आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनचा माग महत्त्वाचा (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय हवामान खात्याच्या पावसाळी अंदाजाने या देशात अनेक विनोदवीर, व्यंगचित्रकार, भाष्यकार आणि अलीकडच्या काळात ‘सोशल माध्यमवीरां’च्या कल्पनाशक्तीला खतपाणी घातले आहे. किंबहुना या मंडळींच्या कल्पनांना भराऱ्या मारता याव्यात याचसाठी दरवर्षी हवामान खाते पावसाचा अंदाज व्यक्त करण्याचा खटाटोप करत असावे. हवामान खात्याचे अंदाज चुकण्यासाठीच असतात, अशी या मंडळींची ठाम धारणा आहे. या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आम्हास काहीच म्हणायचे नाही. मात्र या अट्टहासातून हवामानशास्त्र या अत्यंत गंभीर विषयाकडे पाहण्याच्या सामाजिक दृष्टीचे मातेरे होऊन जाते, ही खंत मांडली पाहिजे. भारतासारख्या खंडप्राय देशातील हवामान भाकिताची तुलना इंग्लंड-युरोपातल्या अंदाजांशी करणे हीच मुळात अतर्क्य बाब झाली.

भारत वर्षभर ज्याची चातकासारखी वाट पाहतो तो मान्सून पाऊस उन्हाळ्यानंतरच्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांसोबत येतो. भारताची दशा-दिशा ठरवण्याचे काम हा मान्सून कित्येक शतकांपासून करतो आहे. मान्सूनचे पूर्वानुमान वर्तवण्याचे काम कधीच सोपे नव्हते. हवामान उपग्रह, अद्ययावत यंत्रसामग्री हाताशी आल्यानंतरही हे काम सोपे झालेले नाही. कारण उष्ण कटिबंधातला भारत तिन्ही बाजूंनी समुद्र आणि डोक्यावर बर्फगार हिमालय घेऊन बसलेला. शिवाय मान्सून ही एक जागतिक घटना. पॅसिफिक महासागरातील सागरी प्रवाहांपासून ते अटलांटिक महासागरातल्या वाऱ्यांपर्यंत आणि अरबी समुद्रातल्या सागरी प्रवाहांच्या तापमानापासून ते बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या क्षेत्रांपर्यंत शेकडो घटनांचा परिणाम मान्सूनवर होतो. या घटनांचा कालावधी काही दिवस किंवा महिन्या-दोन महिन्यांचा नव्हे. जागतिक स्तरावर निरंतर सुरू असलेल्या हवामान बदल प्रक्रियेचा एक भाग म्हणजे मान्सून आहे.

या मान्सूनचा मागोवा काढण्याच्या वाटा वर्षानुवर्षांच्या अभ्यासाने समोर आल्या असल्या तरी त्या धूसर आहेत. त्यावर पूर्णतः विसंबून राहण्याची स्थिती नाही. पण लोकांची अपेक्षा अशी की, माझ्या गावात कधी आणि किती पाऊस पडणार, हे हवामान खात्याने सांगावे. भारताचे आकारमान, हवामान खात्याकडचे माहिती स्रोत आणि मान्सून प्रक्रियेचे जगड्व्याळ स्वरूप पाहता ही अपेक्षा अवास्तव आहे. हे शास्त्रीय सत्य लक्षात न घेता खापर फोडण्यासाठी हवामान खात्याचा वापर नित्यनेमाने सुरू आहे. काही शेतकरी संघटनांनी तर हवामान खात्यावर बंदीचीच मागणी केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार केलेला पेरा वाया गेल्याने या खात्याकडे नुकसान भरपाई मागण्यापर्यंत काही ‘विद्वानां’नी मजल मारल्याचे यंदा दिसले. ‘आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी’ असा हा प्रकार झाला. मुळात हवामान खाते पाऊस पाडत नाही. कोणतेही दोन मान्सून कधीही एकसारखे नसतात. तरीही या लहरी, बेभरवशाच्या मान्सूनचा वेध घेण्याचे काम हवामान खाते १८७५ पासून करते आहे. या दीर्घ इतिहासात हवामान खात्याच्या अंदाजात गंभीर चूक झाल्याचे उदाहरण नाही.

 
या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्याच्या शेवटी राज्यात दणकून पाऊस झाला. पावसाच्या पुनरागमनाचे भाकीत हवामान विभागाने आधीच वर्तवले होते. यावरून ‘ढगात गोळी लागली बुवा,’ अशा भावना बहुतांशाने व्यक्त झाल्या. या भावना हवामान खात्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची अवहेलना करणाऱ्या आहेत. हवामान खात्याला दोष देऊन कदाचित क्षणभराची करमणूक होईल; परंतु यामुळे सत्यापासून आपण लांब राहू. मान्सून पावसातला खंड कालावधी वाढतो आहे, पाऊस पडण्याचे दिवस कमी होत आहेत. कमी दिवसांत अधिक पाऊस पडतो आहे. देशपातळीवरील वार्षिक सरासरी मान्सून गाठतो, पण पावसाचे वितरण कमालीचे असमान आहे. ही सगळी तथ्ये शेतीसाठी मारक ठरत आहेत. शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी पावसातील अनियमितता प्रामुख्याने आहे.

म्हणूनच उपाययोजनांचा विचार करताना हवामान खात्याचीच मदत धोरणकर्त्यांना घ्यावी लागणार आहे. जास्तीत जास्त अचूक अंदाजांसाठी तालुका, गावपातळीवर हवामान खात्याच्या कुशल मनुष्यबळाची आणि यंत्रसामग्रीची उपलब्धता अनिवार्य आहे. हवामान खात्याचे बजेट वाढवण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. यातले काही न होता दर पावसाळ्याच्या आगेमागे टिंगलीचा विषय एवढ्यापुरतेच हवामान खाते मर्यादित झाले आहे. यंदाही असेच घडते आहे. दोन दिवसांच्या दमदार पावसाने खरीप वाचवला. राज्याची वर्षाची तहान भागवली. रब्बीच्या आशा पालवल्या. पावसाळ्याचा आणखी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तेवढ्यात दोन-तीन पाऊस झाले की हवामान खाते सामाजिक चर्चेतून बाद होऊन जाईल. ही अनास्था भारताला परवडणारी नाही.
बातम्या आणखी आहेत...