आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुस्त नोकरशाहीचे बळी ( अग्रलेख )

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एल्फिन्स्टन हे मुंबईतले पश्चिम रेल्वेवरचे एक स्थानक, दादरच्या खालोखाल महत्त्वाचे कारण ते मध्य रेल्वेला, परळ स्थानकाशी, जोडलेले आहे. गेल्या वीस वर्षांत या स्थानकाच्या पश्चिमेकडचा भाग प्रचंड विकसित झाला. अनेक चकाचक इमारती येथे उभ्या राहिल्या, ज्यांमध्ये दक्षिण मुंबईतल्या अनेक खासगी, सरकारी कार्यालयांचे स्थलांतर झाले. पूर्वेकडे टाटा, केईएम, वाडिया ही अवाढव्य रुग्णालये पूर्वीपासूनच आहेत. खेरीज शेकडो कार्यालयेही आहेत. साहजिकच या दोन्ही रेल्वे स्थानकांचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत खूप मोठी वाढ झाली. परंतु, या स्थानकांवरील पायाभूत सुविधा मात्र पूर्वीच्याच राहिल्या. 

नकातून बाहेर पडण्यासाठी चढावे लागणारे जिने आजही शंभर वर्षांपूर्वी होते तेवढ्याच रुंदीचे आहेत. चार वर्षांपूर्वी या स्थानकाचा टर्मिनस म्हणून विकास करण्याचे मध्य रेल्वेने ठरवलेही, परंतु ते तसेच बासनात राहिले. या स्थानकांवरील वाढत्या गर्दीविषयीच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी गेल्या दोन-तीन वर्षांत रेल्वे प्रशासनाकडे केल्या, छायाचित्रे जोडली, ट्वीट केले, पंतप्रधान कार्यालयापर्यंत दाद मागितली. प्रवासी संघटनांनीही याविरुद्ध आवाज उठवला. परंतु या कशाचीच दखल रेल्वे खात्याने घेतली नाही. त्याचीच परिणती म्हणजे शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरीत झालेले २२ मृत्यू. सकाळी अचानक पाऊस आल्याने लोकलमधून उतरलेले अनेक प्रवासी पुलाच्या छताखाली उभे होते, आधीच अरुंद असलेल्या पुलावर व जिन्यावर त्यामुळे गर्दी झाली. पाऊस सुरूच राहिल्याने ही गर्दी हटण्याची चिन्हे नव्हती. दहाएक मिनिटांत परळ आणि एल्फिन्स्टन मिळून किमान पाच ते सहा लोकल माणसे ओतत राहिल्या आणि ब्रिजवर शेकडोंची गर्दी झाली. ना स्थानकात येऊ पाहणारे प्रवासी आत येऊ शकले, ना बाहेर पडणारे बाहेर जाऊ शकले. त्यात पूल तुटल्याची वा शाॅर्टसर्किट झाल्याची अफवा पसरल्याने एकच कोलाहल माजला व जीव वाचवण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी होऊन अनेकांचे बळी गेले. चेंगराचेंगरी हा अपघात असला तरी तो इतर अपघातांपेक्षा निराळा आहे. एखाद्या ठिकाणी सतत गर्दी असते, तर त्या गर्दीची व्यवस्था लावणे, येण्या-जाण्याचे मार्ग मोकळे ठेवणे, माणसे हलती राहतील अशी सोय करणे शक्य असते. मुंबईच्या असह्य उकाड्यात अरुंद पुलांवरून चालतानाही श्वास कोंडत असतो. परळमधील गर्दी रोजचीच होती, ती अचानक झालेली नव्हती. मग या गर्दीचे व्यवस्थापन करायचा, त्यावर काही मार्ग काढण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने का घेतला नाही, हा प्रश्न वाजवीच आहे. 
 
उपनगरीय स्थानकांचा विकास म्हणजे फुटब्रिज बांधणे हा सध्या रेल्वेचा धडाडीचा उपक्रम आहे. पण गर्दीच्या हिशेबाने ब्रिज कुठल्या स्थानकात बांधावेत याचा सारासार विचार रेल्वेच्या गावी नाही. आज मुंबईतील अनेक छोटी स्थानकेही गर्दीने ओथंबून वाहत असतात. पण अशा स्थानकांमधील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाबाबत रेल्वेकडे उत्तर नाही. मुंबईकर हा गर्दीला सरावलेला आहे. तो रेल्वेची अकार्यक्षमता दुर्लक्षितो. मुंबईवर आजपर्यंत अनेक संकटे आली; पण चेंगराचेंगरीसारख्या घटना या शहरात घडल्या नाहीत. रेल्वे प्रशासनाकडून मुंबईकरांच्या फार अपेक्षा उरलेल्या नाहीत. त्यांना  रेल्वेकडून गाड्यांच्या उद््घोषणा, इंडिकेटर व्यवस्थित चालणे, पंखे सुरू असणे यासारख्या माफक कृती हव्या आहेत. बुलेट ट्रेनला कोणाचा विरोध नाही; पण मूलभूत सेवा प्रवाशांना देऊन ही स्वप्ने साकार व्हावीत असे त्यांचे म्हणणे आहे. कुलाब्यात राहून वातानुकूलित मोटारीने कार्यालयात पोचणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेस्थानकावर येऊन समस्या पाहाव्यात ही त्यांची अपेक्षा आहे. कोणती कामे करायची, पूल बांधायचे, नवीन लोकल सोडायच्या याबाबत हे अधिकारी रेल्वे मॅन्युअलचे दाखले देऊन कामे होऊ देत नाहीत. जणू रेल्वे मॅन्युअलमध्ये लिहिलेय तसे आणि तसेच काम करणे त्यांना योग्य वाटते. इनोव्हेशन वा थोड्या वेगळ्या धर्तीचा विचार हा नोकरशाहीला वर्ज्य आहे. “ज्याचं जळतं त्याला कळतं,’ पण ज्याचे जळत नाही, त्याला दाखवून दिल्यानंतरही या ज्वाळांचे अस्तित्वही जाणवत नाही, हे निव्वळ उद्दामपणाचे  व निगरगट्टपणाचे लक्षण आहे. पाऊस होता म्हणून चेंगराचेंगरी झाली, असे स्पष्टीकरण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिले आहे. त्यातूनही जबाबदारी झटकण्याचीच वृत्ती दिसून येते. रेल्वे हे एक भलेमोठे संस्थान झाले आहे. या संस्थानात एक प्रकारचा बेजबाबदारपणा, प्रवाशांच्या प्रश्नांप्रति अनास्था आहे. लोकांची गर्दी वाढतेय व त्याला आवरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अपुरी आहे हा दावा सयुक्तिक नाही. परळमधले बळी या नोकरशाहीनेच घेतलेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...