आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरींची पहिली बाजी (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत निवडणुका रस्त्यावर लढल्या जात नाहीत तर त्या प्रसारमाध्यमांमधून अधिक (आता सोशल मीडियातून) लढल्या जातात. २००८ व २०१२ ची निवडणूक ट्विटर व फेसबुकच्या माध्यमातून आक्रमकपणे लढवली गेली होती. यंदाही तसाच प्रचार सुरू आहे. माध्यमांचा अधिकाधिक वापर, प्रत्येक घटनेवर ओपिनियन पोल, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या राजकीय भूमिकांपासून त्याच्या व्यक्तिगत जीवनावर खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी हे अमेरिकेच्या निवडणुकीचे वास्तव आहे. अमेरिकन समाज उदारमतवादी, सुसंस्कृत समजला जात असला तरी निवडणुकांमध्ये मात्र प्रतिस्पर्ध्याचे कपडे उतरवण्यापर्यंत मजल मारली जाते. सध्या सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रणधुमाळीत तर पूर्वीपेक्षा प्रतिस्पर्ध्यावर अधिक विखारी शब्दांत टीका, वंशवादाला उत्तेजन मिळेल अशी जहरी भाषा, अश्लील भाषेतील टीकाटिप्पणी यांना ऊत आला आहे. रिपब्लिकन पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प हे यात अग्रेसर आहेत. गेले वर्षभर ट्रम्प त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण (आग्यावेताळ) व्यक्तिमत्त्वाने जगाच्या परिचयाचे झाले आहेत. त्यांना अमेरिकेतील अशिक्षित, नवमध्यमवर्ग व शेतकरी वर्गाचा (प्रामुख्याने श्वेतवर्णीय समाज) इतका मोठा पाठिंबा आहे की ते पक्षाचे सदस्य नसतानाही त्यांना अध्यक्षपदाची उमेदवारी रिपब्लिकन पक्षाला द्यावी लागली. अमेरिकेतली माध्यमेही ट्रम्प व हिलरी यांच्यामध्ये विभागली गेली आहेत. जनमानसातही श्वेतवर्णीय विरुद्ध अन्य अशी फाळणीसदृश मानसिकता पसरली आहे. पण ट्रम्प यांनी विरोधकही निर्माण केले आहेत. अमेरिकेतील अभिजनवर्ग, हिस्पॅनिक, आफ्रोअमेरिकन, आशियाई समुदाय त्यांच्या राजकीय मतांविषयी चिंता व्यक्त करत आला आहे. या वर्गाने ट्रम्प हे केवळ श्रीमंत उद्योगपती नाहीत तर ते मस्तवालही आहेत, त्यांना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अनुभव नाही, “अमेरिकन स्पिरिट’ त्यांना समजत नाही, अशा व्यक्तीच्या हातात देशाची सूत्रे गेल्यास अमेरिका कंगाल होईल व या देशाची जगावरची अनभिषिक्त सत्ता कमी होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. ब्लूमबर्ग, एनबीसी यासारख्या माध्यमांनी व अन्य ओपिनियन पोलनी ट्रम्प व हिलरी यांच्यातील लढत अधिक चुरशीची होईल व ट्रम्प यांचा निसटता विजय होऊ शकतो, असेही भाकीत वर्तवले होते. पण सोमवारी हिलरी यांनी पहिल्या टीव्ही वादविवादात आश्चर्यकारकरीत्या ट्रम्प यांना धोबीपछाड देऊन निवडणुकांचे चित्रच साफ बदलून टाकले. ट्रम्प यांना व्यक्तिगत पातळीवर हा पहिलाच तडाखा बसला आहे. एका महिलेने त्यांना धडा शिकवला आहे याचे शल्य त्यांना बोचत असेल. कारण पूर्ण प्रचारात हिलरी यांच्या चारित्र्याविषयी, त्यांच्या महिला म्हणून राजकीय क्षमतेविषयी, माजी परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांच्या निष्ठेविषयी ट्रम्प यांनी खालच्या पातळीवर जाऊन आरोप केले होते. ट्रम्प यांच्या अशा बेताल विधानांनी खुद्द त्यांचाच रिपब्लिकन पक्ष वैतागला होता. पण ट्रम्प यांना आवरण्याची ताकद या पक्षातील एकाही नेत्याला दाखवता आलेली नव्हती. उलट ट्रम्प यांचे हिलरींवरचे शाब्दिक हल्ले व शिवीगाळ यांना सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत गेले. ट्रम्प यांनी सोशल मीडियातून एक असा अदृश्य दबावगट निर्माण केला की ओपिनियन पोल व माध्यमेही संभ्रमावस्थेत गेली होती. असे हे ट्रम्प डेमोक्रेटिक पक्षालाही मोठे आव्हान देणार असे वाटत असताना हा फुगा होता हे पहिल्या टीव्ही वादविवादातून दिसून आले. सुमारे ९० मिनिटे चाललेल्या या वादविवादात ट्रम्प यांना अमेरिकी जनतेपुढे आपला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकीय अभ्यास, समज व आकलन मांडता आले नाही. उलट त्यांचा अज्ञानीपणा उघड झाला. त्यांनी सलग ८ वर्षे सत्तेत असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारणे अपेक्षित होते. पण तसे न करता त्यांनी हिलरी यांच्या न्यूमोनिया या आजाराविषयी शेरेबाजी केली. खोचकपणा व उतावीळपणा ट्रम्प यांच्या स्वभावाचा गुण असल्यामुळे त्यांनी हिलरी यांना वंशवाद व लिंगभेद अशा मुद्द्यांवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. क्लिंटन यांनी त्यांचे कथित ३३ हजार ई-मेल जाहीर केले तर आपण विवरणपत्र जाहीर करू, असा त्यांचा युक्तिवाद अगदीच निष्फळ ठरला. हिलरी यांनी ट्रम्प यांच्या प्रत्येक प्रश्नाला तोल न जाता हसतमुख व संयम दाखवत उत्तरे दिली. अमेरिकेतील महिलांचा अनादर करणे, आफ्रिकन अमेरिकन व अन्य वंशाच्या समाजाचे प्रश्न धुडकावून लावणे व पुतीन यांची भलामण करणे ही ट्रम्प यांची व्यक्तिवैशिष्ट्ये आहेत, असे त्यांनी हसत हसत सांगितले. आक्रमक व शिवराळ अशा प्रतिस्पर्ध्याला सभ्य, सुसंस्कृत, अभ्यासू भाषेत उत्तर दिल्यास त्याचे हसे कसे होते हे या वादविवादात दिसून आले. पहिल्या वादविवादात ट्रम्प यांना बचावात्मक पातळीवर यावे लागले असले तरी त्यांना पाठिंबा देणाऱ्या मतदाराच्या मानसिकतेत बदल होईल, असे समजण्याचे कारण नाही. टीव्हीवर अजून दोन वादविवाद होणार आहेत. त्यात ट्रम्प काय बोलतात यावर बरेच अवलंबून आहे.
बातम्या आणखी आहेत...