आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुकाचा अट्टहास ठरो नये (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षातच इस्रायलसोबतचा संरक्षणविषयक करार भारताने मोडीत काढावा हा एक योगायोगच. पॅलेस्टिनी नेते यासर अराफत हे इंदिरा गांधी यांना भगिनी मानत. त्यांच्या पॅलेस्टिनी मुक्तिलढ्याला गांधींचा पाठिंबा होता. इस्रायलबद्दल गांधींच्या मनात फारसे ममत्व नव्हते म्हणून तर त्या असेपर्यंत इस्रायलचा अधिकृत दूतावासदेखील भारतात उघडला गेला नव्हता. गांधी यांच्या पश्चात भारत-इस्रायल यांच्यातील मैत्रीपर्व खऱ्या अर्थाने बहरले. महाराष्ट्रातल्या जेमतेम दोन-तीन जिल्ह्यांइतक्या आकारमानाच्या आणि मुंबईपेक्षा कमी लोकसंख्येच्या इस्रायलसाठी भारत ही प्रचंड अवाढव्य बाजारपेठ आहे. त्यामुळे इस्रायली तंत्रज्ञान आणि कंपन्यांसाठी भारत आकर्षणाचा केंद्रबिंदू न ठरता तरच नवल होते. या पार्श्वभूमीवर अलीकडच्या अडीच दशकांत कृषी, वैद्यकीय, हिरे कारागिरी आणि प्रामुख्याने संरक्षण क्षेत्रात भारत आणि इस्रायल यांच्यातील व्यापारउदीम चांगलाच वाढतो आहे. सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात इस्रायल जगात आघाडीवरचा देश आहे. संरक्षणसिद्धता, यांत्रिक-तांत्रिक टेहळणी, मानवविरहित संरक्षण साधने आदींच्या बाबतीत इस्रायलने मोठी प्रगती साधली आहे. या क्षेत्रात इस्रायलकडून भारताला घेण्यासारख्या अनेक बाबी आहेत. कमांडो प्रशिक्षण आणि हवाई दलाचा सराव यासाठी तर भारतीय सैनिक आणि हवाई दलातील सैनिक सातत्याने इस्रायलच्या वाऱ्या करत असल्याचे अलीकडे पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चीन ज्याप्रमाणे संधी मिळेल तेव्हा भारतविरोधी भूमिका घेतो त्याच्या नेमकी उलटी भूमिका इस्रायलची राहिली आहे. संधी मिळेल तेव्हा इस्रायलने भारताची पाठराखण केलेली आहे. एकुणातच आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्रायल हा भारताचा महत्त्वाचा मित्र बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीत हे संबंध आणखी टिपेला पोहोचले आहेत. इस्रायलला भेट देणारे ते भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच त्यांनी इस्रायलशी मैत्री जोपासली आहे. जगातल्या प्रत्येक मुस्लिम राष्ट्राशी हाडवैर असलेल्या इस्रायलला भारताची मैत्री सर्वार्थाने हवी आहे. दुसरीकडे भारताला मात्र इराण, सौदी, इजिप्त या महत्त्वाच्या देशांना न दुखावता इस्रायलबरोबरचे संबंध निभावायचे आहेत. रणगाडाविरोधी इस्रायली स्पाइक क्षेपणास्त्रांचा तब्बल पाचशे दशलक्ष डॉलर्सचा करार पुढे न नेण्याचा भारताचा निर्णय या पार्श्वभूमीवर पाहावा लागतो.  


भारताची अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेचा आकार लक्षात घेता भारताच्या या एका कृतीमुळे इस्रायल नाराज होईल याची सुतराम चिन्हे नाहीत. संरक्षणासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये इस्रायली कंपन्यांना भारतात अमाप संधी मिळत राहणार आहेत. किंबहुना सध्यादेखील इस्रायलमधली प्रत्येक कृषी कंपनी भारतात व्यवसाय करते आहे. संरक्षण क्षेत्रातले सहकार्य, आदानप्रदान चालूच आहे. सायबर संरक्षणात इस्रायली कंपन्या भारताला तंत्रज्ञान पुरवत आहेत. त्यामुळे पाचशे दशलक्ष डॉलर्सचा एक करार मोडल्याने इस्रायलबरोबरच्या संबंधांमध्ये बाधा येण्याचे कारण नाही. मात्र ज्यासाठी हा करार पाळण्याचे भारताने टाळले आहे ते कारण फार महत्त्वाचे आहे. स्वयंसिद्धता, स्वावलंबन या मुद्द्यांवर इस्रायली तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवण्याचा धाडसी निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. याचे कौतुक करायला हवे. ‘मिसाइल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारताच्या संरक्षण संशोधन क्षमतांवर नेहमीच विश्वास व्यक्त केला. मंगळावर यान पाठवणारे, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे तयार करणारे भारतीय शास्त्रज्ञ रणगाडाविरोधी तंत्रज्ञान विकसित करू शकणार नाहीत असे मानण्याचे काहीएक कारण नाही. याच विश्वासातून ‘मेड इन इंडिया’चा अट्टहास केला जाणार असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. रशियाने क्रायोजेनिक इंजिन देण्यास ऐनवेळी नकार दिल्यानंतर भारतीय शास्त्रज्ञांनी रशियाला मान खाली घालायला लावली होती हा इतिहास फार जुना नाही. सैन्याला हव्या त्या क्षमतेची उपकरणे आपली संरक्षण संशोधन व विकास संस्था निर्धारित वेळेत विकसित करणार का, एवढाच मुद्दा आहे. यासंदर्भातही आपण सक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे. तूर्तास त्यावर विश्वास ठेवला तरी केवळ प्रतिमा संवर्धनासाठी, चेहरा स्वच्छ राखण्यासाठी कोणताच निर्णय न घेणारा संरक्षणमंत्री यूपीए सरकारच्या काळात या देशाने पाहिला. त्यांच्या अकार्यक्षमतेचा फटका देशाने सोसला. हे जसे एक टोक तसे स्वदेशीचा हट्ट हे दुसरे टोक ठरू नये. या हट्टापायी देशाच्या संरक्षणसिद्धतेशी खेळण्याची चैन अंगलट येऊ शकते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्या ठामपणे करार मोडला त्याच निर्धाराने त्यांनी स्वदेशीचा संकल्प निर्धारित वेळेत पूर्णत्वास जाईल हे पाहावे.

बातम्या आणखी आहेत...