आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजीची ‘काजळमाया’ (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हर मन में भय प्रदूषण का जगाओ दोस्तों, बस देर ना करो अभी से लग जाओ दोस्तों’ या एका हिंदी कवितेतील ओळी प्रकर्षाने आठवाव्यात अशीच भयावह स्थिती देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झाली आहे. दिल्लीत स्थिरावलेल्या वायुप्रदूषणाने गेल्या १७ वर्षांतील सारे उच्चांक रविवारपासून मोडीत काढले व त्यामुळे दिल्लीतील सुमारे दोन कोटी नागरिक व शहराला लागून असलेल्या इतर राज्यांतील काही कोटी नागरिक यांचे रोजचे व्यवहारही मोडीत निघाले आहेत. जणू प्रदूषित वायूचे गडद आच्छादनच या शहरावर पसरले आहे. ही ‘काजळमाया’ सर्वांनाच काळजी करायला लावणारी आहे. दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१४ च्या अहवालात म्हटले होते. परंतु त्यानंतर दिल्लीतील वायुप्रदूषणाची पातळी थोडी घटल्याने हा ‘किताब’ जगातील दुसऱ्या शहराच्या माथी मारला गेला. दिलासा देणारी ही गोष्ट अर्थात दोन वर्षेदेखील टिकू शकलेली नाही. गेल्या दोन दिवसांत दिल्लीतील प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की, या दिवसांत जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून दिल्लीचीच नोंद झाली आहे! दिल्लीमध्ये डिझेलवर चालणारी व व्यवस्थित देखभाल नसलेली वाहने प्रचंड संख्येने अाहेत. या वाहनांतून उत्सर्जित होणारे विषारी वायू व रस्त्यावरील धूळ ही या शहरातील भयावह वायुप्रदूषणाची महत्त्वाची कारणे आहेत. दिल्लीमध्ये असलेल्या वाहनांची संख्या मुंबईतील वाहनांपेक्षा चारपट व अहमदाबादपेक्षा पाचपट अधिक आहे. दिल्लीमध्ये सार्वजनिक वाहतुकीची साधने विस्तारलेली असली तरी ती पुरेशी ठरताना दिसत नाहीत. मुंबई, कोलकाता, चेन्नई या तीन महानगरांच्या तुलनेत दिल्ली शहराभोवती ग्रामीण भागाचे प्रमाण अधिक आहे. तेथे होणाऱ्या वायुप्रदूषणाचाही परिणाम दिल्लीच्या वातावरणात होत असतो. दिल्लीशेजारील पंजाब व उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले आहे. दिल्ली परिसरातही कोळसाधारित वीजनिर्मिती प्रकल्प व विविध प्रकारचे प्रदूषणकारी उद्योग आहेत. चेन्नई, मुंबई ही शहरे समुद्रकिनारी असल्याने त्यामुळे तेथील प्रदूषणपातळी कमी होण्यास काही प्रमाणात मदत होते. ते भाग्यही दिल्लीच्या नशिबी नसल्याने तिच्या ललाटी गॅस चेंबरसदृश होणे आले. दिल्लीत आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राज्य आहे. मात्र देशाच्या या राजधानीत मुख्यमंत्र्यांपेक्षा नायब राज्यपालाला जास्त अधिकार असल्याने व त्यावर आता सर्वोच्च न्यायालयानेच शिक्कामोर्तब केल्याने केजरीवालांचे हातही काही प्रमाणात बांधले गेले आहेत. दिल्लीतील वाढलेल्या वायुप्रदूषणाच्या पातळीवरून केजरीवाल विरुद्ध केंद्र सरकार असा सामना पुन्हा रंगू लागला आहे. दिल्लीच्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथे सम-विषम दिवशी वाहने रस्त्यांवर आणण्याबाबतची एक योजना काही काळापुरती राबविण्यात आली. त्यामुळे दिल्लीतील वायुप्रदूषणाची पातळी निश्चितच कमी झाली होती. पण ही योजना कायमस्वरूपी राबविण्याबद्दल केजरीवाल आग्रही आहेत, तर भाजपसह अन्य राजकीय पक्षांनी काही मतभेद नोंदविलेले आहेत. हे कुरघोडीचे राजकारण बंद करून नागरिकांच्या जनजीवनावर थेट परिणाम करणारे हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावी तोडगा काढला पाहिजे.

‘दिल्ली अभी दूर है’ असे म्हटले जाते. पण वायुप्रदूषणाच्या बाबतीत विचार केला तर देशातील कोणतेही शहर दिल्लीपासून अजिबात दूर नाही! महाराष्ट्रामध्ये मुंबई या महानगरात वायुप्रदूषणाची समस्या गंभीर असल्याचे सर्वविदितच आहे. राज्यामध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, नागपूर अशी शहरे महानगरे होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. परिणामी त्यांच्या समस्याही उग्र होत आहेत. या शहरांमध्ये सल्फर डायअॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड व अन्य िवषारी घटकांचे वातावरणातील प्रमाण वाढत असून जोडीनेच ध्वनिप्रदूषणाची पातळीही उंचावलेली आहे. महाराष्ट्रातल्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही आता विविध प्रकारचे प्रदूषण नागरिकांच्या जीवनावर वाईट परिणाम घडवत आहे. जैविक प्रदूषणाच्या आधारे देशात १५० नद्या प्रदूषित घोषित करण्यात आल्या असून सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात आहेत. त्यात भीमा, गोदावरी, मुळा, मुठा, पवना, पंचगंगा, पाताळगंगा, इंद्रायणी, कोयनासहित २५ नद्यांचा समावेश आहे. प्रदूषणाबाबत महाराष्ट्रासारखी स्थिती थोड्याफार फरकाने इतर राज्यांतही आहे. दिल्लीत आज वायुप्रदूषणामुळे जे गडद संकट उभे राहिले आहे ते देशातील कोणत्याही भागात गहिरे होऊ शकते. अशा समस्यांचा मुकाबला कुरघोडी वृत्ती त्यागून एकदिलाने करण्याचा निर्धार आता तरी देशवासीयांनी करायला हवा!
बातम्या आणखी आहेत...