युंदाई, टोयाटो, जनरल मोटर्स, निस्सान या कंपन्यांनी विजेवर धावणाऱ्या कारचे उत्पादन करण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक कंपनी येत्या चार-पाच वर्षांत आपापल्या विजेवर धावणाऱ्या कार रस्त्यावर आणणार आहेत. एका अर्थाने हे परिवर्तन आपल्या विकास प्रक्रियेला, जीवनशैलीला आमूलाग्र बदलवणारे आहे. कारण जसा इलेक्ट्रिक कार, बसचा वापर वाढत जाईल तसे पेट्रोल-डिझेलवरचे अवलंबित्व कमी होत जाईल. सार्वजनिक परिवहन सेवेवर त्याचा परिणाम होऊन ती पर्यावरणस्नेही व सक्षम होईल. भारताची अर्थव्यवस्था जी पेट्रोल दरातील चढउतारावर हेलकावे खात असते तिला इलेक्ट्रिक कारमुळे दिलासा मिळेल. सरकारची अब्जावधी रुपयांची सबसिडी वाचेल व ही सबसिडी अन्य विकासकामांकडे वळवता येईल.
 
इंटरनेटच्या प्रसारानंतर आता दळणवळण व वाहतूक व्यवस्थेतील विस्तार जगाला पुन्हा वेग देत आहे. कारण अनेक मोटार कंपन्यांनी २०२२ हे वर्ष डोळ्यापुढे ठेवून इलेक्ट्रिक कार रस्त्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेत फोर्ड कंपनीने २०२१ पर्यंत पॅडल व स्टिअरिंगविरहित कार रस्त्यावर आणण्याची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियातील खाण कंपनी रियो टिंटोने खाणीत काम करण्यासाठी ड्रायव्हरविरहित लॉरी चालवण्यास सुरुवात केली आहे. स्वीडनमध्ये व्होल्व्हो कंपनी सेल्फ ड्रायव्हिंग ट्रकची चाचणी घेणार आहे. मर्सिडीझ बेंझ, इवेको व अन्य लॉरी उत्पादक कंपन्या स्वयंचलित वाहने रस्त्यावर उतरवण्याच्या तयारीत आहेत. हे दिसणारे सगळे परिवर्तन ऊर्जानिर्मितीच्या तंत्रज्ञानातील दोन महत्त्वाच्या बाबींमुळे घडून येत आहे.

एक म्हणजे सौर, पवनऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेकडे श्रीमंत देश आपला मोर्चा वळवत आहेत. त्यामुळे पारंपरिक वीज उद्योगातील गुंतवणूक कमी होऊन या देशांची आखातातील तेलाची मागणी कमी झाली. त्यांच्याकडे तेलाची जागा लिथियम बॅटऱ्या घेत आहेत व औष्णिक, अणुऊर्जेची जागा सौर-पवनऊर्जा घेत आहे. या ऊर्जांना मोठ्या प्रमाणात सबसिड्या दिल्या जात आहेत. अमेरिका व ऑस्ट्रेलियात २४ तास नि:शुल्क वीज देण्याइतपत सौरऊर्जेचा वापर वाढला आहे. दुसरा बदल म्हणजे मोटारींमधील इंधन व पिस्टनची जागा बॅटरी व इलेक्ट्रिक मोटार घेत आहे. या बदलामुळे स्वत:ची कार विकत घेण्यापेक्षा कमीत कमी भाड्यामध्ये टॅक्सीसेवा ग्राहकांनी घ्यावी असे मार्केट आकार घेऊ लागले आहे. हा बदल राज्यकर्त्यांनी ओळखला पाहिजे. ऑटोमेशन व इलेक्ट्रिक कारचा वापर ही काही दूरची बाब नाही, ती आपल्यापुढे आली आहे. आपणाला तिचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण भविष्यात रोजगारनिर्मिती ही वाहतूक व्यवस्थेतील बदलातून होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...