आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मेळाव्यांचे चुकलेले गणित (अग्रलेख)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकासासारख्या महत्त्वाच्या खात्यांबरोबरच इतरही काही खाती सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे या आता केवळ मंत्री राहिलेल्या नाहीत. त्या आता अनेकांना मंत्री करण्याची, अनेकांना आमदार करण्याची ताकद असलेल्या महाराष्ट्रातील एक प्रभावी नेत्या झाल्या आहेत. मंगळवारी भगवानगडावर झालेल्या मेळाव्यात राम शिंदे, सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर या तीन मंत्र्यांनी तर हे साऱ्या महाराष्ट्राला ओरडून सांगितलेच; पण स्वत: पंकजा यांनीही तिथे उपस्थित असलेल्या लाखोंच्या जनसमुदायाकडून हे वदवून घेतले. राजू शेट्टी आणि प्रीतम मुंडे हे दोन खासदार, चार आमदार आणि काही माजी आमदार यांचीही मंचावर हजेरी होती. त्या सर्वांनी पंकजांच्या पाठीशी आम्ही आहोत हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्पष्ट केल्यामुळे तर पंकजांवरची नेतेपदाची मोहोर आणखीनच ठसठशीत झाली आहे. मेळाव्याला लाखोंच्या समुदायाने लावलेल्या हजेरीने त्यात भर घातली गेली आहे. त्यामुळे गडाऐवजी पायथ्याशी मेळावा घेण्याची वेळ आली असली तरी पंकजा आपली राजकीय ताकद साऱ्या महाराष्ट्राला दाखवून देण्यात यशस्वी झाल्या आहेत.
केवळ गोपीनाथ मुंडे यांची कन्या ही ओळख फार दिवस आपल्या उपयोगाला येणार नाही याची जाणीव पंकजा यांना झालेली दिसते. विशेषत: आपल्या जिल्ह्यातच धनंजय मुंडेंकडून होत असलेला विरोध आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना दिले जाऊ लागलेले महत्त्व पंकजा यांना धोक्याचा इशारा वाटला असावा. केवळ मंत्री राहून उपयोगाचे नाही. कारण कोणाचेही मंत्रिपद केव्हाही जाऊ शकते याची जाणीव त्यांना एकनाथ खडसेंचे मंत्रिपद गेल्यानंतर प्रकर्षाने होत असावी. त्यामुळेच त्यांनी ठरवून ‘नेते’पदाचा मुकुट पद्धतशीरपणे धारण केला आहे. एकीकडे असे जाहीरपणे मिळालेले नेतेपद आणि दुसरीकडे जनसमुदायाच्या उपस्थितीतून दिसलेली राजकीय ताकद हे पंकजांचे यश असले तरी या मेळाव्यातून त्यांनी आपल्या राजकीय विरोधकाचीही ताकद आणि उंची वाढवण्याचे काम केले आहे. दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री, खासदार अशा साऱ्यांना आपल्या भाषणाचा सर्वाधिक भाग ज्या व्यक्तीवर बोलण्यात खर्च करावा लागतो ती व्यक्ती नक्कीच इतक्या जणांना पुरून उरणारी आहे, असा अप्रत्यक्ष संदेशच त्यातून गेला आहे. गोपीनाथ मुंडे यांची कन्या म्हणून असलेल्या प्रतिमेला जपण्यासाठी पंकजा यांना भाषण करायचे असते तर त्यांनी धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणे समजू शकले असते. पण एकीकडे गोपीनाथ मुंडे यांची जागा घेत नेतेपदाचा मुकुट घालून घ्यायचा आणि दुसरीकडे लक्ष्य मात्र धनंजय मुंडेंसारख्या आपल्याच जिल्ह्यातल्या आणि कुटुंबातल्या व्यक्तीला करायचे हे राजकीय उंची वाढल्याचे लक्षण खचितच नाही. महादेव जानकर यांनी या मेळाव्यात कठोर शब्द वापरत टीका केल्यामुळे धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. ते राज्यभर पसरले तर राजकीयदृष्ट्या धनंजय यांचीच राजकीय उंची वाढणार आहे हे पंकजा आणि त्यांच्या समर्थकांच्या लक्षात यायला कदाचित वेळ लागेल. अशीच राजकीय गल्लत मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातही पाहायला मिळाली. खरे तर हा मेळावा म्हणजे शिवसेनेची ताकद म्हणून पाहिला जातो. बाळासाहेब ठाकरेंनी त्याला एका ऊर्जास्रोताचे स्वरूप बहाल केले होते. त्यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र स्वत:ची ताकद दाखवण्याच्या प्रयत्नात त्यांनीही आपल्या प्रतिस्पर्ध्याच्याच ताकदीला अधोरेखित केले आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी प्रचारसभांमध्ये भाषण करू नये, असे त्यांनी सांगितले. असे कधी घडलेले नाही आणि उद्धव ठाकरे सांगतात म्हणून ते घडेल असेही नाही. तरीही ते अशी मागणी करतात याचा अर्थ या पदावरील दोन्ही व्यक्तींच्या प्रभावाची त्यांना धास्ती आहे असाच काढला जातो आहे. ‘हिंमत असेल तर युती तोडून दाखवा’ असे आव्हान ते मित्रपक्षाला देतात; पण शिवसेना युती करणार नाही, असा इशारा देण्याची हिंमत मात्र करीत नाहीत हेही महाराष्ट्रासमोर आले आहे. आरक्षण आणि अॅट्रॉसिटीच्या अनुषंगानेही काही ठोस भूमिका घेण्याऐवजी दोन्ही डगरींवर हात ठेवण्याची चलाखी करण्यातच उद्धव या मेळाव्यात आपले कौशल्य पणाला लावताना साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आणि ऐकले. व्यंगचित्र प्रकरणात माफी मागावी लागल्यामुळे गमावलेला आत्मविश्वास दसरा मेळाव्यातून ते शिवसेनेला पुन्हा मिळवून देतील असे वाटत असताना विरोधकांचा आणि स्पर्धकांचाच आत्मविश्वास या मेळाव्यानेही वाढला असण्याची शक्यता अधिक आहे. राजकीय प्रगल्भता आणि उंची हा अानुवंशिक गुण नाही हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.
बातम्या आणखी आहेत...