आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाडसी वाटेवरील पहिले पाऊल (अग्रलेख)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानच्या कारवायांना मोदी सरकार काही वेगळे प्रत्युत्तर देणार की, आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे शांती व आंतरराष्ट्रीय दबावाची भाषा बोलत स्वस्थ राहणार, असा प्रश्न देशातील नागरिकांना पडला होता. पंतप्रधान मोदी यांनी त्याला उत्तर दिले आहे. भारत आता बदलला आहे, कुरापत काढली तर त्याच भाषेत जबाब देण्याची हिंमत या देशात आली आहे, हे मोदी यांनी देशातील नागरिकांनाच नव्हे, तर जगाला सांगितले. नागरिकांचा आत्मविश्वास वाढविणारी ही घटना आहे व त्याबद्दल मोदी प्रशंसेस पात्र आहेत. उरीवरील हल्ल्यानंतर जनमत खवळले होते. पाकिस्तानचा व्रात्यपणा किती काळ सहन करायचा, असा सवाल नागरिक करू लागले होते. उरीच्या आधी पठाणकोट झाले. मधल्या काळात काश्मीर पेटले. मोदींच्या पाकिस्तानविषयीच्या दृष्टिकोनात काश्मीरमधील असंतोष हा टर्निंग पॉइंट ठरला असावा. काश्मीरमधील भाजप व पीडीपीचे सरकार टिकू द्यायचे नाही असा विडा पाकिस्तानने उचलला व तेव्हापासून मोदी यांची भाषा बदलली. मोदींनी बलुचिस्तानचा उल्लेख तेव्हापासून सुरू केला. उरीवरील हल्ल्यानंतरच्या १२ दिवसांत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने आक्रमक धोरण अवलंबिले. मोदींच्या अनेक दौऱ्यांचाही फायदा झाला असावा. अनेक देशांनी भारताची बाजू उचलून धरली. चीनही पाकला उघड साथ देण्यास कचरला. त्यानंतर भारताने पाण्याचे अस्त्र वापरण्याचे ठरविले. रक्त व पाणी एकत्र वाहू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. त्यापाठोपाठ गुरुवारी पहाटे भारतीय लष्कराने पाकिस्तानने कब्जात घेतलेल्या भूमीत शिरून कित्येक दहशतवाद्यांना ठार केले. राजनैतिक आक्रमकतेला लष्करी कारवाईची जोड मिळाली व भारत बदलला आहे याची जाणीव जगाला, विशेषत: पाकिस्तानला झाली.
अशा कारवाईचे परिणाम असतात व ते टाळता येणार नाहीत हे निश्चित. पाकिस्तानचे लष्कर प्रबळ इच्छाशक्तीचे आहे व साधनसामग्रीनेही समृद्ध आहे. भारताला अतोनात त्रास देण्यासाठी इरेला पेटलेले आहे. असे लष्कर स्वस्थ बसणे शक्य नाही. तथापि, पाकिस्तान इरेला पेटलेला आहे म्हणून आपण सतत बचावाची भाषा करणे योग्य नव्हते. उचापती शेजाऱ्याची झोप उडविण्याची गरज असते. आम्ही युद्धखोर नाही, पण युद्धच करायचे असेल तर आता आम्ही तयार आहोत, हे पाकिस्तानला ठामपणे सांगितले जाणे आवश्यक होते. नवाझ शरीफ यांच्याबरोबर सलोख्याचे सर्व प्रयत्न वाया गेले. कारण शरीफ हे तेथील लष्कराच्या हातातील खेळणे झाले आहे. जागतिक स्तरावरील हेटाळणी नवाझ शरीफ यांना नकोशी झाली तरी पाकिस्तानी लष्कराला त्याची किंमत नव्हती. पाक लष्कर अमेरिका व चीन सोडून अन्य देशांना िकंमत देत नाही. भारताच्या राजनैतिक आक्रमकतेची झळ पाक लष्कराला पोहोचत नव्हती. गुरुवारच्या कारवाईने ती पोहोचली. पाकिस्तानी लष्कर उघडपणे बोलत नसले तरी लष्करी यंत्रणेला धक्का बसलेला आहे. पाकिस्तानी जनतेच्या मनातील लष्कराच्या प्रतिमेवरही या कारवाईमुळे डाग पडेल. अण्वस्त्रांचा धाक भारताला नाही, भारत कधीही-कुठेही सफाईने कारवाई करू शकतो हे दिसून आल्यामुळे पाक लष्कराची मिजास कमी झाली आहे. पाकिस्तानी लष्करासाठी, सरकारसाठी, दहशतवाद्यांसाठी व तेथील जनतेसाठी हा मानसिक धक्का अाहे. यामुळेच तिखट प्रत्युत्तर येणार हेे लक्षात घेऊन आपल्याला सर्व सामग्रीनिशी दक्ष राहावे लागेल.
ही कारवाई करून भारतीय लष्कराने आपले कौशल्य सिद्ध केले. हेरांकरवी मिळविलेली पक्की माहिती, उत्तम नियोजन, सफाईदार अंमलबजावणी याचा मेळ घातला गेला. लष्कराच्या शौर्याइतकीच महत्त्वाची ठरली ती सरकारची इच्छाशक्ती. भारतीय लष्कर हे लोकनियुक्त सरकारच्या अधिकाराखाली असते. कारवाईचे स्वातंत्र्य लष्कराला नसते. राजकीय इच्छाशक्ती नसेल तर लष्करी ताकद दुबळी ठरते. मुंबईवरील हल्ल्यानंतर अशीच कारवाई करण्याची लष्कराची तयारी होती, पण यूपीए सरकारकडे हिंमत नव्हती. मोदींनी ती हिंमत पूर्ण तयारीनिशी दाखविली. आजही कारवाई झाल्यावर सर्व प्रमुख देशांना व्यवस्थित माहिती दिली गेली. यामुळे जगासमोर ओरड करणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. दमदार, आक्रमक लष्कर असलेला देश अशी स्वप्रतिमा तयार करणाऱ्या पाकिस्तानला या प्रकारची ओरड करणे शोभणारही नाही. ओरड करण्यापेक्षा हल्ला करणे तो पसंत करील. हे प्रत्युत्तर एका हल्ल्याचे असेल की अनेक हल्ल्यांचे ते लवकरच कळेल. कदाचित भारतातील स्लीपर सेल एकदम आक्रमक होतील. त्यांच्या बाजूने बोलणारे बोलघेवडे बुद्धिवादी पुढे येतील किंवा भारतीय तळावरही मोठा हल्ला होईल. या संभाव्य घडामोडी लक्षात घेऊन आपल्याला तयारी ठेवावी लागेल. तिन्ही सैन्य दले झपाट्याने अत्याधुनिक करण्याबरोबरच अंतर्गत सुरक्षेकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. मोदींनी देशाला वेगळ्या वाटेवर नेले आहे. ही वाट धाडसाची अन् आत्मविश्वास वाढविणारी आहे, मात्र प्रत्येक घडीला कठीण परीक्षा घेणारी आहे. खरी लढाई आता सुरू झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...